गणना 8
8
अहरोन दिवे उजळतो
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“अहरोनाला सांग की, तू दिवे पेटवशील तेव्हा सातही दिव्यांचा प्रकाश दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला पडावा.”
3अहरोनाने तसे केले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे दीपवृक्षाच्या पुढच्या बाजूला प्रकाश पडावा म्हणून त्याने दिवे उजळले.
4दीपवृक्षाचे काम घडीव सोन्याचे होते; बैठकीपासून फुलांपर्यंत घडीव काम होते; परमेश्वराने मोशेला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे त्याने तो दीपवृक्ष घडवला होता.
लेव्यांचे समर्पण
5परमेश्वर मोशेला म्हणाला, 6“इस्राएल लोकांमधून लेव्यांना वेगळे करून शुद्ध कर.
7तू त्यांना शुद्ध करण्यासाठी असे कर : पापक्षालनाच्या जलाचे त्यांच्यावर सिंचन कर; मग त्यांनी आपल्या सगळ्या अंगावर वस्तरा फिरवावा, आपली वस्त्रे धुवावीत आणि स्वत:ला शुद्ध करावे.
8मग त्यांनी एक गोर्हा व त्यासोबतचे अन्नार्पण म्हणजे मळलेले पीठ घेऊन यावे; आणि तू पापार्पणासाठी आणखी एक गोर्हा आणावा.
9मग तू लेव्यांना दर्शनमंडपासमोर सादर करावे आणि इस्राएल लोकांची सर्व मंडळी तेथे जमवावी;
10लेव्यांना तू परमेश्वरासमोर सादर करत असताना इस्राएल लोकांनी आपले हात त्यांच्यावर ठेवावेत;
11लेव्यांनी परमेश्वराची सेवा करावी म्हणून इस्राएल लोकांच्या वतीने अहरोनाने त्यांना ओवाळणी म्हणून परमेश्वरासमोर अर्पावे.1 12तेव्हा लेव्यांनी आपले हात गोर्ह्याच्या डोक्यांवर ठेवावेत; आणि लेव्यांप्रीत्यर्थ प्रायश्चित्त करण्यासाठी तू एक गोर्हा पापार्पण व दुसरा होमार्पण म्हणून परमेश्वराला अर्पावा.
13मग लेव्यांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासमोर उभे करून परमेश्वराला ओवाळणी म्हणून अर्पावे.
14ह्या प्रकारे तू लेव्यांना इस्राएल लोकांमधून वेगळे करावे म्हणजे लेवी माझे होतील.
15तू लेव्यांना शुद्ध करून ओवाळणी म्हणून अर्पण केल्यानंतर त्यांनी सेवा करायला दर्शनमंडपात जावे.
16कारण इस्राएल लोकांमधून ते मला सर्वस्वी वाहिलेले आहेत; उदरातून प्रथम निघणार्या अर्थात इस्राएल लोकांच्या प्रथमजन्मलेल्या सर्वांच्या ऐवजी मी त्यांना आपले करून घेतले आहे.
17कारण इस्राएल लोकांपैकी अथवा त्यांच्या पशूंपैकी प्रथमजन्मलेले सर्व नर माझेच आहेत; मिसर देशातील प्रथमजन्मलेले सर्व मी मारले त्या दिवशी मी त्यांना आपल्यासाठी पवित्र करून घेतले.
18इस्राएल लोकांतील प्रथमजन्मलेल्या सर्वांच्या ऐवजी मी लेव्यांना घेतले आहे.
19दर्शनमंडपात इस्राएल लोकांसाठी सेवा करायला व इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित्त करायला अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना इस्राएल लोकांतून लेवी दान म्हणून मी दिले आहेत; म्हणजे इस्राएल लोक पवित्रस्थानाजवळ आले असता त्यांच्यावर अनर्थ गुदरू नये.”
20मोशे, अहरोन आणि इस्राएल लोकांची सर्व मंडळी ह्यांनी ह्या प्रकारे लेव्यांना केले; परमेश्वराने लेव्यांविषयी मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी त्यांचे सर्वकाही केले.
21लेवी आपल्या पापाचे क्षालन करून शुद्ध झाले; त्यांनी आपली वस्त्रे धुतली आणि अहरोनाने त्यांना परमेश्वरासमोर ओवाळणी म्हणून अर्पण केले; आणि त्यांना शुद्ध करण्याकरता अहरोनाने त्यांच्यासाठी प्रायश्चित्त केले.
22त्यानंतर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासमोर लेवी आपापली सेवा करण्यासाठी दर्शनमंडपात गेले. लेव्यां-संबंधाने परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे केले.
लेव्यांच्या सेवेची मुदत
23परमेश्वर मोशेला म्हणाला,
24“लेव्यांसंबंधीचा नियम हा : वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून त्यांनी दर्शनमंडपासंबंधाचा सेवाधर्म आचरावा;
25ते पन्नास वर्षांचे झाल्यावर त्यांनी सेवानिवृत्त व्हावे व तेथून पुढे ही सेवा त्यांनी करू नये;
26पण त्यांनी आपल्या भाऊबंदांसह दर्शनमंडपात रक्षकाचे काम करावे, दुसरी काही सेवा करू नये. लेव्यांना सोपवलेल्या कामासंबंधाने तू त्यांचे असे करावे.”
सध्या निवडलेले:
गणना 8: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.