मग त्याने बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना सर्व भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला; आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास व रोग्यांना बरे करण्यास पाठवले. त्याने त्यांना सांगितले, “वाटेसाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकरी किंवा पैका घेऊ नका; अंगरखेही दोन-दोन घेऊ नका. ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल, तेथेच राहा व तेथूनच निघून जा. जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या गावातून निघतेवेळेस आपल्या पायांची धूळ झाडून टाका.” मग ते निघून सर्वत्र सुवार्ता सांगत व रोग बरे करत गावोगावी फिरू लागले. तेव्हा घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी मांडलिक हेरोदाने ऐकले; आणि तो मोठ्या घोटाळ्यात पडला, कारण योहान मेलेल्यातून उठला आहे असे कित्येक जण म्हणत होते; कित्येक ‘एलीया प्रकट झाला आहे’ असे म्हणत होते व कित्येक ‘प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे’ असे म्हणत होते. पण हेरोद म्हणाला, “मी योहानाचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण?” म्हणून त्याला पाहण्याची तो संधी पाहत होता. नंतर प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते ते त्याला सविस्तर सांगितले; तेव्हा तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या गावाकडे एकान्त स्थळी गेला. हे समजल्यावर लोकसमुदाय त्याच्यामागून गेले; तेव्हा त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता, आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना तो बरे करत होता. दिवस उतरू लागला तेव्हा ते बारा प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले, “लोकसमुदायाला निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावांत व शेतामळ्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहोत.” पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन ह्या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आमच्याजवळ काही नाही.” कारण ते सुमारे पाच हजार पुरुष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “सुमारे पन्नास-पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यांना बसवा.” त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांना बसवले. तेव्हा त्याने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. तेव्हा सर्व जण जेवून तृप्त झाले, आणि उरलेले बारा टोपल्या तुकडे त्यांनी उचलून घेतले.
लूक 9 वाचा
ऐका लूक 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 9:1-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