YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 23

23
1मग बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि माझ्यासाठी सात गोर्‍हे व सात मेंढे तयार ठेव.”
2बलामाच्या सांगण्याप्रमाणे बालाकाने केले; आणि बालाक व बलाम ह्यांनी प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला.
3तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, “तू आपल्या होमबलीजवळ उभा राहा, मी जरा जाऊन येतो; कदाचित परमेश्वर मला दर्शन देईल; जे काही तो मला सांगेल ते मी तुला कळवीन.” असे म्हणून तो एका उजाड टेकडीवर गेला.
बलाम इस्राएल लोकांना आशीर्वाद देतो
4देवाने बलामाला तेथे दर्शन दिले, तेव्हा बलाम त्याला म्हणाला, “मी सात वेद्या तयार केल्या आहेत आणि प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला आहे.”
5तेव्हा परमेश्वराने बलामाच्या तोंडी शब्द घातले व म्हटले, “बालाकाकडे परत जा आणि ह्याप्रमाणे बोल.”
6तो त्याच्याकडे परत गेला तेव्हा बालाक व सर्व मवाबी सरदार हे आपल्या होमबलीजवळ उभे होते.
7बलाम काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला, “बालाकाने मला अरामाहून, मवाबाच्या राजाने मला पूर्वेकडील डोंगरवटीहून बोलावून आणले आहे : 8‘ये, मजप्रीत्यर्थ याकोबाला शाप दे. ये, इस्राएलाला धमकी दे.’ ज्याला देवाने शाप दिला नाही त्याला मी शाप कसा देऊ? ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्याला मी धमकी कशी देऊ? 9डोंगरमाथ्यावरून ते माझ्या दृष्टीस पडत आहेत, टेकड्यांवरून मी त्यांना पाहत आहे; पाहा, हे राष्ट्र अलिप्त राहणारे आहे, ते स्वतःला अन्य राष्ट्रांबरोबर गणत नाही.
10याकोबाचे रजःकण कोण मोजू शकेल? इस्राएलाच्या चौथ्या भागाची1 तरी गणती कोण करू शकेल? नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो! माझा अंत त्याच्यासारखा होवो!”
11ह्यावर बालाक बलामाला म्हणाला, “तू माझ्याशी असा का वागलास? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला येथे आणले आणि तू तर त्यांना आशीर्वादच दिलास!”
12त्याने म्हटले, “परमेश्वर जे काही माझ्या मुखात घालील तेवढेच मी जपून बोलले पाहिजे ना?”
13बालाक त्याला म्हणाला, “चल, माझ्याबरोबर दुसर्‍या ठिकाणी ये. तेथून ते तुझ्या दृष्टीस पडतील, पण ते सर्व तुला दिसायचे नाहीत, केवळ कडेकडेचे दिसतील. तेथून माझ्याकरता त्यांना शाप दे.”
14तो त्याला पिसगाच्या माथ्यावरील सोफिमाच्या माळावर घेऊन गेला; तेथे त्याने सात वेद्या बांधल्या व प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला.
15मग बलाम बालाकाला म्हणाला, “तू येथे आपल्या होमबलीजवळ उभा राहा, मी जरा पलीकडे दर्शनास जाऊन येतो.”
16परमेश्वराने बलामाला दर्शन दिले आणि त्याच्या तोंडी शब्द घातले व म्हटले, “बालाकाकडे परत जाऊन त्याला असे बोल.”
17तो त्याच्याकडे परत गेला तेव्हा बालाक मवाबी सरदारांसह होमबलीजवळ उभा होता. आणि बालाकाने त्याला विचारले, “परमेश्वर काय बोलला?”
18तेव्हा बलाम काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला,
19“बालाका, ऊठ, ऐकून घे; सिप्पोरपुत्रा, माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?
20पाहा, आशीर्वाद देण्याची मला आज्ञा झाली आहे; त्याने आशीर्वादच दिला आहे, तो मला मागे घेता येत नाही.
21त्याने याकोबात अनीती पाहिली नाही, त्याला इस्राएलात क्लेश दिसले नाहीत; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर आहे; राजघोष त्याच्यामध्ये होत आहे.
22देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले; जणू काय रानबैलांचे बळ त्यांच्या ठायी आहे.
23याकोबावर काही मंत्रतंत्र चालायचे नाहीत; इस्राएलावर काही चेटूक चालायचे नाही. यथाकाळी याकोब व इस्राएल ह्यांच्याविषयी असे म्हणतील, ‘देवाने केवढे कार्य केले!’
24पाहा, हे राष्ट्र सिंहिणीसारखे उठत आहे. सिंहाप्रमाणे ते उभे राहत आहे; शिकार भक्षण करीपर्यंत, वधलेल्याचे रुधिर प्राशन करीपर्यंत ते बसायचे नाहीत.”
25बालाक बलामाला म्हणाला, “तू त्यांना शापही देऊ नकोस आणि आशीर्वादही देऊ नकोस.
26बलाम बालाकाला म्हणाला, “परमेश्वर सांगेल त्याचप्रमाणे मला केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
27मग बालाक बलामाला म्हणाला, “आता चल, मी तुला दुसर्‍या ठिकाणी नेतो, तेथून तू त्यांना माझ्याकरता शाप द्यावा असे कदाचित देवाला योग्य वाटेल.”
28तेव्हा बालाकाने बलामास रानाच्या कडेला असलेल्या पौर डोंगराच्या माथ्यावर नेले.
29बलाम बालाकाला म्हणाला, “येथे माझ्यासाठी सात वेद्या बांध आणि सात गोर्‍हे व सात मेंढे तयार ठेव.”
30बालाकाने बलामाच्या म्हणण्याप्रमाणे केले; त्याने प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला.

सध्या निवडलेले:

गणना 23: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन