स्तोत्रसंहिता 132
132
पवित्रस्थानाला आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना
आरोहणस्तोत्र.
1हे परमेश्वरा, दाविदाप्रीत्यर्थ त्याच्या सर्व कष्टांचे स्मरण कर.
2त्याने परमेश्वराजवळ शपथ वाहिली, याकोबाच्या समर्थ देवाला नवस केला की,
3“मी आपल्या राहण्याच्या तंबूत जाणार नाही, आपल्या अंथरुणावर पडणार नाही;
4मी आपल्या डोळ्यांवर झोप, आपल्या पापण्यांवर सुस्ती येऊ देणार नाही;
5परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या समर्थ देवासाठी निवासमंडप मिळवीपर्यंत मी असेच करीन.”
6पाहा, एफ्राथात आम्ही कोशाविषयी ऐकले; तो वैराण प्रदेशात आम्हांला सापडला.
7“आपण त्याच्या निवासमंडपात जाऊ; त्याच्या पदासनापुढे दंडवत घालू.”
8हे परमेश्वरा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये.
9तुझे याजक नीतिमत्त्वाने भूषित होवोत; तुझे भक्त आनंदघोष करोत;
10तुझा सेवक दावीद ह्याच्याप्रीत्यर्थ तू आपल्या अभिषिक्ताचे तोंड मागे फिरवू नकोस.
11परमेश्वराने दाविदाजवळ खरी शपथ वाहिली आहे; तो माघार घेणार नाही; ती शपथ अशी की, “मी तुझ्या पोटच्या फळांतले तुझ्या राजासनावर बसवीन;
12तुझी मुले माझा करार व मी त्यांना शिकवलेले निर्बंध पाळतील, तर त्यांचीही मुले सर्वकाळ तुझ्या राजासनावर बसतील.”
13परमेश्वराने सीयोन निवडून घेतली आहे, आपल्या निवासासाठी त्याला ती आवडली आहे.
14“हे सर्वकाळ माझे विश्रामस्थान आहे; येथे मी राहीन, कारण तशी मी इच्छा केली.
15मी तिला विपुल अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन, तिच्यातल्या दरिद्र्यांना अन्नाने तृप्त करीन.
16मी तिच्या याजकांना उद्धाराने मंडित करीन; तिच्यातील भक्त मोठा आनंदघोष करतील.
17तेथे दावीदवंशाची प्रतिष्ठा वाढेल1 असे मी करीन; मी आपल्या अभिषिक्तासाठी दीप मांडला आहे.
18मी त्याच्या वैर्यांना लज्जेने वेष्टित करीन; पण त्याच्या मस्तकावर त्याचा मुकुट झळकेल.”
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 132: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.