गणना 5
5
अशुद्ध झालेल्या माणसाला छावणीबाहेर काढणे
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की, प्रत्येक महारोगी, प्रत्येक स्रावी आणि प्रेताने अशुद्ध झालेला प्रत्येक जण ह्यांना तुम्ही छावणीबाहेर पाठवून द्यावे;
3मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांना छावणीबाहेर पाठवून द्यावे; त्यांच्यामुळे तुमची छावणी अशुद्ध होता कामा नये, कारण तिच्यामध्ये माझा निवास आहे.”
4इस्राएल लोकांनी त्याप्रमाणे केले, म्हणजे असल्या लोकांना छावणीबाहेर पाठवून दिले; परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.
अपराधाबद्दल होणारा दंड
5परमेश्वर मोशेला म्हणाला, 6“इस्राएल लोकांना असे सांग की, परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून जी पापे मानवप्राणी करतात, त्यांपैकी एखादे पाप कोणा पुरुषाने किंवा स्त्रीने केले आणि ती व्यक्ती दोषी ठरली, 7तर त्या व्यक्तीने स्वतःचे पाप कबूल करावे आणि ज्याचा अपराध केला असेल त्याला आपल्या अपराधाबद्दलची पूर्ण भरपाई करून देऊन त्यात आणखी तिच्या एक पंचमांशाची भर घालावी;
8पण अपराधाबद्दलची भरपाई स्वीकारण्यास त्या मनुष्याचा कोणी वारस नसला तर त्या अपराधाबद्दल परमेश्वराजवळ केलेली भरपाई याजकाची व्हावी; जो प्रायश्चित्ताचा मेंढा त्याच्या प्रायश्चित्तासाठी अर्पण करण्यात येईल त्याशिवाय हीही त्याची व्हावी.
9ज्या पवित्र वस्तू इस्राएल लोक समर्पित केलेला अंश म्हणून याजकाकडे आणतात; त्या सर्व त्याच्याच आहेत.
10प्रत्येक मनुष्याने पवित्र केलेल्या वस्तू याजकाच्याच आहेत; याजकाला काही कोणी देईल ते त्याचेच होईल.”
परप्रेमशंकेविषयी नियम
11परमेश्वर मोशेला म्हणाला,
12“इस्राएल लोकांना सांग : जर कोणा पुरुषाच्या स्त्रीचे पाऊल वाकडे पडून तिने त्याच्याशी विश्वासघात केला,
13म्हणजे कोणा पुरुषाने तिच्याशी कुकर्म केले, आणि ही गोष्ट तिच्या पतीपासून लपली जाऊन प्रकट झाली नाही, आणि ती भ्रष्ट झाली असली तरी तिच्याविरुद्ध कोणी साक्षीदार नसला अथवा कुकर्म करताना तिला पकडले नाही,
14आणि तिच्या पतीच्या मनात परप्रेमशंका उद्भवली, आणि आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्याला संशय येऊन ती जर खरोखर भ्रष्ट झालेली असली अथवा तिच्या पतीच्या मनात परप्रेमशंका उद्भवून आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्याला संशय आला आणि ती वास्तविक भ्रष्ट झालेली नसली,
15तर त्या पुरुषाने आपल्या स्त्रीला याजकाकडे आणावे आणि तिच्यासाठी अर्पण म्हणून एक दशमांश एफा जवाचे पीठ अर्पावे; त्याने त्याच्यावर तेल घालू नये आणि धूप ठेवू नये, कारण परप्रेमशंकेमुळे केलेले म्हणजे अनीतीचे स्मरण करून देणारे हे अन्नार्पण होय.
16मग याजकाने त्या स्त्रीला पुढे नेऊन परमेश्वरासमोर उभे करावे;
17आणि याजकाने मातीच्या पात्रात पवित्र जल घ्यावे आणि निवासमंडपाच्या जमिनीवरची थोडीशी धूळ घेऊन त्यात टाकावी;
18मग याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करून तिच्या डोक्याचे केस सोडावेत आणि परप्रेमशंकेचे स्मरण करून देणारे अन्नार्पण तिच्या हातांवर ठेवावे आणि शापजनक कटू जल याजकाने आपल्या हाती घ्यावे;
19तेव्हा याजकाने त्या स्त्रीला शपथ घालून म्हणावे, कोणा पुरुषाने तुझ्याशी कुकर्म केलेले नसले आणि तू आपल्या पतीला सोडून दुसर्याकडे जाऊन भ्रष्ट झालेली नसलीस, तर तू ह्या शापजनक कटू जलाच्या परिणामापासून मुक्त राहा;
20पण तू आपल्या पतीला सोडून दुसर्याकडे जाऊन भ्रष्ट झालेली असलीस आणि तुझ्या पतीऐवजी परपुरुषाने तुझ्याशी संबंध केलेला असेल तर
21(याजकाने शापजनक शपथ घ्यायला लावावी आणि म्हणावे) ‘परमेश्वर तुझी मांडी सडवील व तुझे पोट फुगवील तेव्हा परमेश्वर तुला लोकांच्या शापाला व तिरस्काराला पात्र करो;
22म्हणजे तुझे पोट फुगवण्यासाठी व तुझी मांडी सडवण्यासाठी हे शापजनक जल तुझ्या आतड्यांत शिरेल.’ ह्यावर त्या स्त्रीने ‘आमेन, आमेन’ असे म्हणावे.
23मग याजकाने हे शापशब्द पुस्तकात लिहून ते त्या कटू जलात धुवावेत;
24आणि ते शापजनक कटू जल त्या स्त्रीला पाजावे; ते शापजनक जल त्या स्त्रीच्या पोटात जाऊन कटुत्व उत्पन्न करील,
25आणि याजकाने ते परप्रेमशंकेचे अन्नार्पण स्त्रीच्या हातून घेऊन परमेश्वरासमोर ओवाळावे आणि वेदीजवळ घेऊन जावे;
26मग याजकाने त्या अन्नार्पणापैकी स्मारकभाग म्हणून मूठभर घेऊन वेदीवर त्याचा होम करावा आणि त्यानंतर स्त्रीला ते पाणी पाजावे.
27त्याने ते पाणी तिला पाजले म्हणजे असे होईल की, जर ती भ्रष्ट झालेली असली म्हणजे तिने आपल्या पतीचा विश्वासघात केलेला असला, तर हे शापजनक जल तिच्या पोटात शिरून कटुत्व उत्पन्न करील; तिचे पोट फुगेल, तिची मांडी सडेल व तिच्या लोकांमध्ये तिचे नाव शापदर्शक ठरेल.
28पण ती स्त्री भ्रष्ट झालेली नसून शुद्ध असली तर ती मुक्त होईल व गर्भधारणेस पात्र होईल.
29स्त्री आपल्या पतीला सोडून परपुरुषाकडे जाऊन भ्रष्ट होईल अशा प्रसंगापासून उद्भवणार्या परप्रेमशंकेचा नियम हाच होय.
30एखाद्या पुरुषाच्या मनात परप्रेमशंका उद्भवली आणि आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्याला संशय आला तर त्याने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे आणि वरील नियमाप्रमाणे याजकाने तिच्यासंबंधाने सर्वकाही करावे.
31मग तो पुरुष अनीतीपासून मुक्त होईल, पण त्या स्त्रीने आपल्या अनीतीची शिक्षा भोगावी.”
सध्या निवडलेले:
गणना 5: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.