YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 8:15-26

गणना 8:15-26 MARVBSI

तू लेव्यांना शुद्ध करून ओवाळणी म्हणून अर्पण केल्यानंतर त्यांनी सेवा करायला दर्शनमंडपात जावे. कारण इस्राएल लोकांमधून ते मला सर्वस्वी वाहिलेले आहेत; उदरातून प्रथम निघणार्‍या अर्थात इस्राएल लोकांच्या प्रथमजन्मलेल्या सर्वांच्या ऐवजी मी त्यांना आपले करून घेतले आहे. कारण इस्राएल लोकांपैकी अथवा त्यांच्या पशूंपैकी प्रथमजन्मलेले सर्व नर माझेच आहेत; मिसर देशातील प्रथमजन्मलेले सर्व मी मारले त्या दिवशी मी त्यांना आपल्यासाठी पवित्र करून घेतले. इस्राएल लोकांतील प्रथमजन्मलेल्या सर्वांच्या ऐवजी मी लेव्यांना घेतले आहे. दर्शनमंडपात इस्राएल लोकांसाठी सेवा करायला व इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त करायला अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना इस्राएल लोकांतून लेवी दान म्हणून मी दिले आहेत; म्हणजे इस्राएल लोक पवित्रस्थानाजवळ आले असता त्यांच्यावर अनर्थ गुदरू नये.” मोशे, अहरोन आणि इस्राएल लोकांची सर्व मंडळी ह्यांनी ह्या प्रकारे लेव्यांना केले; परमेश्वराने लेव्यांविषयी मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी त्यांचे सर्वकाही केले. लेवी आपल्या पापाचे क्षालन करून शुद्ध झाले; त्यांनी आपली वस्त्रे धुतली आणि अहरोनाने त्यांना परमेश्वरासमोर ओवाळणी म्हणून अर्पण केले; आणि त्यांना शुद्ध करण्याकरता अहरोनाने त्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त केले. त्यानंतर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासमोर लेवी आपापली सेवा करण्यासाठी दर्शनमंडपात गेले. लेव्यां-संबंधाने परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे केले. परमेश्वर मोशेला म्हणाला, “लेव्यांसंबंधीचा नियम हा : वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून त्यांनी दर्शनमंडपासंबंधाचा सेवाधर्म आचरावा; ते पन्नास वर्षांचे झाल्यावर त्यांनी सेवानिवृत्त व्हावे व तेथून पुढे ही सेवा त्यांनी करू नये; पण त्यांनी आपल्या भाऊबंदांसह दर्शनमंडपात रक्षकाचे काम करावे, दुसरी काही सेवा करू नये. लेव्यांना सोपवलेल्या कामासंबंधाने तू त्यांचे असे करावे.”