YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 11

11
1मग असे झाले की, येशूने आपल्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्यांच्या नगरांत शिकवण्यास व उपदेश करण्यास गेला.
बाप्तिस्मा करणारा योहान
2योहान बंदिशाळेत असताना त्याने ख्रिस्ताच्या कृत्यांविषयी ऐकून आपल्या शिष्यांना पाठवून त्याला विचारले,
3“जे येणार आहेत ते आपणच, की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?”
4येशूने त्यांना उत्तर दिले, “जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा;
5‘आंधळे पाहतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते’;
6जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”
7ते जात असता येशू लोकसमुदायांबरोबर योहानाविषयी बोलू लागला : “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वार्‍याने हलवलेला बोरू काय?
8तर मग काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पाहा, तलम वस्त्रे वापरणारे राजवाड्यात असतात.
9तर मग का गेला होता? संदेष्ट्याला पाहायला काय? मी तुम्हांला सांगतो, हो; संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला.
10‘पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यासमोर पाठवतो,
तो तुझ्यापुढे’ तुझा ‘मार्ग सिद्ध करील,’
असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे.
11मी तुम्हांला खचीत सांगतो की, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही; तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे.
12बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्या दिवसांपासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावत आहेत.
13कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र ह्यांनी संदेश दिले;
14आणि हे पत्करण्याची तुमची इच्छा असेल तर जो एलीया येणार तो हाच आहे.
15ज्याला कान आहेत तो ऐको.
16ह्या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतात,
17‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला,
तरी तुम्ही नाचला नाहीत;
आम्ही आक्रोश केला,
तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाहीत,’
त्यांच्यासारखी ही पिढी आहे.
18कारण योहान खातपीत आला नाही, तर त्याला भूत लागले असे म्हणतात.
19मनुष्याचा पुत्र खातपीत आला; तर त्याच्याविषयी म्हणतात, ‘पाहा, खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र!’ परंतु ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते.”
पश्‍चात्ताप न करणार्‍या शहरांविषयी काढलेले दु:खोद्‍गार
20नंतर ज्या ज्या नगरांमध्ये त्याची पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला :
21“हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन पश्‍चात्ताप केला असता.
22पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सीदोन ह्यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल.
23हे कफर्णहूमा, ‘तू आकाशापर्यंत उंचावलेला होशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील;’ कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते.
24पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सदोमास तुझ्यापेक्षा सोपे जाईल.”
बालसदृश मनोवृत्ती
25त्या वेळी येशू असे बोलू लागला : “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या.
26खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले.
येशूची स्वतःची कामगिरी
27माझ्या पित्याने माझ्या हाती सर्वकाही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल, त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.
28अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.
29मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल.’
30कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”

सध्या निवडलेले:

मत्तय 11: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन