YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 37

37
दुष्ट व देवभक्‍त ह्यांचे भवितव्य
दाविदाचे स्तोत्र.
1दुष्कर्म्यांवर जळफळू नकोस; अन्याय करणार्‍यांचा हेवा करू नकोस.
2कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात.
3परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग; देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल;
4म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील.
5आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.
6तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रकट करील.
7परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा; त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा; जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नकोस.
8राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळू नकोस, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते.
9दुष्कर्म करणार्‍यांचा उच्छेद होईल; पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.
10थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही;
11पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.
12दुर्जन नीतिमानाविरुद्ध मसलती करतो, त्याच्यावर दातओठ खातो.
13प्रभू दुर्जनाला हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे हे त्याला दिसते.
14दीनदुबळ्यांना पाडायला, सरळ मार्गाने चालणार्‍यांचा वध करायला दुर्जनांनी तलवार उपसली आहे व धनुष्य वाकवून सज्ज केले आहे.
15त्यांची तलवार त्यांच्याच उरात शिरेल, आणि त्यांच्या धनुष्यांचा चुराडा होईल.
16नीतिमानाचे अल्प धन अनेक दुर्जनांच्या विपुल धनापेक्षा उत्तम आहे.
17दुर्जनांचे बाहू मोडतील, पण नीतिमानांचा आधार परमेश्वर आहे.
18सात्त्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते; त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल.
19ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; ते दुष्काळाच्या दिवसांत तृप्त राहतील.
20दुर्जन तर नाश पावतील; परमेश्वराचे वैरी कुरणाच्या क्षणिक शोभेसारखे होतील; ते नाहीसे होतील; ते धुरासारखे नाहीसे होऊन जातील.
21दुर्जन उसने घेतो आणि परत करीत नाही; नीतिमान उदारपणे वागतो व दान देतो.
22ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील; ज्यांना त्याचा शाप लागेल त्यांचा उच्छेद होईल.
23परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो, आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे.
24तो पडला तरी सपशेल पडणार नाही; कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील.
25मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही.
26तो नेहमी उदार असतो, तो उसने देतो; त्याची संतती आशीर्वादित असते.
27वाइटापासून दूर राहा, बरे ते कर; म्हणजे तुझी वस्ती कायम राहील.
28कारण परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांना सोडत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते; पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो.
29नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.
30नीतिमानाचे मुख सुज्ञान वदते, त्याची जीभ न्याय उच्चारते.
31त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते; त्याचे पाय घसरणार नाहीत.
32दुर्जन नीतिमानावर टपलेला असतो, व त्याला जिवे मारण्यास तो पाहत असतो.
33परमेश्वर त्याला त्याच्या हाती देणार नाही, त्याचा न्याय होईल तेव्हा तो त्याला दोषी ठरवणार नाही.
34परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.
35मी एक निर्दय दुर्जन पाहिला, तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला;
36पण मी तिकडून गेलो तेव्हा त्याचा मागमूस राहिला नव्हता; मी त्याचा शोध केला तरी तो सापडला नाही.
37सात्त्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील.
38पातकी तर पूर्णपणे नष्ट होतील; दुर्जनांचा वंश छाटला जाईल;
39परंतु नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते; संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे.
40परमेश्वर त्यांना साहाय्य करतो व त्यांना मुक्त करतो; त्यांना दुर्जनांपासून मुक्त करतो व तारतो, कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 37: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन