YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 13:14-37

मार्क 13:14-37 MARVBSI

[दानीएल संदेष्ट्याने सांगितलेला] ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ जेथे नसावा तेथे तो उभा असलेला तुम्ही पाहाल (वाचकाने हे समजून घ्यावे), तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. जो धाब्यावर असेल त्याने खाली उतरून अथवा आपल्या घरातून काही घेण्याकरता आत जाऊ नये; आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता परत येऊ नये. त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर किंवा अंगावर पाजणार्‍या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! तरी हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा. कारण देवाने निर्माण केलेल्या ‘सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत झालेल्या नाहीत’ व पुढेही होणार नाहीत ‘इतक्या हालअपेष्टांचे’ ते दिवस होतील. आणि ते दिवस प्रभूने कमी केले नसते तर कोणाही माणसाचा निभाव लागला नसता; परंतु ज्यांना त्याने निवडले आहे त्या निवडलेल्यांसाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत. त्या वेळेस जर कोणी तुम्हांला म्हणेल की, ‘पाहा ख्रिस्त अमुक ठिकाणी आहे,’ ‘पाहा, तमुक ठिकाणी आहे,’ तर ते खरे मानू नका. कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उपस्थित होतील, आणि साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’ तुम्ही तर सावध राहा; मी अगोदरच तुम्हांला सर्वकाही सांगून ठेवले आहे. परंतु ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसांत ‘सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र प्रकाश देणार नाही;’ आकाशातून ‘तारे गळून पडतील व आकाशातील बळे’ डळमळतील. तेव्हा ‘मनुष्याचा पुत्र’ मोठ्या पराक्रमाने व वैभवाने ‘मेघांरूढ होऊन येत असलेला’ दृष्टीस पडेल. त्या वेळेस तो देवदूतांना पाठवून ‘चार दिशांकडून, अर्थात पृथ्वीच्या’ सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत ‘आपल्या निवडलेल्या लोकांना’ एकत्र करील. आता अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डाहळी कोमल झाली आणि तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळच आला आहे हे तुम्हांला कळते. त्याप्रमाणेच ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील तेव्हा तो जवळ, अगदी दाराशी येऊन ठेपला आहे असे समजा. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी ही नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत. आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे. सावध असा, जागृत राहा व प्रार्थना करा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हांला ठाऊक नाही. प्रवासाला जात असलेल्या कोणाएका माणसाने आपले घर सोडतेवेळी आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपाळास जागृत राहण्याची आज्ञा करावी तसे हे आहे. म्हणून जागृत राहा; कारण घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्रीस, कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी हे तुम्हांला माहीत नाही; नाहीतर अकस्मात येऊन तो तुम्हांला झोपा काढत असलेले पाहील. जे मी तुम्हांला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.”

मार्क 13:14-37 साठी चलचित्र