गणना 11
11
परमेश्वर मांस देण्याचे आश्वासन देतो
1मग लोक संकटात सापडल्यासारखे कुरकुर करू लागले; ते परमेश्वराच्या कानी पडले. ते ऐकून परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेऊन छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले.
2तेव्हा लोकांनी मोशेकडे ओरड केली, तेव्हा अग्नी शमला.
3ह्यावरून त्या स्थलाचे नाव तबेरा1 असे पडले, कारण परमेश्वराच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेतला होता.
4त्यांच्यामध्ये जो मिश्र समुदाय होता त्याने सोस घेतला; आणि इस्राएल लोकही पुन्हा रडगाणे गाऊन म्हणाले, “आम्हांला खायला मांस कोण देईल? 5मिसर देशात आम्हांला मासे फुकट खायला मिळत असत त्याची आठवण आम्हांला येते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण ह्यांचीही आम्हांला आठवण येते;
6पण आता आमचा जीव सुकून गेला आहे; येथे ह्या मान्न्याशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही.”
7हा मान्ना धण्यासारखा असून त्याचा रंग मोत्याच्या रंगासारखा होता.
8लोक चोहीकडे फिरून तो गोळा करत. जात्यांत दळीत किंवा उखळांत कुटत आणि मग भांड्यांत शिजवून त्याच्या भाकरी करत; तेलात तळलेल्या पुरीसारखी त्याची चव असे.
9रात्री छावणीवर दव पडले म्हणजे त्याबरोबर मान्नाही पडत असे.
10सर्व कुटुंबांतील लोक आपापल्या तंबूंच्या दारांशी रडताना मोशेने ऐकले; व त्यांच्यावर परमेश्वराचा कोप फार भडकला; मोशेलाही वाईट वाटले.
11मोशे परमेश्वराला म्हणाला, “तू आपल्या दासाला दुःख का देत आहेस? तू ह्या सर्व लोकांचा भार माझ्यावर घालत आहेस, ह्यावरून माझ्यावर तुझी कृपादृष्टी नाही असे दिसते; असे का?
12मी ह्या सर्व लोकांचे गर्भधारण केले आहे काय? ह्यांना मी प्रसवलो आहे काय? ‘जो देश ह्यांच्या पूर्वजांना तू शपथपूर्वक देऊ केला आहेस, त्या देशाकडे, तान्ह्या बाळाला सांभाळून नेणार्या पालक-पित्याप्रमाणे मी ह्यांना उराशी धरून घेऊन जावे’ असे तू मला कसे सांगतोस?
13ह्या सर्व लोकांना पुरवायला मी मांस कोठून आणू? कारण ते माझ्याकडे रडगाणे गात आहेत की, आम्हांला खायला मांस दे.
14मला एकट्याला ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही; ते मला फारच जड जात आहे.
15मला तू असेच वागवणार असलास तर मला एकदाचा मारून टाक; तुझी कृपादृष्टी माझ्यावर असली म्हणजे माझी दुर्दशा मला पाहावी लागणार नाही.”
16परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझ्या माहितीतले इस्राएल लोकांचे जे वडील व अंमलदार आहेत त्यांच्यातून सत्तर जण निवडून त्यांना दर्शनमंडपाजवळ माझ्याकडे घेऊन ये. तेथे त्यांनी तुझ्याबरोबर उभे राहावे.
17मग मी उतरून तेथे तुझ्याशी बोलेन, आणि तुझ्यावर असणार्या आत्म्यातून काही घेऊन त्यांच्यावर ठेवीन म्हणजे तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील; मग तुला एकट्यालाच तो वाहावा लागणार नाही.
18तू लोकांना सांग की, ‘उद्यासाठी तुम्ही स्वतःला शुद्ध करून घ्या म्हणजे तुम्हांला मांस खायला मिळेल.’ ‘आम्हांला खायला मांस कोण देईल आणि मिसर देशात आम्ही आपले बरे होतो,’ हे तुमचे रडगाणे परमेश्वराच्या कानी गेले आहे, म्हणून परमेश्वर तुम्हांला मांस देणार आहे आणि तुम्ही ते खाल.
