नंतर त्या दिवसांत एकदा असे झाले की, तो आपल्या शिष्यांसह मचव्यात गेला आणि “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ” असे त्यांना म्हणाला; तेव्हा त्यांनी मचवा सोडला.
नंतर ते हाकारून जात असता तो झोपी गेला; मग सरोवरात मोठे वादळ सुटून मचव्यात पाणी भरू लागले व ते धोक्यात होते.
तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “गुरूजी, गुरूजी, आपण बुडालो!” तेव्हा त्याने उठून वार्यास व पाण्याच्या कल्लोळास धमकावले, आणि ते बंद होऊन निवांत झाले.
तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तुमचा विश्वास कोठे आहे?” ते भयभीत होऊन विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण वारे व पाणी ह्यांनादेखील हा आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात.”
मग ते गालीलाच्या समोरील गरसेकरांच्या प्रदेशात येऊन पोहचले.
तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला, त्याला भुते लागली होती; बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरांतून राहत असे.
तो येशूला पाहून ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, ‘तू मध्ये का पडतोस?’ मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नकोस.”
कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करत होता. त्याने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते; आणि साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहार्यात ठेवलेले असतानाही तो ती बंधने तोडत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे.
येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने म्हटले, “सैन्य”; कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भुते शिरली होती.
ती त्याला विनंती करत होती की, ‘आम्हांला अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नकोस.’
तेथे डुकरांचा मोठा कळप डोंगरात चरत होता; ‘त्यांच्यात आम्हांला जाऊ दे’ अशी त्यांनी त्याला विनंती केली. मग त्याने त्यांना जाऊ दिले.
तेव्हा भुते त्या माणसातून निघून त्या डुकरांत शिरली, आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला.
मग ती चारणारी माणसे हे झालेले पाहून पळाली आणि त्यांनी गावात व शेतामळ्यांत जाऊन हे वर्तमान सांगितले.
तेव्हा जे झाले ते पाहण्यास लोक निघाले, आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भुते निघाली होती तो येशूच्या पायांजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर असलेला त्यांना आढळला; तेव्हा त्यांना भीती वाटली.
ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला, हे त्यांना सांगितले.
तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतांतील सर्व लोकांनी त्याला आपल्या येथून निघून जाण्याची विनंती केली; कारण ते फार घाबरले होते. मग तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला.
तेव्हा ज्या माणसातून भुते निघाली होती तो त्याच्याजवळ अशी मागणी करत होता की, मला आपणाजवळ राहू द्या; परंतु येशूने त्याला निरोप देऊन सांगितले,
“आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठी कृत्ये केली ते सांगत जा.” मग तो आपल्यासाठी येशूने किती मोठी कृत्ये केली होती त्याची गावभर घोषणा करत फिरला.
नंतर येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले; कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते.
तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणीएक मनुष्य आला; तो सभास्थानाचा अधिकारी होता; त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली.
कारण त्याला सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करत होता.
तेव्हा बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली (जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्च केली होती) व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री
त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला.
पण येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?” तेव्हा सर्व जण ‘मी नाही’ असे म्हणत असता पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, “गुरूजी, लोकसमुदाय तुम्हांला दाटी करून चेंगरत आहेत! अन् तुम्ही म्हणता कोणी मला स्पर्श केला?”
पण येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे.”
मग आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणाकरता त्याला शिवलो व कसे तत्काळ बरे झालो, हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले.
तेव्हा तो तिला म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा.”
तो बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकार्याच्या येथून कोणी येऊन त्याला सांगितले, “तुमची मुलगी मरण पावली आहे; आता गुरूजीला श्रम देऊ नका.”
ते ऐकून येशू म्हणाला, “भिऊ नका; विश्वास मात्र धरा म्हणजे ती बरी होईल.”
नंतर त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप ह्यांच्याशिवाय आपल्याबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही.
तिच्यासाठी सर्व जण रडत व शोक करत होते; पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती मेली नाही, झोपेत आहे.”
तरी ती मेली हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले.
मग सर्वांना बाहेर घालवून त्याने तिच्या हाताला धरून, “मुली, ऊठ,” असे मोठ्याने म्हटले.
तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तत्काळ उठली; मग तिला खायला द्यावे म्हणून त्याने आज्ञा केली.
तेव्हा तिचे आईबाप थक्क झाले; पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली.