YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 3

3
आज्ञांकितपणाचा आदेश
1माझ्या मुला, माझे नियमशास्त्र विसरू नकोस, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत;
2कारण त्यांपासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील.
3दया व सत्य ही तुला न सोडोत; त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागव; त्यांना आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव;
4म्हणजे तुला देव व मनुष्य ह्यांच्याकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होतील.
5तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस;
6तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.
7तू आपल्या दृष्टीने स्वत:स शहाणा समजू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा.
8हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्त्व असे होईल.
9तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वराचा सन्मान कर;
10म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील.
11माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नकोस आणि त्याच्या शासनाला कंटाळू नकोस;
12कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो.
13ज्याला ज्ञान प्राप्त होते, तो सुज्ञता संपादन करतो, तो मनुष्य धन्य होय.
14कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा, व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे.
15ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे; आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तू त्याच्याशी तुल्य नाही.
16त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे; त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहेत;
17त्याचे मार्ग आनंदाचे आहेत; त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत.
18जे त्याला धरून राहतात त्यांना ते जीवनवृक्षरूप आहे; जो कोणी ते राखून ठेवतो तो धन्य होय.
19परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला; त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले.
20त्याच्या ज्ञानबलाने जलाशय बाहेर आले, व आकाश दहिवर वर्षते.
21माझ्या मुला, ती तुझ्या डोळ्यांआड होऊ देऊ नकोस; तू चातुर्य व विवेक ही सांभाळून ठेव.
22म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होतील.
23तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील, तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही.
24तू निजतेवेळी भिणार नाहीस; तू निजशील आणि तुझी झोप सुखाची होईल,
25तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिऊ नकोस, दुष्टांची धाड आली तरी भिऊ नकोस;
26कारण परमेश्वर तुझा रक्षणकर्ता होईल, तो तुझा पाय गुंतू देणार नाही.
27एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नकोस.
28एखादी वस्तू तुझ्याजवळ असता आपल्या शेजार्‍याला असे सांगू नकोस की, “तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे ती मी तुला देईन.”
29तुझा शेजारी तुझ्याजवळ निर्भय राहतो असे पाहून त्याचे वाईट योजू नकोस.
30एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसता त्याच्याशी उगीच भांडण करू नकोस.
31जुलूम करणार्‍यांशी स्पर्धा करू नकोस. त्याची कोणतीही रीत स्वीकारू नकोस.
32कारण परमेश्वराला कुटिलाचा वीट आहे. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे.
33परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; पण नीतिमानांच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो.
34उपहास करणार्‍यांचा तो अवश्य उपहास करतो, पण दीनांवर तो कृपाप्रसाद करतो.
35ज्ञानी वैभवाचे वतनदार होतील, पण मूर्ख लज्जेची बढती पावतील.

सध्या निवडलेले:

नीतिसूत्रे 3: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन