लूक 5:12-32
लूक 5:12-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि असे झाले की, येशू कोणाएका गावात असता तेथे कुष्ठाने भरलेला एक मनुष्य होता, जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो पालथा पडला आणि त्यास विनंती केली, “प्रभूजी, जर तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” तेव्हा येशूने आपला हात लांब करून त्यास स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे शुद्ध हो!” आणि ताबडतोब त्याचे कुष्ठ नाहीसे झाले. मग येशूने त्यास निक्षून सांगितले की, “कोणालाही सांगू नकोस, पण जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांच्यासाठी ही साक्ष व्हावी म्हणून मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे शुद्धीकरणासाठी अर्पण कर.” परंतु येशूविषयीच्या बातम्या अधिक पसरतच गेल्या आणि मोठे जमाव त्याचे ऐकण्यासाठी व आपल्या रोगांपासून बरे होण्यासाठी जमू लागले. परंतु येशू रानांमध्ये एकांतात जाऊन प्रार्थना करीत असे. असे झाले की, एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते ते गालील आणि यहूदीया प्रांत व यरूशलेम शहर या भागातील कित्येक ठिकाणाहून आले होते. प्रभूचे सामर्थ्य त्याच्याठायी होते त्यामुळे तो रोग बरे करत असे. काही लोक एका पक्षघात झालेल्या मनुष्यास बाजेवर घेऊन आले आणि त्यांनी त्यास आत आणण्याचा व येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु गर्दीमुळे आत आणण्याचा मार्ग त्यांना सापडेना, म्हणून त्यांनी घराच्या छतावर चढून त्यास बाजे सकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. त्यांचा विश्वास पाहून, येशू म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहेत.” नियमशास्त्राचे शिक्षक आणि परूशी स्वतःशी विचार करू लागले, “हा दुर्भाषण करणारा कोण? देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?” पण येशूने त्यांचे विचार जाणून त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही आपल्या अंतःकरणात असा विचार का करता? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे किंवा ऊठ आणि चालू लाग यांतील कोणते म्हणणे सोपे आहे? पण तुम्हास हे कळावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, म्हणून तो पक्षघात झालेल्या मनुष्यास म्हणाला, मी तुला सांगतो ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा.” ताबडतोब तो उभा राहिला व ज्या बाजेवर तो झोपला होता ती उचलून घेऊन देवाचे गौरव करीत आपल्या घरी गेला. ते सर्व आश्चर्यचकित झाले आणि देवाची स्तुती करू लागले, ते फार भयभीत होऊन म्हणाले, आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत. या गोष्टी झाल्यानंतर येशू बाहेर गेला आणि त्याने लेवी नावाच्या जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले, येशू त्यास म्हणाला, “माझ्यामागे ये!” तेव्हा लेवीने सर्वकाही तेथेच सोडले आणि उठून त्याच्यामागे गेला. नंतर लेवीने त्याच्या घरी येशूसाठी मोठी मेजवानी दिली आणि जकातदारांचा व इतर लोकांचा मोठा जमाव त्याच्याबरोबर जेवत होता. परंतु परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्या शिष्यांकडे तक्रार केली, ते म्हणाले, तुम्ही जकातदार आणि पापी लोकांबरोबर का जेवता? येशू त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, पण जे रोगी आहेत, त्यांना वैद्याची गरज आहे. मी नीतिमानास बोलावण्यास आलो नाही तर पापी लोकांस पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”
लूक 5:12-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू एका गावात असता एक कुष्ठरोगाने भरलेला मनुष्य तिथे आला. त्याने येशूंना पाहिले, तेव्हा त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभू, जर तुमची इच्छा असेल, तर मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.” येशूंनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो!” आणि तत्काळ त्याचा कुष्ठरोग निघून गेला. नंतर येशूंनी त्याला निक्षून सांगितले, “हे कोणाला सांगू नकोस, पण जा, मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे कुष्ठरोग बरे झाल्यानंतर जे अर्पण करावयाचे असते ते कर, म्हणजे तू शुद्ध झाला आहेस, याचे प्रमाण प्रत्येकाला पटेल.” तरीपण येशूंविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले, त्यामुळे त्यांचे ऐकण्यासाठी व रोगमुक्त होण्यासाठी लोकसमुदाय येऊ लागले. परंतु बरेचदा येशू प्रार्थना करण्यासाठी एकांतात जात असत. एके दिवशी येशू शिक्षण देत असताना, परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक तिथे बसले होते. ते गालील आणि यहूदीया प्रांतातील प्रत्येक खेड्यातून, तसेच यरुशलेमातूनही आले होते. आजारी लोकांना निरोगी करण्याचे प्रभूचे सामर्थ्य येशूंच्या ठायी होते. काही लोकांनी एका पक्षघाती मनुष्याला खाटेवर घेऊन त्याला घरात येशूंच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा