स्तोत्रसंहिता 73
73
भाग तिसरा
शत्रूचा शेवट
आसाफाचे स्तोत्र.
1देव इस्राएलावर, शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे.
2माझ्याविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते; माझी पावले बहुतेक घसरणार होती.
3कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो.
4त्यांना मरणयातना नसतात, ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात;
5इतर मनुष्यांप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, इतर लोकांप्रमाणे त्यांना पीडा होत नसतात;
6म्हणून अहंकार हा त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे; जबरदस्ती ही त्यांना वस्त्राप्रमाणे आच्छादन झाली आहे.
7मेदोवृद्धीमुळे त्यांचे डोळे पुढे येतात, त्यांच्या मनातील कल्पना उचंबळतात.
8ते थट्टा करतात व दुष्टतेने जुलमाच्या गोष्टी बोलतात; ते मोठ्या डौलाने भाषण करतात.
9ते आपले तोंड आकाशापर्यंत पोचवतात; त्यांची जीभ जगभर मिरवते.
10ह्यामुळे त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात, आणि त्यांच्याजवळचे पाणी भरपूर पितात.
11ते आणखी म्हणतात, “देवाला कसे समजणार? परात्पराला काय ज्ञान आहे?”
12पाहा, दुर्जन ते हेच; हे सर्वदा स्वस्थ असून धनसंचय करत असतात.
13मी आपले मन स्वच्छ राखले, आपले हात निर्दोषतेने धुतले, खचीत हे सगळे व्यर्थ.
14कारण मी दिवसभर पीडा भोगली आहे; प्रतिदिवशी सकाळी मला शिक्षा झाली आहे.
15ह्याप्रमाणे बोलण्याचे मी मनात आणले असते, तर मी तुझ्या प्रजेच्या पिढीचा गुन्हेगार ठरलो असतो.
16ही गोष्ट मला समजावी म्हणून तिचा विचार करत होतो, तोपर्यंत ती मला फार दुःखदायक वाटली;
17पण मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला तेव्हा ती मला समजली.
18खचीत तू त्यांना निसरड्या जागांवर उभे करतोस, त्यांना पाडून त्यांचा नाश करतोस.
19एका क्षणात त्यांची कशी धूळधाण झाली आहे! भयाने ते अगदी गांगरून गेले आहेत;
20जागा झालेल्या मनुष्याला जसे स्वप्न निरर्थक वाटते, तसे हे प्रभू, तू सज्ज होताच त्यांचे ते स्वरूप तुच्छ मानशील.
21माझे मन खिन्न झाले व माझे अंतर्याम व्यथित झाले.
22मी तर मूढ व अज्ञानी होतो; तुझ्यापुढे मी पशुवत होतो.
23तरी मी नेहमी तुझ्याजवळ आहे; तू माझा उजवा हात धरला आहेस.
24तू बोध करून मला मार्ग दाखवशील, आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करशील.
25स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही.
26माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे.
27पाहा, जे तुझ्यापासून दूर जातात ते नष्ट होतात. अनाचार करून बहकून जाणार्या सर्वांचा तू समूळ नाश करतोस.
28माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्यातच माझे कल्याण आहे; मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे, ह्यासाठी की, मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावीत.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 73: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.