मी यहूदाच्या सरदारांना कोटावर चढवले आणि त्यांच्या दोन टोळ्या केल्या; त्या स्तोत्रे गात मिरवत चालल्या; त्यांची एक टोळी दक्षिण दिशेने म्हणजे उकिरडावेशीकडे चालली;
आणि तिच्यामागून होशया, यहूदाचे अर्धे अधिकारी,
अजर्या, एज्रा, मशुल्लाम,
यहूदा बन्यामीन, शमया, यिर्मया,
व कित्येक याजकांचे पुत्र कर्णे घेऊन चालले; जखर्या बिन योनाथान बिन शमया बिन मत्तन्या बिन मीखाया बिन जक्कूर बिन आसाफ,
आणि त्याचे भाऊबंद शमया, अजरेल, मिललई, गिललई, माई, नथनेल, यहूदा व हनानी हे देवाचा मनुष्य दावीद ह्याची वाद्ये घेऊन चालले आणि त्यांच्यापुढे एज्रा शास्त्री चालला;
ते झरावेशीकडून नीट दावीदपुराच्या पायर्यांवरून कोटाच्या चढणीवर दाविदाच्या मंदिराच्या वरल्या भागाकडून पूर्वेस पाणीवेशीपर्यंत गेले.
स्तोत्रे म्हणणारी व मिरवत जाणारी दुसरी टोळी त्यांना येऊन मिळण्यास पुढे चालली, आणि तिच्यामागून मी व अर्धे लोक कोटावरील भट्टीबुरुजावरून रुंद कोटापर्यंत,
आणि एफ्राईम वेशीपासून जुन्या वेशीवरून मत्स्यवेस, हनानेल बुरूज व हमया बुरूज ह्यांवरून मेंढेवेशीपर्यंत गेलो; गारद्यांच्या वेशीत ते जाऊन उभे राहिले.
अशा प्रकारे स्तोत्रे म्हणणार्या दोन्ही टोळ्या देवाच्या मंदिरात उभ्या राहिल्या; मी व माझ्याबरोबर अर्धे अधिपतीही उभे राहिले;
याजक एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मीखाया, एल्योवेनय, जखर्या व हनन्या ह्यांनी कर्णे हाती घेतले;
आणि मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर ह्यांनीही कर्णे हाती घेतले; गायकांनी उंच स्वराने गाइले; यिज्रह्या त्यांचा अध्यक्ष होता.
त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला, कारण त्यांनी आनंदीआनंद करावा असे देवाने केले होते; बायकामुलांनीही आनंद केला; यरुशलेमेचा आनंदध्वनी दूर जाऊन पोहचला.