YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 13

13
मंदिराची धूळधाण व युगाची समाप्ती ह्याविषयी येशूचे भविष्य
1मग तो मंदिरातून निघून जात असता एक शिष्य त्याला म्हणाला, “गुरूजी, पाहा, कसे हे चिरे व कशा ह्या इमारती!”
2येशू त्याला म्हणाला, “ह्या मोठ्या इमारती तू पाहतोस ना? जमीनदोस्त केला जाणार नाही असा चिर्‍यावर चिरा येथे राहणार नाही.”
3नंतर तो मंदिरासमोर जैतुनांच्या डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान व अंद्रिया ह्यांनी त्याला एकान्तात विचारले,
4“ह्या गोष्टी कधी घडतील? आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास आल्या म्हणजे काय चिन्ह होईल हे आम्हांला सांगा.”
5येशू त्यांना म्हणू लागला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.
6पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन ‘मीच तो [ख्रिस्त] आहे’ असे म्हणून पुष्कळांची फसगत करतील.
7आणखी तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका; ह्या गोष्टी होणे आवश्यक आहे; परंतु तेवढ्यानेच शेवट होणार नाही.
8कारण, ‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल’. आणि जागोजागी भूमिकंप [व दंगे] होतील व दुष्काळ पडतील; हा तर वेदनांचा प्रारंभ होय.
9तुम्ही आपणांला सांभाळा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, सभास्थानांमध्ये तुम्हांला मार देतील आणि सुभेदार व राजे ह्यांच्यापुढे तुम्ही साक्ष द्यावी म्हणून तुम्हांला माझ्याकरता त्यांच्यासमोर उभे राहावे लागेल.
10प्रथम सर्व राष्ट्रांत सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.
11ते तुम्हांला धरून नेऊन चौकशीकरता स्वाधीन करतील तेव्हा आपण कसे काय बोलावे ह्याविषयी अगोदर चिंता करू नका; तर त्या घटकेस जे काही तुम्हांला सुचवून दिले जाईल ते बोला; कारण बोलणारे तुम्ही आहात असे नाही तर पवित्र आत्मा हाच बोलणारा आहे.
12तेव्हा भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारवण्याकरता धरून देईल आणि ‘मुले आपल्या आईबापांवर उठतील’ व त्यांचा प्राणघात करवतील;
13आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील तोच तारला जाईल.
14[दानीएल संदेष्ट्याने सांगितलेला] ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ जेथे नसावा तेथे तो उभा असलेला तुम्ही पाहाल (वाचकाने हे समजून घ्यावे), तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरांकडे पळून जावे.
15जो धाब्यावर असेल त्याने खाली उतरून अथवा आपल्या घरातून काही घेण्याकरता आत जाऊ नये;
16आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता परत येऊ नये.
17त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर किंवा अंगावर पाजणार्‍या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार!
18तरी हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा.
19कारण देवाने निर्माण केलेल्या ‘सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत झालेल्या नाहीत’ व पुढेही होणार नाहीत ‘इतक्या हालअपेष्टांचे’ ते दिवस होतील.
20आणि ते दिवस प्रभूने कमी केले नसते तर कोणाही माणसाचा निभाव लागला नसता; परंतु ज्यांना त्याने निवडले आहे त्या निवडलेल्यांसाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत.
21त्या वेळेस जर कोणी तुम्हांला म्हणेल की, ‘पाहा ख्रिस्त अमुक ठिकाणी आहे,’ ‘पाहा, तमुक ठिकाणी आहे,’ तर ते खरे मानू नका.
22कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उपस्थित होतील, आणि साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’
23तुम्ही तर सावध राहा; मी अगोदरच तुम्हांला सर्वकाही सांगून ठेवले आहे.
24परंतु ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसांत
‘सूर्य अंधकारमय होईल,
आणि चंद्र प्रकाश देणार नाही;’
25आकाशातून ‘तारे गळून पडतील व
आकाशातील बळे’ डळमळतील.
26तेव्हा ‘मनुष्याचा पुत्र’ मोठ्या पराक्रमाने व वैभवाने ‘मेघांरूढ होऊन येत असलेला’ दृष्टीस पडेल.
27त्या वेळेस तो देवदूतांना पाठवून ‘चार दिशांकडून, अर्थात पृथ्वीच्या’ सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत ‘आपल्या निवडलेल्या लोकांना’ एकत्र करील.
जागृतीची आवश्यकता
28आता अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डाहळी कोमल झाली आणि तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळच आला आहे हे तुम्हांला कळते.
29त्याप्रमाणेच ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील तेव्हा तो जवळ, अगदी दाराशी येऊन ठेपला आहे असे समजा.
30मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.
31आकाश व पृथ्वी ही नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत.
32आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे.
33सावध असा, जागृत राहा व प्रार्थना करा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हांला ठाऊक नाही.
34प्रवासाला जात असलेल्या कोणाएका माणसाने आपले घर सोडतेवेळी आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपाळास जागृत राहण्याची आज्ञा करावी तसे हे आहे.
35म्हणून जागृत राहा; कारण घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्रीस, कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी हे तुम्हांला माहीत नाही;
36नाहीतर अकस्मात येऊन तो तुम्हांला झोपा काढत असलेले पाहील.
37जे मी तुम्हांला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.”

सध्या निवडलेले:

मार्क 13: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन