स्तोत्रसंहिता 27:1-14
स्तोत्रसंहिता 27:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे. मी कोणाचे भय बाळगू? परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे, मी कोणाची भीती बाळगू? जेव्हा दुष्ट माझे मांस खायला जवळ आले, तेव्हा माझे शत्रू आणि माझे विरोधक अडखळून खाली पडले. जरी सैन्याने माझ्याविरोधात तळ दिला, माझे हृदय भयभीत होणार नाही. जरी माझ्याविरूद्ध युध्द उठले, तरी सुद्धा मी निर्धास्त राहीन. मी परमेश्वरास एक गोष्ट मागितली, तीच मी शोधीन, परमेश्वराची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस घालवेन, परमेश्वराच्या घरात मी वस्ती करीन. कारण माझ्या संकट समयी तो माझे लपण्याचे ठिकाण आहे; तो मला त्याच्या तंबूत लपवेल, तो मला खडकावर उंच करील. तेव्हा माझ्या सभोवती असणाऱ्या शत्रू समोर माझे मस्तक उंचावले जाईल, आणि त्याच्या मंडपात मी सदैव आनंदाचा यज्ञ अर्पण करणार, मी गाईन, होय! परमेश्वरास मी स्तुती गाईन. परमेश्वरा, मी तुला आरोळी करेन तेव्हा माझा आवाज ऐक! माझ्यावर दया कर आणि मला उत्तर दे. माझे हृदय तुझ्या विषयी म्हणाले, त्याचे मुख शोध, हे परमेश्वरा, मी तुझे मुख शोधीन. तू आपले मुख माझ्यापासून लपवू नकोस; तुझ्या सेवकाला रागात फटकारू नकोस! तू माझा सहाय्यकर्ता होत आला आहेस; माझ्या तारण करणाऱ्या देवा, मला सोडू किंवा त्यागू नकोस. जरी माझ्या आईवडीलांनी मला सोडून दिले तरी, परमेश्वर मला उचलून घेईल. परमेश्वरा, तू मला तुझे मार्ग शिकव. माझ्या वैऱ्यामुळे, मला सपाट मार्गावर चालव. माझा जीव शत्रूस देऊ नको, कारण खोटे साक्षी माझ्याविरूद्ध उठले आहेत, आणि ते हिंसक श्वास टाकतात. जीवंताच्या भूमीत, जर परमेश्वराचा चांगुलपणा पाहायला मी विश्वास केला नसता, तर मी कधीच माझी आशा सोडून दिली असती. परमेश्वराची वाट पाहा; मजबूत हो आणि तुझे हृदय धैर्यवान असो. परमेश्वराची वाट पाहा.
स्तोत्रसंहिता 27:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू? दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच लागून पडले. सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही; माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरून राहीन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील; मला तो आपल्या डेर्याच्या गुप्त स्थळी ठेवील; तो मला खडकावर उचलून ठेवील. आता सभोवतालच्या माझ्या वैर्यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल; त्याच्या डेर्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन. मी गायनवादन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन. मी उच्च स्वराने तुझा धावा करत आहे, हे परमेश्वरा, ऐक; माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक. “माझे दर्शन घ्या,” असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, “हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे.” तू आपले मुख माझ्या दृष्टिआड करू नकोस आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नकोस. तू माझे साहाय्य होत आला आहेस; हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नकोस, मला सोडू नकोस. माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करील. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव; लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नकोस. कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाचे फूत्कार टाकणारे माझ्यावर उठले आहेत. ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खातरीने माझे कल्याण करील. परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.