YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 24

24
1इस्राएलाला आशीर्वाद देणे परमेश्वराला बरे दिसले असे जेव्हा बलामाने पाहिले तेव्हा तो पूर्वीप्रमाणे शकुन पाहायला गेला नाही, तर त्याने आपले तोंड रानाकडे केले.
2बलामाने दृष्टी वर करून पाहिले तर, इस्राएल लोक आपापल्या वंशांप्रमाणे वस्ती करून राहत आहेत असे त्याला दिसले; देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला.
3तो काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला, “बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे;
4जो देवाची वचने श्रवण करतो ज्याला सर्वसमर्थाचे दर्शन घडते; जो दंडवत घालतो, ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे : 5हे याकोबा, तुझे डेरे, हे इस्राएला, तुझे निवासमंडप किती रमणीय आहेत! 6खजुरीच्या विस्तृत बनासारखे, नदीतीरीच्या बागांसारखे, परमेश्वराने लावलेल्या अगरू वृक्षांसारखे, पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत.
7त्याच्या मोटेतून पाणी वाहील. त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल; त्याचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल.
8देवाने त्याला मिसर देशातून बाहेर आणले आहे; त्याचे बळ रानबैलाच्या बळासारखे आहे; तो आपल्या शत्रुराष्ट्रांना ग्रासून टाकील, त्यांच्या हाडांचा चुराडा करील, आपल्या बाणांनी त्यांना छेदून टाकील.
9तो सिंहाप्रमाणे, सिंहिणीप्रमाणे दबा धरून बसला आहे, तो पडून राहिला आहे, त्याला कोण छेडील? जो तुझे अभिष्ट चिंतील, त्याचे अभिष्ट होईल; जो तुला शाप देईल त्याला शाप लागेल.”
बलामाचा संदेश
10तेव्हा बलामावर बालाकाचा क्रोध भडकला; तो हात आपटून बलामाला म्हणाला, “माझ्या शत्रूंना शाप द्यावा म्हणून मी तुला बोलावून आणले, पण तू तर तीनही वेळा त्यांना आशीर्वादच दिलास;
11तेव्हा तू आता येथून पळ आणि आपल्या ठिकाणाकडे जा; ‘तुझा मोठा सन्मान करीन’ असे मी म्हटले होते, पण परमेश्वर तुझ्या सन्मानाला आडवा आला आहे.”
12बलाम बालाकाला म्हणाला, “तू माझ्याकडे पाठवलेल्या दूतांनासुद्धा मी असे सांगितले नव्हते काय की,
13‘बालाकाने आपले घर भरून सोनेरुपे मला दिले तरी परमेश्वराच्या शब्दाबाहेर मला आपल्याच मनाने बरेवाईट काहीही करता येणार नाही, परमेश्वर सांगेल तेच मी बोलेन?’
14पाहा, आता मी आपल्या लोकांकडे जात आहेच, तरी चल, हे लोक शेवटल्या दिवसांत तुझ्या प्रजेचे काय काय करणार आहेत ते तुला सांगून ठेवतो.”
15मग तो आपला काव्यरूपी संदेश पुढे देऊ लागला, “बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे;
16जो देवाची वचने श्रवण करतो, ज्याला परात्पराचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थाचे दर्शन घडते; जो दंडवत घालतो व ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे :
17मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही; त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही; याकोबातून एक तारा उदय पावेल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल, तो मवाबाचा कपाळमोक्ष करील, सर्व बंडखोरांना चीत करील.
18त्याचे शत्रू अदोम व सेईर हे त्याच्या ताब्यात येतील तोवर इस्राएल आपला प्रभाव दाखवील.
19याकोबातून एक नियंता निघेल, तो नगरातल्या उरलेल्या लोकांचा संहार करील.”
20मग अमालेकास उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला, “अमालेक राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होता, पण शेवटी तोही लयास जाईल.”
21मग केनी राष्ट्राला उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला, “तुझे वसतिस्थान तर मजबूत आहे, तुझे घरटे खडकात आहे;
22तरी काइन1 उजाड होईल. अश्शूर तुला बंदिवान करून नेण्यास किती विलंब लावील?”
23तो आपला काव्यरूपी संदेश पुढे चालवून म्हणाला, “हाय! हाय! देव हे घडवून आणील तेव्हा कोणाचा जीव वाचेल?
24तरी कित्ती ह्यांच्या किनार्‍यावरून जहाजे येतील, ती अश्शूरास व एबेरास त्रस्त करतील; तरी शेवटी त्यांचाही नाश होईल.”
25तेव्हा बलाम उठून आपल्या ठिकाणी परत गेला आणि बालाकही मार्गस्थ झाला.

सध्या निवडलेले:

गणना 24: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन