YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 25

25
इस्राएल लोक बआल पौराची उपासना करतात
1इस्राएल लोक शिट्टिमात राहत असता ते मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले.
2त्या स्त्रिया त्यांना आपल्या देवांच्या यज्ञांस बोलावू लागल्या; तेथे ते भोजन करून त्यांच्या देवांना नमन करू लागले.
3अशा प्रकारे इस्राएल लोक बआल-पौराच्या भजनी लागले, म्हणून परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला;
4आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “लोकांच्या सर्व प्रमुखांना पकडून परमेश्वराकरता त्यांना भरदिवसा फाशी दे म्हणजे परमेश्वराचा इस्राएलांवर भडकलेला राग जाईल.”
5तेव्हा मोशे इस्राएलांच्या न्यायाधीशांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकाने आपापल्या ताब्यातले जे पुरुष बआल-पौराच्या भजनी लागलेले आहेत त्यांचा वध करावा.”
6त्या वेळेस मोशेसमोर व दर्शनमंडपाच्या दाराशी इस्राएलची सर्व मंडळी जमून रडत असताना एका इस्राएली पुरुषाने एक मिद्यानी बाई त्यांच्यासमक्ष आपल्या भाऊबंदांकडे आणली.
7ते पाहून अहरोन याजकाचा नातू, एलाजाराचा मुलगा फीनहास ह्याने मंडळीतून उठून हातात बरची घेतली,
8आणि तो त्या इस्राएल पुरुषाच्या पाठोपाठ डेर्‍याच्या आतील खोलीत शिरला आणि त्याने त्या उभयतांना, म्हणजे त्या इस्राएल पुरुषाला व त्या बाईला पोटात बरचीने आरपार भोसकले. त्यामुळे इस्राएल लोकांमध्ये पसरलेली मरी थांबली.
9तरी मरीने चोवीस हजार लोक मेले.
10मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
11“इस्राएल लोकांपैकी अहरोन याजकाचा नातू, एलाजाराचा मुलगा फीनहास ह्याने त्यांच्यामध्ये माझ्या ईर्ष्येने पेटून इस्राएल लोकांवरील माझा संताप दूर केला म्हणून मी आपल्या ईर्ष्येने त्यांचा संहार केला नाही.
12म्हणून त्याला असे सांग की, मी त्याच्याशी आपला शांतीचा करार करतो.
13त्याच्यासाठी व त्याच्यामागून त्याच्या संततीसाठी हा निरंतरचा याजकपदाचा करार होय; कारण आपल्या देवाविषयी तो ईर्ष्यावान होऊन त्याने इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त केले.”
14मिद्यानी बाईबरोबर ठार मारण्यात आलेल्या इस्राएली पुरुषाचे नाव जिम्री होते. हा सालूचा मुलगा असून शिमोनी वंशातला आपल्या वडिलांच्या घराण्यातील सरदार होता.
15जिवे मारण्यात आलेल्या मिद्यानी बाईचे नाव कजबी होते; एका मिद्यानी घराण्याचा प्रमुख सूर ह्याची ती मुलगी होती.
16मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
17“मिद्यान्यांचा पिच्छा पुरवून त्यांच्यावर मारा कर;
18कारण पौराच्या बाबतीत व कजबीच्या बाबतीत त्यांनी तुम्हांला भुरळ घालून त्रस्त केले आहे.” कजबी ही एका मिद्यानी सरदाराची मुलगी असून मिद्यान्यांची जातबहीण होती; पौरामुळे मरी उद्भवली त्या दिवशी तिला जिवे मारले.

सध्या निवडलेले:

गणना 25: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन