YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 62

62
आपली भिस्त केवळ देवावर
मुख्य गवयासाठी; यदूथूनाच्या पद्धतीप्रमाणे दाविदाचे स्तोत्र.
1माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे; त्याच्यापासून मला तारणप्राप्ती होते.
2तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे; तोच माझा उंच गड आहे; मी सहसा ढळणार नाही.
3एकट्या मनुष्याला मारण्यासाठी त्याच्यावर तुम्ही सर्व कोठवर चढाई करून याल? तो झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे.
4त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्यासाठी मात्र ते मसलत करतात; त्यांना लबाडी आवडते; ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण मनातून शाप देतात.
(सेला)
5हे माझ्या जिवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा; कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे.
6तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे; मी ढळणार नाही.
7माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे; माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे;
8अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा; त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा; देव आमचा आश्रय आहे.
(सेला)
9मानवप्राणी केवळ वाफ आहेत; ते केवळ मिथ्या आहेत; तराजूत घातले असता ते हलके भरतील; ते सर्व वाफच आहेत.
10जुलूमजबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेखी मिरवू नका; संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका.
11एकदा देव बोलला आहे; मी दोनदा हे ऐकले आहे की, सामर्थ्य देवाचे आहे.
12शिवाय, हे प्रभू, तुझ्याच ठायी वात्सल्य आहे; कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 62: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन