परंतु तुम्हा ऐकणार्यांस मी सांगतो, तुम्ही आपल्या वैर्यांवर प्रीती करा; जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा; जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या; जे तुमची निर्भर्त्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्यापुढे दुसराही कर; आणि जो तुझा अंगरखा हिरावून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नकोस. जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे आणि जो तुझे काही हिरावून घेतो त्याच्याकडे ते परत मागू नकोस. लोकांनी तुमच्याशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपल्यावर प्रीती करणार्यांवर प्रीती करतात. जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय? पापी लोकही तसेच करतात. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यांना तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकांना उसने देतात. तुम्ही तर आपल्या वैर्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण तो कृतघ्न व दुर्जन ह्यांच्यावरही उपकार करणारा आहे. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही; कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला कोणी दोषी ठरवणार नाही; क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल; द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल; चांगले माप दाबून, हलवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल.” त्याने त्यांना दाखलाही दिला की, “आंधळा आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचेत पडतील की नाही? शिष्य गुरूपेक्षा श्रेष्ठ नाही; पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरूसारखा होईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की, ‘भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे?’ अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगले झाड नाही; तसेच ज्याला चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही. प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखू येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाहीत, आणि रूद्राक्षाच्या झाडांवरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाहीत. चांगला मनुष्य आपल्या अंत:करणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाइटातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार. तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू’ म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही? जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे, हे मी तुम्हांला दाखवतो. तो कोणाएका घर बांधणार्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला; मग पूर आला, तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला तरी त्यामुळे ते हालले नाही; कारण ते मजबूत बांधले होते. परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणार्या माणसासारखा आहे; त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते लगेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला.”
लूक 6 वाचा
ऐका लूक 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 6:27-49
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