YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 13:14-37

मार्क 13:14-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जेव्हा तुम्ही नाशाला कारण अशी भयंकर गोष्ट, दानीएल संदेष्ट्याने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ जो जिथे नको तेथे पाहाल. (वाचकाने याचा अर्थ काय तो समजावून घ्यावा) तेव्हा जे यहूदीया प्रांतात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. जो मनुष्य आपल्या घराच्या छतावर असेल त्याने घरातून काही आणण्यासाठी खाली उतरू नये. आणि जर एखादा मनुष्य शेतात असेल तर त्याने आपला झगा आणण्यासाठी माघारी जाऊ नये. त्या दिवसात ज्या स्त्रियांची मुले तान्ही असतील व अंगावर पाजत असतील त्यांच्यासाठी हे अती भयंकर होईल. हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा. कारण त्या दिवासात जो त्रास होईल तो देवाने जग निर्माण केले त्या आरंभापासून तो आजपर्यंत कधीही झाला नसेल व पुन्हा त्यासारखा कधीही होणार नाही, असा असेल. परमेश्वराने जर ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे अशा निवडलेल्या मनुष्यांसाठी ते दिवस त्याने कमी केले आहेत. आणि जर कोणी तुम्हास म्हणेल की ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे,’ तर त्यावर विश्वास ठेवू नका. कारण काही लोक आपण खोटे ख्रिस्त किंवा खोटे संदेष्टे असल्याचा दावा करतील आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांस फसवण्यासाठी चिन्हे व आश्चर्यकर्म करतील. पहा, तेव्हा तुम्ही सावध राहा. मी काळापूर्वीच तुम्हास सर्वकाही सांगून ठेवले आहे. परंतु त्या दिवसात ही संकटे येऊन गेल्यावर, ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही.’ ‘आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील बळे डळमळतील.’ आणि लोक मनुष्याचा पुत्राला मेघांरूढ होऊन मोठ्या सामर्थ्यानिशी आणि वैभवाने येताना पाहतील. नंतर तो आपल्या देवदूतास पाठवील व चार दिशातून, पृथ्वीच्या सीमेपासून ते आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांस एकत्र करील. अंजिराच्या झाडापासून शिका. जेव्हा त्याच्या डहाळ्या कोमल होतात आणि त्यावर पाने फुटतात तेव्हा तुम्हास उन्हाळा जवळ आला हे समजते. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्हास समजेल की, तो काळ अगदीच दाराशी येऊन ठेपला आहे. मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडण्यापूर्वी ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांनाही नाही व पुत्रासही नाही. फक्त पित्याला ठाऊक आहे. सावध असा, प्रार्थनेत जागृत असा कारण ती वेळ केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. ती वेळ अशी आहे की, एक मनुष्य प्रवासास निघते वेळी घर सोडतो आणि त्याच्या प्रत्येक नोकराला काम नेमून देतो. तो पहारेकऱ्यास जागरूक राहण्याची आज्ञा करतो. तसे हे आहे. म्हणून तुम्ही जागे असा, कारण घरधनी केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. तो संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी किंवा सकाळी केव्हा येईल हे तुम्हास माहीत नाही. जर तो अचानक आला तर तुम्हास झोपेत असताना पाहील. मी तुम्हास सांगतो, ते सर्वांना सांगतो, जागृत राहा.”

सामायिक करा
मार्क 13 वाचा

मार्क 13:14-37 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“जेव्हा तुम्ही ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ ज्या ठिकाणी त्याचा संबंध नाही, त्या ठिकाणी उभा असलेला पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे—त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. जो कोणी घराच्या छपरांवर असेल, त्याने घरातून काही आणण्याकरिता प्रवेश करू नये; जो शेतात असेल, त्याने आपला अंगरखा नेण्यासाठी परत जाऊ नये. गर्भवती आणि दूध पाजणार्‍या स्त्रियांसाठी तर तो काळ किती क्लेशाचा असेल! तरी हे हिवाळ्यामध्ये होऊ नये, म्हणून प्रार्थना करा, कारण ते दिवस इतके कष्टाचे असतील की, परमेश्वराने पृथ्वी निर्माण केल्यापासून आजपर्यंत असे दिवस आले नाहीत किंवा पुढेही येणार नाहीत. “जर प्रभूने ते दिवस कमी केले नसते, तर कोणी वाचला नसता. तरी केवळ निवडलेल्या लोकांसाठी, ज्यांना त्यांनी निवडले आहे, त्यांच्यासाठी ते कमी केले जातील. त्या काळात, ‘येथे ख्रिस्त आहे!’ किंवा ‘पाहा, तो तिथे आहे,’ असे जर कोणी तुम्हाला सांगितले, तर अजिबात विश्वास ठेवू नका. कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदय पावतील आणि मोठी चिन्हे व अद्भुते करून, साधेल तर, निवडलेल्या लोकांनाही फसवतील. म्हणून तुम्ही सावध राहा. मी तुम्हाला आधी सर्वकाही सांगून ठेवलेले आहे. “हा भयानक क्लेशांचा काळ संपल्याबरोबर त्या दिवसात, “ ‘सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही; आकाशातून तारे गळून पडतील, आणि आकाशमंडळ डळमळेल.’ “त्यावेळी लोक मानवपुत्राला परमेश्वराच्या उजवीकडे बसलेले आणि सामर्थ्याने व पराक्रमाने आकाशात मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहतील. आणि चारही दिशांकडून, पृथ्वीच्या व आकाशांच्या या टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत त्यांच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी ते आपल्या दूतांस पाठवतील. “आता अंजिराच्या झाडापासून हा बोध घ्या व शिका: त्या झाडाच्या डाहळ्या कोवळ्या झाल्या आणि त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे, हे तुम्ही ओळखता. या घटना घडत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा ते जवळ अगदी दारातच आहे, हे समजून घ्या. मी तुम्हाला निश्चित सांगतो की या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत. “तरीपण त्या दिवसाबद्दल किंवा वेळेबद्दल कोणालाच माहीत नाही, म्हणजे स्वर्गातील दूतांना नाही, पुत्रालाही नाही, ते फक्त पित्यालाच ठाऊक आहे. सावध असा! जागृत राहा! ती वेळ केव्हा येईल, हे तुम्हाला माहीत नाही! हे एका दूरच्या प्रवासावर निघालेल्या मनुष्यासारखे आहे: तो आपले घर सोडतो, त्याच्या दासांना अधिकार देतो, प्रत्येकाला ज्याचे त्याचे काम वाटून देतो आणि तो परत येईपर्यंत बारकाईने लक्ष ठेवावे, असे द्वारपालाला सांगतो. “यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण घराचा मालक कोणत्या दिवशी परत येईल; संध्याकाळी, मध्यरात्री, कोंबडा आरवेल त्यावेळी किंवा पहाटे येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. तो जर एकाएकी आला तर तुम्ही त्याला झोपेत असलेले सापडू नये. मी जे तुम्हाला सांगतो ते प्रत्येकाला सांगत आहेः ‘सावध राहा!’ ”

सामायिक करा
मार्क 13 वाचा

मार्क 13:14-37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

[दानीएल संदेष्ट्याने सांगितलेला] ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ जेथे नसावा तेथे तो उभा असलेला तुम्ही पाहाल (वाचकाने हे समजून घ्यावे), तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. जो धाब्यावर असेल त्याने खाली उतरून अथवा आपल्या घरातून काही घेण्याकरता आत जाऊ नये; आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता परत येऊ नये. त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर किंवा अंगावर पाजणार्‍या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! तरी हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा. कारण देवाने निर्माण केलेल्या ‘सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत झालेल्या नाहीत’ व पुढेही होणार नाहीत ‘इतक्या हालअपेष्टांचे’ ते दिवस होतील. आणि ते दिवस प्रभूने कमी केले नसते तर कोणाही माणसाचा निभाव लागला नसता; परंतु ज्यांना त्याने निवडले आहे त्या निवडलेल्यांसाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत. त्या वेळेस जर कोणी तुम्हांला म्हणेल की, ‘पाहा ख्रिस्त अमुक ठिकाणी आहे,’ ‘पाहा, तमुक ठिकाणी आहे,’ तर ते खरे मानू नका. कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उपस्थित होतील, आणि साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’ तुम्ही तर सावध राहा; मी अगोदरच तुम्हांला सर्वकाही सांगून ठेवले आहे. परंतु ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसांत ‘सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र प्रकाश देणार नाही;’ आकाशातून ‘तारे गळून पडतील व आकाशातील बळे’ डळमळतील. तेव्हा ‘मनुष्याचा पुत्र’ मोठ्या पराक्रमाने व वैभवाने ‘मेघांरूढ होऊन येत असलेला’ दृष्टीस पडेल. त्या वेळेस तो देवदूतांना पाठवून ‘चार दिशांकडून, अर्थात पृथ्वीच्या’ सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत ‘आपल्या निवडलेल्या लोकांना’ एकत्र करील. आता अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डाहळी कोमल झाली आणि तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळच आला आहे हे तुम्हांला कळते. त्याप्रमाणेच ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील तेव्हा तो जवळ, अगदी दाराशी येऊन ठेपला आहे असे समजा. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी ही नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत. आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे. सावध असा, जागृत राहा व प्रार्थना करा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हांला ठाऊक नाही. प्रवासाला जात असलेल्या कोणाएका माणसाने आपले घर सोडतेवेळी आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपाळास जागृत राहण्याची आज्ञा करावी तसे हे आहे. म्हणून जागृत राहा; कारण घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्रीस, कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी हे तुम्हांला माहीत नाही; नाहीतर अकस्मात येऊन तो तुम्हांला झोपा काढत असलेले पाहील. जे मी तुम्हांला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.”

सामायिक करा
मार्क 13 वाचा

मार्क 13:14-37 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

मात्र जेथे ‘ओसाड अमंगल दुश्‍चिन्ह’ नसावे तेथे ते असलेले तुम्ही पाहालविाचकाने हे समजून घ्यार्वें तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. जो छपरावर असेल त्याने घरातून काही घेण्याकरता खाली उतरू नये किंवा आत जाऊ नये, जो शेतात असेल त्याने आपले कपडे घेण्याकरता घरी परत जाऊ नये. त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर असतील किंवा अंगावर पाजणाऱ्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा; कारण देवाने निर्माण केलेल्या सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत झाल्या नाहीत व पुढे होणार नाहीत अशा हालअपेष्टांचे ते दिवस असतील. मात्र ते दिवस प्रभूने कमी केले नसते, तर कोणीही वाचला नसता. ज्यांना त्याने निवडले आहे, त्यांच्यासाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत. त्या वेळेस जर कोणी तुम्हांला म्हणेल, ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे’, किंवा ‘पाहा, ख्रिस्त तेथे आहे’, तर ते खरे मानू नका; कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे पुढे येतील आणि शक्य झाले तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून चिन्हे व अद्भुत गोष्टी दाखवतील. तुम्ही मात्र सावध राहा, मी अगोदरच तुम्हांला सर्व काही सांगून ठेवले आहे. ही अरिष्टे येऊन गेल्यावर त्या दिवसांत सूर्य अंधकारमय होईल; चंद्र आपला प्रकाश देणार नाही. आकाशातून तारे गळून पडतील; आकाशातील शक्ती डळमळतील. तेव्हा मनुष्याचा पुत्र महान सामर्थ्याने व वैभवाने मेघारूढ होऊन येत असलेला दृष्टीस पडेल. त्या वेळेस तो देवदूतांना चोहीकडे पाठवून पृथ्वीच्या परिसीमेपासून स्वर्गाच्या परिसीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करील. अंजिराच्या झाडापासून एक धडा शिकून घ्या. त्याच्या कोवळ्या डाहळ्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला, हे तुम्हांला कळते. त्याचप्रमाणे ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील तेव्हा ती वेळ जवळ, अगदी प्रवेशद्वारांशी येऊन ठेपली आहे, हे तुम्हांला कळेल. मी तुम्हांला निश्‍चितपणे सांगतो, ही पिढी नाहीशी होण्यापूर्वी हे सर्व घडेल. आकाश व पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत. त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांना नाही, पुत्राला नाही, तर केवळ पित्याला माहीत आहे. सावध असा. जागृत राहा कारण तो समय केव्हा येईल, ह्याची तुम्हांला कल्पना नाही. प्रवासाला जात असलेल्या एका माणसाने आपले घर सोडताना आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपालास जागृत राहण्याची आज्ञा करावी, तसे हे आहे, म्हणून जागृत राहा. घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे किंवा सकाळी, हे तुम्हांला माहीत नाही. नाही तर तो अचानक येईल व तुम्हांला झोपलेले पाहील. जे मी तुम्हांला सांगतो, तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.”

सामायिक करा
मार्क 13 वाचा