YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 4

4
ज्ञानामुळे प्राप्त होणारे फायदे
1मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका, व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या.
2कारण मी तुम्हांला उत्तम शिकवण देतो; माझे नीतिशिक्षण सोडू नका.
3कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो.
4ती मला शिकवी व म्हणे, “माझी वचने तुझ्या चित्ती राहोत; तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायू हो;
5ज्ञान संपादन कर, सुज्ञता संपादन कर; ती विसरू नकोस, माझ्या तोंडच्या वचनाला पराङ्मुख होऊ नकोस;
6ते सोडू नकोस म्हणजे ते तुझे संरक्षण करील; त्याची आवड धर म्हणजे ते तुझा सांभाळ करील.
7ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर; आपली सर्व संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर.
8त्याला उच्च पद दे म्हणजे ते तुझी उन्नती करील. त्याला कवटाळून राहशील तर ते तुझा गौरव करील;
9ते तुला शोभिवंत शिरोभूषण देईल; ते तुला सुंदर मुकुट देईल.”
10माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल.
11मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकवला आहे, तुला सरळतेच्या वाटांनी चालवले आहे.
12तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाहीत; तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही.
13तू शिक्षण दृढ धरून ठेव; सोडू नकोस; ते जवळ राख; कारण ते तुझे जीवन आहे,
14दुर्जनांच्या मार्गात शिरू नकोस; दुष्टांच्या मार्गाने चालू नकोस.
15त्यापासून दूर राहा, त्याच्या जवळून जाऊ नकोस; त्यावरून मागे फीर आणि आपल्या मार्गाला लाग.
16कारण दुष्कर्म केल्यावाचून त्यांना झोप येत नाही; कोणाला पाडले नाही, तर त्यांची झोप उडते.
17कारण ते दुष्टाईने मिळवलेले अन्न खातात, बलात्काराने मिळवलेला द्राक्षारस पितात,
18परंतु नीतिमानांचा मार्ग मध्यान्हापर्यत उत्तरोत्तर वाढणार्‍या उदयप्रकाशासारखा आहे.
19दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे; त्यांना कशाची ठेच लागते हे त्यांना कळत नाही.
20माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव; माझ्या सांगण्याकडे कान दे.
21ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नकोस; ती आपल्या अंतःकरणात ठेव.
22कारण ती ज्यांना लाभतात, त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात.
23सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.
24तू उद्दामपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, कुटिल वाणीपासून फार दूर राहा.
25तुझे डोळे नीट पुढे पाहोत. तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत.
26आपल्या पायांची वाट सपाट कर; तुझे सर्व मार्ग निश्‍चित असोत.
27तू डावीउजवीकडे वळू नकोस; दुष्कर्मातून आपले पाऊल काढ.

सध्या निवडलेले:

नीतिसूत्रे 4: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन