YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 5:12-32

लूक 5:12-32 MARVBSI

पुढे असे झाले की, तो एका गावात असता पाहा, तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता; त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” आणि लगेचच त्याचे कुष्ठ गेले. मग त्याने त्याला निक्षून सांगितले, “कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वत:स ‘याजकाला दाखव,’ आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी अर्पण कर.” तथापि त्याच्याविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले आणि पुष्कळ लोकसमुदाय ऐकण्यास व आपले रोग बरे करून घेण्यास जमू लागले. पण तो अरण्यात अधूनमधून एकान्तात जाऊन प्रार्थना करत असे. एके दिवशी असे झाले की, तो शिक्षण देत असताना गालीलातील प्रत्येक गावाहून आणि यहूदीया व यरुशलेम येथून आलेले परूशी व शास्त्राध्यापक तेथे बसले होते; आणि रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठायी होते. तेव्हा पाहा, कित्येक माणसांनी कोणाएका पक्षाघाती मनुष्याला बाजेवर आणले व त्याला आत नेऊन त्याच्यासमोर ठेवायचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु दाटीमुळे त्याला आत नेण्यास वाव मिळेना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला बाजेसकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. तेव्हा त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, “हे मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” तेव्हा शास्त्री व परूशी असा वादविवाद करून म्हणाले की, “हा दुर्भाषण करणारा कोण आहे? केवळ देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?” येशूने त्यांचे विचार ओळखून त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का करत आहात? ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘उठून चाल’ ह्यांतून कोणते म्हणणे सोपे? परंतु पृथ्वीवर पापांची क्षमा करण्यास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून (तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला), मी तुला सांगतो, ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा.” तेव्हा तो लगेचच त्यांच्यासमक्ष उठून ज्यावर तो पडून होता ते उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णीत आपल्या घरी गेला. तेव्हा ते सर्व अगदी थक्क झाले; ते देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, “आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.” त्यानंतर तो बाहेर पडला, तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो सर्वकाही तेथेच सोडून देऊन उठला व त्याच्यामागे गेला. मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली; त्या वेळी त्यांच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक ह्यांचा मोठा समुदाय जेवायला बसला होता. तेव्हा परूशी व त्यांच्यातील शास्त्री हे त्याच्या शिष्यांविरुद्ध कुरकुर करत त्यांना म्हणाले, “जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर तुम्ही का खातापिता?” येशूने त्यांना उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही तर पापी लोकांना पश्‍चात्तापासाठी बोलवायला आलो आहे.”

लूक 5 वाचा

ऐका लूक 5