YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 73:1-28

स्तोत्रसंहिता 73:1-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

खात्रीने देव इस्राएलास चांगला आहे, जे अंतःकरणाने शुद्ध आहेत. पण माझ्यासाठी जसे माझे पाय बहुतेक निसटणार होते; माझे पाय बहुतेक माझ्या खालून निसटणार होते. कारण जेव्हा मी दुष्टांचा भरभराट पाहिला तेव्हा मी गर्विष्ठांचा मत्सर केला. कारण त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना वेदना होत नाही, पण ते बलवान आणि चांगले पुष्ट असतात. दुसऱ्या मनुष्याच्या भारापासून मुक्त असतात; ते दुसऱ्या मनुष्यासारखे जुलूमात नसतात. अभिमानाने ते त्यांच्या गळ्याभोवती असलेल्या हाराप्रमाणे आपल्याला सुशोभित करतात; झग्यासारखा ते हिंसाचाराचे वस्र घालतात. अंधत्वातून असे पाप बाहेर येते; वाईट विचार त्यांच्या अंतःकरणातून निघतात. ते माझी चेष्टा करून वाईट गोष्टी बोलतात; ते गर्वाने हिंसाचाराची धमकी देतात. ते आकाशाविरूद्ध बोलतात, आणि त्यांची जीभ पृथ्वीतून भटकते. म्हणून देवाचे लोक त्यांच्याकडे वळतात आणि त्यांच्या वचनातले पाणी भरपूर पितात. ते म्हणतात, “देवाला हे कसे माहित होणार? काय चालले आहे ते देवाला कसे कळते?” पाहा हे लक्षात घ्या, हे लोक दुष्ट आहेत; ते नेहमी चिंतामुक्त असून धनवान झाले आहेत. खचित मी आपले हृदय जपले, आणि आपले हात निरागसतेत धुतले हे व्यर्थ आहे. कारण दिवसभर मी पीडला जातो आणि प्रत्येक सकाळी शिक्षा होते. जर मी म्हणालो असतो की, मी या गोष्टी बोलेन, तर मी या पिढीच्या तुझ्या मुलांचा विश्वासघात केला असता. तरी या गोष्टी मी समजण्याचा प्रयत्न केला, पण त्या माझ्यासाठी खूप कठीण होत्या. मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो, आणि नंतर त्यांच्या भवितव्याचा शेवट मला समजून आला. खचित तू त्यांना निसरड्या जागी ठेवतो; त्यांना तू खाली नाशात पाडतोस. कसे अचानक ते उध्वस्त झाले. आणि भयानक दहशतीत ते संपूर्ण नष्ट झाले. जागा झालेल्या मनुष्यास जसे स्वप्न निरर्थक वाटते; तसे हे प्रभू, जेव्हा तू जागा होशील, तेव्हा त्यांचे ते स्वप्न तुच्छ मानशील. कारण माझे हृदय दुःखीत झाले होते, आणि मी खोलवर घायाळ झालो. मी अज्ञानी होतो आणि सूक्ष्मदृष्टीची उणीव होती; मी तुझ्यापुढे मूर्ख प्राण्यासारखा होतो. तरी मी तुझ्याबरोबर नेहमी आहे; तू माझा उजवा हात धरला आहे. तू आपल्या उपदेशाने मला मार्ग दाखवशील आणि त्यानंतर तू मला गौरवात स्वीकारशील. स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय कोणी प्रिय नाही? माझा देह आणि माझे हृदय दुर्बल होत आहेत, पण देव सर्वकाळ माझ्या हृदयाचे सामर्थ्य आहे. जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल; जे तुझ्याशी अविश्वासू आहेत त्या सर्वांचा तू नाश करशील. पण माझ्याविषयी म्हटले, तर देवाजवळ जाणे यामध्येच माझे कल्याण आहे. मी प्रभू परमेश्वरास आपले आश्रयस्थान केले आहे. मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करीन.

स्तोत्रसंहिता 73:1-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

निश्चितच परमेश्वर इस्राएलसाठी, जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत, त्यांच्यासाठी चांगले आहेत. माझ्याविषयी म्हणाल, तर माझे पाय अडखळू लागले होते; माझी पावले घसरण्याच्या बेतास आली होती. कारण दुष्टांची समृद्धी पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो होतो. होय, आयुष्यभर त्यांचा मार्ग पीडारहित असतो; ते निरोगी आणि सुदृढ असतात. इतर मनुष्यांसारखी त्यांच्यावर सहसा संकटे येत नाहीत आणि इतरांप्रमाणे आजाराने पीडलेही जात नाहीत. अहंकार त्यांच्या गळ्यातील माळ; हिंसा त्यांची वस्त्रे आहेत. त्यांच्या संवेदनशून्य अंतःकरणातून अपराधच निघतात; त्यांच्या मनातील दुष्ट कल्पनांना मर्यादा नाही. ते उपहास करतात आणि वाईट गोष्टी बोलतात; गर्विष्ठपणामुळे ते दडपशाहीची धमकी देतात. ते प्रत्यक्ष स्वर्गावर दावा करतात आणि त्यांची जीभ पृथ्वीवर फुशारक्या मारीत फिरते. म्हणून त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात, आणि ते विपुल प्रमाणात पाणी पितात. ते असेही म्हणतात, “परमेश्वराला कसे समजणार? परात्पर परमेश्वराला सर्व गोष्टीचे ज्ञान आहे काय?” असे असतात दुष्ट लोक—नेहमी निश्चिंत; आणि त्यांची संपत्ती वाढतच जाते. माझे हृदय शुद्ध ठेऊन मला काय लाभ झाला आणि मी माझे हात व्यर्थच निर्दोष ठेवले. दिवसभर मी छळ सहन करीत आहे आणि दररोज सकाळी नवीन शिक्षा दिली जात आहे. जर हे उद्गार माझ्या मुखातून बाहेर पडले असते, तर मी तुमच्या प्रजेचा विश्वासघात करणारा ठरलो असतो. ही गोष्ट समजण्यासाठी मी विचार करू लागलो, तेव्हा त्याचे आकलन मला अत्यंत कठीण वाटू लागले. मग शेवटी मी परमेश्वराच्या पवित्रस्थानात गेलो, तेव्हा दुष्टांचा शेवट काय होतो हे मला कळून आले. निश्चित तुम्ही त्यांना निसरड्या भूमीवर ठेवले आहे; तुम्ही त्यांना सर्वनाशाकडे खाली लोटून द्याल. क्षणार्धात त्यांच्या नाश होईल, भयानकता त्यांच्या वाट्याला येईल. जसे जागे होणाऱ्या मनुष्याला स्वप्न पडते; त्याचप्रमाणे हे प्रभू, तुम्ही जागे व्हाल तेव्हा त्यांचे दुस्वप्न तुच्छ जाणाल. जेव्हा माझे हृदय दुःखित झाले आणि माझा आत्मा कटुतेने भरून गेला होता, त्यावेळस मी मूर्ख आणि अज्ञानी होतो; मी तुमच्यापुढे जनावरासारखा होतो! तरी नेहमी मी तुमच्याबरोबर आहे; तुम्ही माझा उजवा हात धरलेला आहे. तुमची सल्लामसलत माझे मार्गदर्शन करेल, आणि त्यानंतर गौरवात तुम्ही माझा स्वीकार कराल. स्वर्गात तुमच्याशिवाय माझे कोण आहे? पृथ्वीवर तुमच्याएवढे प्रिय मला दुसरे कोणीही नाही. माझे शरीर व माझे हृदय खचेल, तरी परमेश्वर माझ्या हृदयाचे सामर्थ्य असून सर्वकाळचा माझा वाटा आहेत. जे तुमच्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल; तुमच्याशी विश्वासघात करणार्‍यांना तुम्ही नष्ट करता. परंतु माझ्यासाठी परमेश्वराच्या सहवासात राहणे खूप सुंदर आहे. मी याहवेह माझे प्रभू यांना आश्रयस्थान केले आहे. जेणेकरून मी तुमच्या सर्व महान कृत्यांची घोषणा करेन.

स्तोत्रसंहिता 73:1-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

देव इस्राएलावर, शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे. माझ्याविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते; माझी पावले बहुतेक घसरणार होती. कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. त्यांना मरणयातना नसतात, ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात; इतर मनुष्यांप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, इतर लोकांप्रमाणे त्यांना पीडा होत नसतात; म्हणून अहंकार हा त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे; जबरदस्ती ही त्यांना वस्त्राप्रमाणे आच्छादन झाली आहे. मेदोवृद्धीमुळे त्यांचे डोळे पुढे येतात, त्यांच्या मनातील कल्पना उचंबळतात. ते थट्टा करतात व दुष्टतेने जुलमाच्या गोष्टी बोलतात; ते मोठ्या डौलाने भाषण करतात. ते आपले तोंड आकाशापर्यंत पोचवतात; त्यांची जीभ जगभर मिरवते. ह्यामुळे त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात, आणि त्यांच्याजवळचे पाणी भरपूर पितात. ते आणखी म्हणतात, “देवाला कसे समजणार? परात्पराला काय ज्ञान आहे?” पाहा, दुर्जन ते हेच; हे सर्वदा स्वस्थ असून धनसंचय करत असतात. मी आपले मन स्वच्छ राखले, आपले हात निर्दोषतेने धुतले, खचीत हे सगळे व्यर्थ. कारण मी दिवसभर पीडा भोगली आहे; प्रतिदिवशी सकाळी मला शिक्षा झाली आहे. ह्याप्रमाणे बोलण्याचे मी मनात आणले असते, तर मी तुझ्या प्रजेच्या पिढीचा गुन्हेगार ठरलो असतो. ही गोष्ट मला समजावी म्हणून तिचा विचार करत होतो, तोपर्यंत ती मला फार दुःखदायक वाटली; पण मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला तेव्हा ती मला समजली. खचीत तू त्यांना निसरड्या जागांवर उभे करतोस, त्यांना पाडून त्यांचा नाश करतोस. एका क्षणात त्यांची कशी धूळधाण झाली आहे! भयाने ते अगदी गांगरून गेले आहेत; जागा झालेल्या मनुष्याला जसे स्वप्न निरर्थक वाटते, तसे हे प्रभू, तू सज्ज होताच त्यांचे ते स्वरूप तुच्छ मानशील. माझे मन खिन्न झाले व माझे अंतर्याम व्यथित झाले. मी तर मूढ व अज्ञानी होतो; तुझ्यापुढे मी पशुवत होतो. तरी मी नेहमी तुझ्याजवळ आहे; तू माझा उजवा हात धरला आहेस. तू बोध करून मला मार्ग दाखवशील, आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करशील. स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही. माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे. पाहा, जे तुझ्यापासून दूर जातात ते नष्ट होतात. अनाचार करून बहकून जाणार्‍या सर्वांचा तू समूळ नाश करतोस. माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्यातच माझे कल्याण आहे; मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे, ह्यासाठी की, मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावीत.