देव इस्राएलावर, शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे. माझ्याविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते; माझी पावले बहुतेक घसरणार होती. कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. त्यांना मरणयातना नसतात, ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात; इतर मनुष्यांप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, इतर लोकांप्रमाणे त्यांना पीडा होत नसतात; म्हणून अहंकार हा त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे; जबरदस्ती ही त्यांना वस्त्राप्रमाणे आच्छादन झाली आहे. मेदोवृद्धीमुळे त्यांचे डोळे पुढे येतात, त्यांच्या मनातील कल्पना उचंबळतात. ते थट्टा करतात व दुष्टतेने जुलमाच्या गोष्टी बोलतात; ते मोठ्या डौलाने भाषण करतात. ते आपले तोंड आकाशापर्यंत पोचवतात; त्यांची जीभ जगभर मिरवते. ह्यामुळे त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात, आणि त्यांच्याजवळचे पाणी भरपूर पितात. ते आणखी म्हणतात, “देवाला कसे समजणार? परात्पराला काय ज्ञान आहे?” पाहा, दुर्जन ते हेच; हे सर्वदा स्वस्थ असून धनसंचय करत असतात. मी आपले मन स्वच्छ राखले, आपले हात निर्दोषतेने धुतले, खचीत हे सगळे व्यर्थ. कारण मी दिवसभर पीडा भोगली आहे; प्रतिदिवशी सकाळी मला शिक्षा झाली आहे. ह्याप्रमाणे बोलण्याचे मी मनात आणले असते, तर मी तुझ्या प्रजेच्या पिढीचा गुन्हेगार ठरलो असतो. ही गोष्ट मला समजावी म्हणून तिचा विचार करत होतो, तोपर्यंत ती मला फार दुःखदायक वाटली; पण मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला तेव्हा ती मला समजली. खचीत तू त्यांना निसरड्या जागांवर उभे करतोस, त्यांना पाडून त्यांचा नाश करतोस. एका क्षणात त्यांची कशी धूळधाण झाली आहे! भयाने ते अगदी गांगरून गेले आहेत; जागा झालेल्या मनुष्याला जसे स्वप्न निरर्थक वाटते, तसे हे प्रभू, तू सज्ज होताच त्यांचे ते स्वरूप तुच्छ मानशील. माझे मन खिन्न झाले व माझे अंतर्याम व्यथित झाले. मी तर मूढ व अज्ञानी होतो; तुझ्यापुढे मी पशुवत होतो. तरी मी नेहमी तुझ्याजवळ आहे; तू माझा उजवा हात धरला आहेस. तू बोध करून मला मार्ग दाखवशील, आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करशील. स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही. माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे. पाहा, जे तुझ्यापासून दूर जातात ते नष्ट होतात. अनाचार करून बहकून जाणार्या सर्वांचा तू समूळ नाश करतोस. माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्यातच माझे कल्याण आहे; मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे, ह्यासाठी की, मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावीत.
स्तोत्रसंहिता 73 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 73
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 73:1-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