YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 68:19-35

स्तोत्रसंहिता 68:19-35 MARVBSI

प्रभू धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो; देव आमचे तारण आहे. (सेला) देव आम्हांला संकटांतून मुक्त करणारा देव आहे; आणि मृत्यूपासून सोडवणारा प्रभू परमेश्वर आहे. देव निश्‍चये आपल्या वैर्‍यांचे मस्तक फोडील, जो आपल्या दुष्टाईत निमग्न होऊन चालतो त्याचे केसाळ माथे फोडील. प्रभू म्हणाला, “बाशानापासून मी त्यांना परत आणीन, समुद्राच्या खोल डोहातून त्यांना परत आणीन; ह्यासाठी की तू आपला पाय रक्तात बुचकळावा. तुझे शत्रू तुझ्या कुत्र्यांच्या जिभांचे खाद्य व्हावे.” हे देवा, त्यांनी तुझ्या स्वार्‍या पाहिल्या आहेत, पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या स्वार्‍या त्यांनी पाहिल्या आहेत. खंजिर्‍या वाजवत जाणार्‍या कुमारींच्या मधून गाणारे पुढे व वाजवणारे मागे चालताना म्हणतात की “ज्यांचा उगम इस्राएलापासून आहे असे तुम्ही, प्रभू जो देव त्याचा जनसभांत धन्यवाद करा.” तेथे त्यांच्यावर प्रभुत्व करणारा कनिष्ठ बन्यामीन, यहूदाचे अधिपती, व त्यांच्याबरोबरचे समुदाय जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत. तू प्रबळ व्हावे असे तुझ्या देवाने आज्ञापिले आहे; हे देवा, तू आमच्यासाठी जे केले आहेस ते दृढ कर. यरुशलेमातील तुझ्या मंदिरासाठी राजे तुला भेटी आणतील. लव्हाळ्यामध्ये राहणारे वनपशू, बैलांचा कळप आणि त्यांचे वत्स ह्यांना धमकाव; रुप्याचा लोभ धरणार्‍या लोकांना पायाखाली तुडव. युद्धप्रिय लोकांची त्याने दाणादाण केली आहे. मिसर देशातून सरदार येतील; कूश आपले हात देवाकडे पसरण्याची त्वरा करील. अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा; प्रभूची स्तोत्रे गा. (सेला) पुरातन आकाशांच्या आकाशावर आरूढ होऊन जो स्वारी करतो, त्याची स्तोत्रे गा; पाहा, तो आपला शब्द, सामर्थ्याचा शब्द, उच्चारतो. देवाच्या बलाचे वर्णन करा; इस्राएलावर त्याचे ऐश्वर्य आणि गगनमंडळात त्याचे बळ आहे. तुझ्या पवित्रस्थानातून कार्य करणारा देव भयप्रद आहे, इस्राएलाचा देव आपल्या लोकांना बल व सामर्थ्य देतो. देव धन्यवादित असो.