YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 37:23-40

स्तोत्रसंहिता 37:23-40 MARVBSI

परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो, आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही; कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. तो नेहमी उदार असतो, तो उसने देतो; त्याची संतती आशीर्वादित असते. वाइटापासून दूर राहा, बरे ते कर; म्हणजे तुझी वस्ती कायम राहील. कारण परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांना सोडत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते; पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो. नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील. नीतिमानाचे मुख सुज्ञान वदते, त्याची जीभ न्याय उच्चारते. त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते; त्याचे पाय घसरणार नाहीत. दुर्जन नीतिमानावर टपलेला असतो, व त्याला जिवे मारण्यास तो पाहत असतो. परमेश्वर त्याला त्याच्या हाती देणार नाही, त्याचा न्याय होईल तेव्हा तो त्याला दोषी ठरवणार नाही. परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील. मी एक निर्दय दुर्जन पाहिला, तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला; पण मी तिकडून गेलो तेव्हा त्याचा मागमूस राहिला नव्हता; मी त्याचा शोध केला तरी तो सापडला नाही. सात्त्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील. पातकी तर पूर्णपणे नष्ट होतील; दुर्जनांचा वंश छाटला जाईल; परंतु नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते; संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे. परमेश्वर त्यांना साहाय्य करतो व त्यांना मुक्त करतो; त्यांना दुर्जनांपासून मुक्त करतो व तारतो, कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे.