YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 27:1-14

स्तोत्रसंहिता 27:1-14 MARVBSI

परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू? दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच लागून पडले. सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही; माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरून राहीन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील; मला तो आपल्या डेर्‍याच्या गुप्त स्थळी ठेवील; तो मला खडकावर उचलून ठेवील. आता सभोवतालच्या माझ्या वैर्‍यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल; त्याच्या डेर्‍यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन. मी गायनवादन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन. मी उच्च स्वराने तुझा धावा करत आहे, हे परमेश्वरा, ऐक; माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक. “माझे दर्शन घ्या,” असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, “हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे.” तू आपले मुख माझ्या दृष्टिआड करू नकोस आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नकोस. तू माझे साहाय्य होत आला आहेस; हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नकोस, मला सोडू नकोस. माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करील. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव; लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नकोस. कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाचे फूत्कार टाकणारे माझ्यावर उठले आहेत. ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खातरीने माझे कल्याण करील. परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.