YouVersion लोगो
सर्च आयकॉन

हबक्कूक 1

1
अन्यायाबद्दल हबक्कूकची तक्रार
1हबक्कूक संदेष्ट्याला दृष्टान्ताने प्राप्त झालेले देववचन :
2हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू? तू ऐकत नाहीस. “जुलूम झाला” असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करत नाहीस.
3मला अधर्म का पाहायला लावतोस? विपत्ती मला का दाखवतोस? लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.
4अशाने कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाचे काहीएक चालत नाही; दुष्ट नीतिमानास घेरून सोडतो म्हणून न्याय विपरीत होतो.
खास्दी यहूदाला शिक्षा करतील
5राष्ट्रांनो, लक्ष देऊन पाहा व आश्‍चर्यचकित व्हा. कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास धरणार नाही.
6कारण, पाहा, मी खास्द्यांची उठावणी करतो; ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे; जी स्थले त्यांची नाहीत त्यांचा ताबा घ्यावा म्हणून ते पृथ्वीवर फिरत असतात.
7ते दारुण व भयंकर आहेत; त्यांचा न्याय व त्यांचे वैभव त्यांचे स्वत:चेच आहे.
8त्यांचे घोडे चित्त्यांहून वेगवान आहेत व संध्याकाळी बाहेर पडणार्‍या लांडग्यांपेक्षा क्रूर आहेत; त्यांचे घोडेस्वार दौड करतात, त्यांचे घोडेस्वार दुरून येतात, खाऊन टाकण्यास त्वरा करणार्‍या गरुडासारखे ते धावतात.
9ते बलात्कार करण्यास सर्व मिळून येतात; त्यांच्या तोंडांचा रोख थेट पुढे असतो; वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करतात.
10ते तर राजांना कसपट समजतात व अधिपतींना कवडीमोल मानतात. कोणताही किल्ला असला, तरी तो ते तृणवत गणतात, कारण ते मातीचा ढीग रचून किल्ला सर करतात.
11शेवटी सोसाट्याचा वारा येऊन ते उडून जातील, स्वपराक्रम हाच ज्यांचा देव त्यांच्यावर दोष येईल.
हबक्कूक परमेश्वराजवळ तक्रार करतो
12हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्र प्रभू, तू अनादि काळापासून आहेस ना? आम्ही मरणार नाही.1 हे परमेश्वरा, तू त्यांचा न्याय नेमला आहेस. हे दुर्गा, त्याचे शासन व्हावे म्हणून तू त्याला स्थापले आहेस.
13तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टी लाववत नाही, तो तू ह्या बेइमानी करणार्‍यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून नीतिमान त्याला दुष्ट गिळून टाकतो तेव्हा तू का उगा राहतोस?
14तू मानवांना समुद्रातील माशांप्रमाणे का केले आहेस, कोणी शास्ता नसलेल्या जीवजंतूंप्रमाणे त्यांना का केले आहेस?
15तो त्या सर्वांना गळाने उचलतो, त्यांना आपल्या जाळ्यात धरतो, आपला पाग टाकून त्यांना गोळा करतो; त्यामुळे तो हर्षित व आनंदित होतो.
16तो आपल्या जाळ्यांपुढे यज्ञ करतो, आपल्या पागाला विपुल धूप दाखवतो; कारण त्यांपासून त्याला विपुल धन व पुष्टिकारक अन्न मिळते.
17तर मग तो आपले भरलेले जाळे रिकामे करून राष्ट्रांची काहीएक गय न करता त्यांचा सतत घात करत राहील काय?

सध्या निवडलेले:

हबक्कूक 1: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन