YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहूम 3

3
1रक्तपाती नगरीला धिक्कार असो! कपट व खून ह्यांनी ती भरली आहे, तिचे भक्ष्य मिळवणे थांबत नाही.
2चाबकाचा फटकारा, चाकांचा घडघडाट ह्यांचा शब्द होत आहे; घोडे भरधाव पळत आहेत, रथ उसळत आहेत;
3घोडेस्वारांची दौड, तलवारींची चमक, भाल्यांचे विजेसारखे चकाकणे होत आहे; वधलेल्यांचा समुदाय, मृतांचा ढीग पडला आहे; मढ्यांचा हिशेबच नाही; लोक त्यांच्या मढ्यांवर ठोकर खातात.
4सुरूप व चेटकात निपुण अशा त्या वेश्येच्या बहुत व्यभिचारांमुळे हे घडले आहे; ती आपल्या व्यभिचारांनी राष्ट्रांचा, आपल्या चेटकांनी वंशांचा विक्रय करते.
5पाहा, मी तुझ्यावर चालून येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी तुझे नेसण तुझ्या तोंडावर उडवून देईन; राष्ट्रांना तुझी नग्नता दाखवीन, राज्यांना तुझी लाज दाखवीन.
6तुझ्यावर हेंदर फेकून तुला तुच्छ करीन, तुला उपहासविषय करीन.
7आणि असे होईल की जो कोणी तुला पाहील तो तुझ्यापासून पळ काढील आणि म्हणेल, निनवे उजाड झाली आहे; तिच्यासाठी कोण शोक करील? तुझे सांत्वन करणार्‍यांना कोठून शोधून आणू?
8नोआमोनापेक्षा तू श्रेष्ठ आहेस काय? ती नील नदीच्या फाट्यांमध्ये वसली होती, तिच्यासभोवती पाणी होते; नील नदी2 तिचा दुर्ग होती, पाणी हाच तिचा कोट होता.
9कूशी व मिसरी ह्यांचे तिला बल होते व ते अमर्याद होते; पूटी व लूबी ह्यांची तिला कुमक होती.
10तरी ती हद्दपार झाली, तिला बंदिवान करून नेण्यात आले; तिची मुले रस्त्यांच्या सर्व चवाठ्यांवर आपटून मारण्यात आली; तिच्या सरदारांवर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, तिच्या सर्व महाजनांना साखळ्यांनी बांधण्यात आले.
11तूही झोकांड्या खाशील, तू लपशील, तू शत्रूपासून आश्रयाचे स्थान शोधशील.
12पहिल्या बाराच्या पिकलेल्या अंजिरांच्या झाडाप्रमाणे तुझे सर्व दुर्ग होतील; झाडे हलवली म्हणजे अंजीर खाणार्‍याच्या तोंडी पडतात.
13पाहा, तुझ्यात राहणारे लोक केवळ स्त्रिया आहेत; तुझ्या देशाचे दरवाजे तुझ्या शत्रूंना खुले झाले आहेत; अग्नीने तुझे अडसर खाऊन टाकले आहेत.
14वेढा पडणार म्हणून पाणी भरून ठेव; तुझे किल्ले मजबूत कर, चिखलात उतर, पायांनी गारा तुडव, विटाळे हाती घे.
15तेथे तुला विस्तव खाईल, तुला तलवार नष्ट करील; ती तुला चाटून खाणार्‍या टोळांप्रमाणे खाऊन फस्त करील; चाटून खाणार्‍या टोळांप्रमाणे आपली संख्या वाढव; झुंडींनी येणार्‍या टोळांप्रमाणे असंख्य हो.
16आकाशातील तार्‍यांपेक्षा अधिक सौदागर तू केले आहेत, तरी चाटून खाणारे टोळ त्यांना नागवून उडून जातील.
17तुझे सरदार झुंडींनी येणार्‍या टोळांसारखे आहेत, तुझे सेनापती टोळांच्या झुंडीसारखे आहेत; ते थंडीच्या दिवसांत कुंपणात तळ देतात व सूर्योदय होताच पळून जातात; ते कोठे गेले ते कोणास कळत नाही.
18अश्शूरच्या राजा, तुझे मेंढपाळ झोपी गेले आहेत; तुझे सरदार स्वस्थ पडले आहेत; तुझे लोक डोंगरावर पसरले आहेत; कोणी त्यांना एकत्र करत नाही.
19तुझी जखम भरत नाही; तुझा घाय असाध्य आहे; तुझी बातमी ऐकणारे सर्व तुझ्याविषयी टाळ्या पिटतात; कारण ज्याला तुझी दुष्टता सतत जाचली नाही असा कोण आहे?

सध्या निवडलेले:

नहूम 3: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन