गणना 22
22
बालाक बलामाला बोलावतो
1मग इस्राएल लोकांनी कूच करून यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्वेकडे मवाबाच्या मैदानात तळ दिला.
2इस्राएलांनी अमोर्यांचे काय केले होते ते सर्व सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने पाहिले.
3इस्राएल लोक पुष्कळ आहेत हे पाहून मवाब अतिशय घाबरला; इस्राएल लोकांमुळे तो हवालदिल झाला.
4तेव्हा मिद्यानी लोकांच्या वडील जनांना मवाबी म्हणाले, “बैल जसा शेतातील गवत फस्त करतो तसा हा समुदाय आमच्या भोवतालचे सर्वकाही फस्त करील.” त्या वेळी सिप्पोराचा मुलगा बालाक हा मवाबाचा राजा होता.
5बौराचा मुलगा बलाम आपल्या भाऊबंदांच्या प्रदेशात, फरात नदीकाठच्या पथोर नगरात राहत होता. त्याला बोलावण्यासाठी बालाकाने दूत पाठवून कळवले की, “पाहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्यांनी भूतल झाकून टाकले आहे आणि ते माझ्यासमोर राहत आहेत;
6म्हणून तू अवश्य येऊन माझ्याकरता ह्या लोकांना शाप दे; कारण हे माझ्यापेक्षा प्रबळ आहेत; तू असे केलेस तर कदाचित मी प्रबळ होईन आणि त्यांच्यावर मारा करून त्यांना देशातून घालवून देण्यास समर्थ होईन; कारण मला ठाऊक आहे की, ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला आशीर्वाद मिळतो व ज्याला तू शाप देतोस त्याला शाप लागतो.”
7मग मवाबी वडील व मिद्यानी वडील शकुन पाहण्यासाठी दक्षिणा घेऊन निघाले. त्यांनी बलामाकडे जाऊन त्याला बालाकाचा निरोप सांगितला.
8तेव्हा तो त्यांना म्हणाला, “आज रात्री येथे वस्तीस राहा; परमेश्वर मला सांगेल त्याप्रमाणे मी तुम्हांला उत्तर देईन;” तेव्हा मवाबी सरदार बलामाच्या घरी उतरले.
9नंतर देवाने बलामाकडे येऊन त्याला विचारले, “तुझ्याबरोबर असलेली ही माणसे कोण आहेत?”
10बलामाने देवाला उत्तर दिले, “मवाबाचा राजा, सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने मला असा निरोप पाठवला आहे की,
11‘पाहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्याने भूतल झाकून टाकले आहे; तर आता तू येऊन माझ्याकरता त्यांना शाप दे; तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढून मला त्यांना कदाचित हाकून लावता येईल.”’
12देव बलामास म्हणाला, “तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस व त्या लोकांना शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत.”
13सकाळी उठल्यावर बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, “आपल्या देशाला परत जा, कारण तुमच्याबरोबर यायला परमेश्वराने मला मनाई केली आहे.”
14तेव्हा मवाबी सरदार मार्गस्थ झाले आणि बालाकाकडे जाऊन म्हणाले की, “बलाम आमच्याबरोबर येण्यास कबूल नाही.”
15मग बालाकाने पहिल्यापेक्षा जास्त व अधिक प्रतिष्ठित सरदार पुन्हा पाठवले.
16ते बलामाकडे जाऊन म्हणाले, “सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याची विनंती आहे की, ‘माझ्याकडे येण्यास काही अनमान करू नकोस,
17मी खात्रीने तुझा मोठा सन्मान करीन; तरी तू अवश्य येऊन माझ्याकरता ह्या लोकांना शाप दे.”’
18बलाम बालाकाच्या सेवकांना म्हणाला, “बालाकाने आपले घर भरून सोनेरुपे मला दिले तरी परमेश्वर माझा देव ह्याच्या शब्दाबाहेर मला कमीजास्त काहीएक करता येत नाही.
19तरीपण कृपा करून आज रात्री तुम्ही येथे राहा म्हणजे परमेश्वर मला आणखी काही सांगतो की काय ते मला कळेल.”
20रात्री देव बलामाकडे येऊन त्याला म्हणाला, “हे पुरुष तुला बोलवायला आलेले असतील तर त्यांच्याबरोबर जा; मात्र जे मी तुला सांगेन तेवढेच कर.”
