YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 10

10
रुप्याचे कर्णे
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“तू चांदीचे दोन कर्णे बनव; ते घडीव कामाचे असावेत; मंडळीला बोलावण्यासाठी आणि तळ उठवण्यासाठी त्यांचा तू उपयोग करावास.
3हे दोन्ही कर्णे वाजवले म्हणजे सर्व मंडळीने तुझ्यासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ जमावे.
4एकच कर्णा वाजवला तर सरदारांनी म्हणजे इस्राएलाच्या घराण्यातील1 प्रमुखांनी तुझ्यासमोर जमावे.
5कर्ण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेच्या छावण्यांनी कूच करावे;
6असाच दुसर्‍यांदा मोठा गजर केला म्हणजे दक्षिणेच्या छावण्यांनी कूच करावे; कूच करायचे असले तर कर्ण्याचा एक मोठा गजर करावा.
7मंडळी एकत्र बोलवायची असल्यास कर्णा वाजवावा, पण मोठा गजर करू नये.
8अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी हे कर्णे वाजवावेत; हा तुम्हांला पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.
9तुमच्या देशात तुमच्यावर जुलूम करणार्‍या शत्रूंशी तुम्ही लढायला निघाल तेव्हा तुम्ही कर्ण्यांचा मोठा गजर करा; म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याला तुमची आठवण होईल आणि तुमच्या शत्रूंपासून तुमचा बचाव होईल.
10आपल्या आनंदाच्या दिवशी, नेमलेल्या सणांच्या दिवशी आणि प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस आपले होमबली व शांत्यर्पणाचे बली अर्पण करत असताना हे कर्णे वाजवावेत; ते तुमच्या देवाला तुमची आठवण करून देतील; मी परमेश्वर तुमचा देव आहे.”
इस्राएल लोक सीनाय रान सोडून निघतात
11दुसर्‍या वर्षी, दुसर्‍या महिन्याच्या विसाव्या दिवशी साक्षपटाच्या निवासमंडपावरील मेघ वर गेला.
12तेव्हा इस्राएल लोकांनी सीनाय रानातून आपापल्या टप्प्याप्रमाणे कूच केले; नंतर मेघ पारानाच्या रानात स्थिर झाला.
13परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा केली होती तिला अनुसरून त्यांनी पहिले कूच केले.
14पहिल्याने यहूदा वंशाच्या छावणीचे निशाण त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले; अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन त्यांच्या दलावर होता.
15सूवाराचा मुलगा नथनेल हा इस्साखार वंशातील लोकांच्या दलावर होता.
16हेलोनाचा मुलगा अलीयाब जबुलून वंशातील लोकांच्या दलावर होता.
17मग निवासमंडप उतरवल्यावर गेर्षोनाच्या वंशजांनी व मरारीच्या वंशजांनी निवासमंडप उचलून कूच केले.
18त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण, त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले; शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांच्या दलावर होता.
19सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल शिमोन वंशातील लोकांच्या दलावर होता.
20दगुवेलाचा मुलगा एल्यासाप गाद वंशातील लोकांच्या दलावर होता.
21मग कहाथी पवित्रस्थानातले साहित्य उचलून घेऊन निघाले; ते जाऊन पोहचेपर्यंत अगोदरच्यांनी निवासमंडप उभारून ठेवला होता.
22मग एफ्राईम वंशाच्या छावणीचे निशाण, त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले; अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांच्या दलावर होता.
23पदाहसुराचा मुलगा गमलीयेल मनश्शे वंशाच्या लोकांच्या दलावर होता.
24गिदोनीचा मुलगा अबीदान बन्यामीन वंशातील लोकांच्या दलावर होता.
25मग सर्व छावण्यांच्या पाठीमागे असलेल्या दान वंशाच्या छावणीचे निशाण त्यांच्या दलांप्रमाणे निघाले; त्यांचा सेनानायक अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर त्यांच्या दलावर होता.
26आक्रानाचा मुलगा पगीयेल आशेर वंशातील लोकांच्या दलावर होता.
27एनानाचा मुलगा अहीरा नफताली वंशाच्या लोकांच्या दलावर होता.
28ह्या प्रकारे इस्राएल लोक आपापल्या दलाच्या अनुक्रमाने प्रवासात कूच करीत.
29मोशेने आपला सासरा मिद्यानी रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याला म्हटले, “परमेश्वराने आम्हांला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत, तर तू आमच्याबरोबर चल म्हणजे आम्ही तुझे कल्याण करू; ‘कारण इस्राएलाचे कल्याण करीन’ असे परमेश्वर बोलला आहे.”
30होबाब त्याला म्हणाला, “मी नाही येणार; मी आपला देश व आपले आप्त ह्यांच्याकडे जाईन.”
31तेव्हा मोशे त्याला विनवून म्हणाला, “आम्हांला सोडून जाऊ नकोस; कारण ह्या रानात कुठे कुठे तळ द्यावा ह्याची तुला माहिती आहे; म्हणून तू आमचा वाटाड्या हो.2
32तू आमच्याबरोबर आलास तर परमेश्वर जसे आमचे कल्याण करील तसे आम्हीही तुझे कल्याण करू.”
33मग इस्राएल लोक परमेश्वराच्या पर्वतापासून मार्गस्थ होऊन तीन दिवसांची वाट चालून गेले; त्यांच्यासाठी मुक्कामाची जागा हेरण्याकरता परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्यापुढे त्या तीन दिवसांच्या प्रवासात होता.
34ते तळ हलवून मार्गस्थ होत तेव्हा परमेश्वराचा मेघ दिवसा त्यांच्यावर असे.
35कोश पुढे जाण्यास निघाला म्हणजे मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, ऊठ, तुझ्या शत्रूंची दाणादाण होवो आणि तुझे द्वेष्टे तुझ्यापुढून पळून जावोत.”
36कोश थांबला म्हणजे तो म्हणत असे, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या सहस्रावधी लोकांकडे परत ये.”

सध्या निवडलेले:

गणना 10: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन