मत्तय 12
12
शब्बाथाचे पालन
1त्या वेळी एका शब्बाथ दिवशी येशू शेतामधून गेला; तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले.
2हे पाहून परूशी त्याला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत.”
3त्याने त्यांना म्हटले, “दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले?
4म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला, आणि ज्या ‘समर्पित भाकरी’ त्याने व त्याच्याबरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत, तर याजकांनी मात्र खाव्यात, त्या त्यांनी कशा खाल्ल्या, हे तुम्ही वाचले नाही काय?
5किंवा याजक मंदिरात शब्बाथ दिवशी शब्बाथ मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय?
6तरीपण मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा थोर असा कोणीएक येथे आहे.
7‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’, ह्याचा अर्थ तुम्हांला समजला असता तर तुम्ही निर्दोष्यांना दोष लावला नसता.
8कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे.”
वाळलेल्या हाताचा मनुष्य
9नंतर तो तेथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला.
10आणि पाहा, तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता; तेव्हा त्यांनी त्याला दोष लावावा म्हणून त्याला विचारले, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?”
11तो त्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की ज्याचे एकच मेंढरू असून ते शब्बाथ दिवशी खाचेत पडले तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही?
12तर मेंढरापेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे! ह्यास्तव शब्बाथ दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे.”
13मग त्याने त्या माणसाला म्हटले, “तुझा हात लांब कर.” तेव्हा त्याने तो लांब केला आणि तो बरा होऊन दुसर्या हातासारखा झाला.
येशूला ठार मारण्याचा कट
14नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्याचा घात कसा करावा अशी त्याच्याविरुद्ध मसलत केली.
15पण हे ओळखून येशू तेथून निघाला; तेव्हा बरेच लोक त्याच्यामागे चालले व त्या सर्वांना त्याने बरे केले;
16आणि मला प्रकट करू नका अशी त्यांना ताकीद दिली.
17ह्यासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की,
18“पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे;
तो मला परमप्रिय आहे;
त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे;
त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन,
तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील.
19तो भांडणार नाही व ओरडणार नाही,
व रस्त्यांवर त्याची वाणी कोणाला
ऐकू येणार नाही.
20चेपलेला बोरू तो मोडणार नाही, व
मिणमिणती वात तो विझवणार नाही;
तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल,
21आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील.”
सैतानाचे साहाय्य घेतल्याचा आरोप
22मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले; आणि त्याने त्याला बरे केले, तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला.
23तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?”
24परंतु परूशी हे ऐकून म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बाल्जबूल त्याच्या साहाय्याशिवाय हा भुते काढत नाही.”
25येशूने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसांत फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही.
26सैतान जर सैतानाला काढत असेल तर त्याच्यात फूट पडली आहे; मग त्याचे राज्य कसे टिकणार?
27आणि मी जर बाल्जबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील.
28परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भुते काढत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे.
29अथवा बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची चीजवस्तू कोणाला लुटून नेता येईल काय? त्याला बांधले तरच तो त्याचे घर लुटील.
30जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो.
31ह्यास्तव मी तुम्हांला सांगतो की, प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्यांची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही.
32मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही; ह्या युगात नाही व येणार्या युगातही नाही.
33‘झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले’ असे म्हणा; अथवा ‘झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट’ असे म्हणा; कारण फळावरून झाड कळते.
34अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.
35चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो.
36मी तुम्हांला सांगतो की, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल.
37कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील.”
चिन्ह दाखवण्याबाबत येशूला केलेली विनंती
38तेव्हा शास्त्री व परूशी ह्यांच्यापैकी काही जण त्याला म्हणाले, “गुरूजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे.”
39त्याने त्यांना उत्तर दिले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याच्या चिन्हावाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही.
40कारण जसा ‘योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता’ तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.
41निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे.
42दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवील; कारण ती शलमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली; आणि पाहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे.
अपुर्या सुधारणेपासून उद्भवणारे धोके
43अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही.
44मग तो म्हणतो, ‘ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन;’ आणि तेथे गेल्यावर ते त्याला रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे आढळते.
45नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आत्मे आपणाबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे राहतात; मग त्या माणसाची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते; तसेच ह्या दुष्ट पिढीचेही होईल.
प्रभू येशूचे नातलग
46मग तो लोकसमुदायांबरोबर बोलत असता पाहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते.
47तेव्हा कोणीएकाने त्याला सांगितले, “पाहा, आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत.”
48तेव्हा त्याने सांगणार्याला उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?”
49आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ!
50कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई.”
सध्या निवडलेले:
मत्तय 12: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.