देवाचा दूत आणि बलामाची गाढवी
21बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घालून मवाबी सरदारांबरोबर गेला.
22पण तो गेल्यामुळे देवाचा कोप भडकला आणि त्याला अडवण्यासाठी परमेश्वराचा दूत वाटेत त्याला आडवा आला. बलाम गाढवीवर बसलेला होता आणि बरोबर त्याचे दोन सेवक होते.
23परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन वाटेत उभा असल्याचे त्या गाढवीने पाहिले, तेव्हा ती वाट सोडून शेतात शिरली; तिला पुन्हा वाटेवर आणण्यासाठी बलामाने तिला मारले.
24मग द्राक्षमळ्यांच्या मधल्या अरूंद वाटेवर परमेश्वराचा दूत उभा राहिला. तिच्या दोन्ही बाजूंना कुंपणाच्या भिंती होत्या.
25परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी भिंतीला अशी लगटली की, बलामाचा पाय भिंतीशी चेंगरला, म्हणून त्याने तिला पुन्हा मारले.
26मग परमेश्वराचा दूत आणखी पुढे गेला आणि जेथे उजवीकडे किंवा डावीकडे वळायला मुळीच जागा नव्हती अशा अरुंद ठिकाणी उभा राहिला.
27तेथे परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी बलामासकट खाली बसली म्हणून बलामाने रागाने पेटून आपल्या काठीने तिला झोडपले.
28तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली. ती बलामाला म्हणाली, “मी तुझे काय केले म्हणून तू तीनदा मला मारलेस?”
29बलाम गाढवीला म्हणाला, “तू माझी चेष्टा केलीस; माझ्या हाती तलवार असती तर मी आताच तुला छाटून टाकले असते.”
30गाढवी बलामाला म्हणाली, “तू सुरुवातीपासून जिच्यावर बसत आलास तीच मी तुझी गाढवी आहे ना? तुझ्याशी मी कधी अशी वागले काय?” तो म्हणाला, “नाही.”
31तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन वाटेत उभा आहे हे पाहून बलामाने नमन करून लोटांगण घातले.
32परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “तू तीन वेळा आपल्या गाढवीला का मारलेस? पाहा, तुला अडवण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे, कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते;
33आणि मला पाहून ती गाढवी माझ्यासमोरून तीनदा बाजूला हटली; ती बाजूला हटली नसती तर खात्रीने आताच मी तुला मारून टाकले असते व तिला जिवंत ठेवले असते.”
34बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “मी पाप केले आहे; तू माझ्याविरुद्ध वाटेत उभा आहेस हे मला ठाऊक नव्हते; तुला हे वाईट दिसत असेल तर मी आपला परत जातो.”
35परमेश्वराचा दूत बलामाला म्हणाला, “ह्या मनुष्यांबरोबर जा, मात्र जे शब्द मी तुला सांगेन तेवढेच बोल.” मग बलाम बालाकाच्या सरदारांबरोबर गेला.
बलाम आणि बालाक
36बलाम आल्याचे ऐकून बालाक त्याचे स्वागत करण्यासाठी आर्णोन नदीतीरी देशाच्या अगदी सीमेवर असलेल्या मवाब नगराकडे गेला.
37बालाक बलामाला म्हणाला, “मी तुला मोठ्या निकडीचे बोलावणे पाठवले होते ना? माझ्याकडे का नाही आलास? तुला साजेसा सन्मान करण्यास मी समर्थ नाही काय?”
38बलाम बालाकाला म्हणाला, “पाहा, मी तुझ्याकडे आलो आहे खरा; पण मला स्वतःला काही बोलण्याचे सामर्थ्य आहे काय? जे वचन देव माझ्या तोंडी घालील तेच मी बोलेन.”
39मग बलाम बालाकाबरोबर गेला व ते किर्याथ-हसोथ येथे आले.
40तेथे बालाकाने गुरामेंढरांचे बळी अर्पण केले आणि बलाम व त्याच्याबरोबर असलेल्या सरदारांकडे वाटे पाठवले.
41सकाळी बालाक बलामाला बामोथ-बआलाच्या उंच स्थानी घेऊन गेला व तेथून त्याने इस्राएल लोकांचा जवळचा पसारा पाहिला.
सध्या निवडलेले:
गणना 22: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.