19तुम्ही ते केवळ एक दिवस, दोन दिवस, पाच दिवस, दहा दिवस, वीस दिवस खाल, एवढेच नव्हे,
20तर तुमच्या नाकातून निघेपर्यंत आणि तुम्हांला शिसारी येईपर्यंत तुम्ही ते महिनाभर खात राहाल; कारण तुमच्यामध्ये वसत असलेल्या परमेश्वराचा तुम्ही त्याग करून त्याच्यासमोर असे रडगाणे गाइले की, आम्ही मिसर देशातून निघालो तरी कशाला?”
21मग मोशे म्हणाला, “ज्या लोकांमध्ये मी आहे त्यांचे पायदळच सहा लाख आहे आणि तू म्हणतोस की, ते महिनाभर खात राहतील एवढे मांस मी त्यांना देईन.
22त्यांना पुरे पडावे म्हणून गुरेढोरे व शेरडेमेंढरे कापावीत काय? अथवा त्यांना पुरे पडावे म्हणून समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावेत काय?”
23परमेश्वर मोशेला म्हणाला, “परमेश्वराचा हात काय तोकडा पडला आहे? माझे म्हणणे तुझ्या प्रत्ययास येते की नाही हे तू आता पाहशील.”
लोकांचे वडील संदेश सांगू लागतात
24मोशेने बाहेर जाऊन लोकांना परमेश्वराचे म्हणणे कळवले; मग त्याने लोकांतल्या वडिलांपैकी सत्तर जण जमवून त्यांना तंबूभोवती उभे केले.
25त्यानंतर परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असणार्या आत्म्यातून काही घेऊन त्याने त्या सत्तर वडिलांवर ठेवला; तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले; पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही.
26त्या वेळी दोघे पुरुष मागे छावणीतच राहिले होते, त्यांतील एकाचे नाव एलदाद व दुसर्याचे नाव मेदाद. त्यांच्यावरही आत्मा उतरला. नोंद झालेल्यांपैकी ते होते, पण ते तंबूकडे गेले नव्हते; ते छावणीतच संदेश सांगू लागले.
27तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला कळवले की, एलदाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत.
28तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा जो तरुणपणापासून मोशेचा सेवक होता1 तो त्याला म्हणाला, “मोशे, माझ्या स्वामी, त्यांना मना कर.”
29मोशे त्याला म्हणाला, “माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेवला असता तर किती बरे झाले असते!”
30मग मोशे इस्राएलाच्या वडील जनांसह छावणीत परतला.
परमेश्वर लावे पक्षी पाठवतो
31नंतर परमेश्वरापासून वाहिलेल्या वार्याने समुद्रावरून लावे आणले; ते छावणीवर व छावणीसभोवती इतके आले की, छावणीच्या मागे व पुढे एकेक दिवसाच्या अंतरापर्यंतच्या प्रदेशात त्यांचा सुमारे दोन हात उंचीचा थर जमला.
32लोकांनी उठून तो सगळा दिवस, सगळी रात्र, दुसराही सगळा दिवस ते लावे गोळा केले; ज्याने सर्वांत कमी गोळा केले त्याचे दहा होमर भरले; आणि त्यांनी ते स्वतःसाठी छावणीच्या चारही बाजूंना पसरून ठेवले.
33ते मांस त्यांच्या तोंडात पडते न पडते, तोच परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व त्याने भयंकर पटकीने त्यांचा संहार केला.
34त्या स्थळाचे नाव ‘किब्रोथ-हत्तव्वा’2 असे पडले, कारण ज्या लोकांनी सोस घेतला त्यांची प्रेते त्या ठिकाणी पुरण्यात आली होती.
35किब्रोथ-हत्तव्वा येथून कूच करून ते हसेरोथ येथे पोहचले; आणि हसेरोथ येथे ते राहिले.
सध्या निवडलेले:
गणना 11: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.