गर्दी असल्यामुळे ते मार्ग काढू शकले नाहीत, म्हणून ते छतावर चढले आणि घराच्या कौलातून त्यांनी त्याला अंथरुणासहित येशूंच्या पुढे गर्दीमध्ये खाली सोडले. जेव्हा येशूंनी त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा ते म्हणाले, “मित्रा, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” यावेळी परूशी व नियमशास्त्र शिक्षक आपसात विचार करू लागले, “दुर्भाषण करणारा हा कोण आहे? परमेश्वराशिवाय पापांची क्षमा कोण करू शकतो?” ते काय विचार करीत होते हे येशूंनी ओळखले आणि त्यांना विचारले, “तुम्ही तुमच्या मनामध्ये या गोष्टींचा विचार का करता? यातून कोणते म्हणणे सोपे आहे ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपली बाज उचलून चालू लाग?’ तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.” त्याचवेळी तो त्यांच्यासमोर उभा राहिला आणि ज्या बिछान्यावर तो झोपत असे, ते घेऊन परमेश्वराची स्तुती करीत घरी गेला. सर्व लोक चकित झाले आणि त्यांनी परमेश्वराची स्तुती केली. तेव्हा सर्वांना भय प्राप्त झाले व म्हणाले, “आज आम्ही अद्भुत गोष्टी पाहिल्या आहेत.” नंतर येशू तिथून बाहेर गेले व जकातीच्या नाक्यावर एक जकातदार ज्याचे नाव लेवी होते तो त्यांच्या दृष्टीस पडला. येशू त्याला म्हणाले, “माझ्यामागे ये.” तेव्हा लेवी उठला व सर्वकाही टाकून त्यांना अनुसरला. नंतर लेवीने आपल्या घरी येशूंसाठी एक भव्य मेजवानी आयोजित केली. त्या ठिकाणी लेवीचे अनेक सहकारी जकातदार आणि इतर पाहुणे येशूंबरोबर भोजन करत होते. तरी त्या पंथाचे परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक यांनी शिष्यांजवळ तक्रार केली, “तुम्ही जकातदार व पापी लोकांबरोबर खाणे व पिणे का करता?” येशूंनी त्यांना उत्तर दिले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनास पश्चात्तापासाठी बोलविण्यास आलो आहे.”
लूक 5:12-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पुढे असे झाले की, तो एका गावात असता पाहा, तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता; त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” आणि लगेचच त्याचे कुष्ठ गेले. मग त्याने त्याला निक्षून सांगितले, “कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वत:स ‘याजकाला दाखव,’ आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी अर्पण कर.” तथापि त्याच्याविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले आणि पुष्कळ लोकसमुदाय ऐकण्यास व आपले रोग बरे करून घेण्यास जमू लागले. पण तो अरण्यात अधूनमधून एकान्तात जाऊन प्रार्थना करत असे. एके दिवशी असे झाले की, तो शिक्षण देत असताना गालीलातील प्रत्येक गावाहून आणि यहूदीया व यरुशलेम येथून आलेले परूशी व शास्त्राध्यापक तेथे बसले होते; आणि रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठायी होते. तेव्हा पाहा, कित्येक माणसांनी कोणाएका पक्षाघाती मनुष्याला बाजेवर आणले व त्याला आत नेऊन त्याच्यासमोर ठेवायचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु दाटीमुळे त्याला आत नेण्यास वाव मिळेना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला बाजेसकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. तेव्हा त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, “हे मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” तेव्हा शास्त्री व परूशी असा वादविवाद करून म्हणाले की, “हा दुर्भाषण करणारा कोण आहे? केवळ देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?” येशूने त्यांचे विचार ओळखून त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का करत आहात? ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘उठून चाल’ ह्यांतून कोणते म्हणणे सोपे? परंतु पृथ्वीवर पापांची क्षमा करण्यास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून (तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला), मी तुला सांगतो, ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा.” तेव्हा तो लगेचच त्यांच्यासमक्ष उठून ज्यावर तो पडून होता ते उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णीत आपल्या घरी गेला. तेव्हा ते सर्व अगदी थक्क झाले; ते देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, “आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.” त्यानंतर तो बाहेर पडला, तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो सर्वकाही तेथेच सोडून देऊन उठला व त्याच्यामागे गेला. मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली; त्या वेळी त्यांच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक ह्यांचा मोठा समुदाय जेवायला बसला होता. तेव्हा परूशी व त्यांच्यातील शास्त्री हे त्याच्या शिष्यांविरुद्ध कुरकुर करत त्यांना म्हणाले, “जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर तुम्ही का खातापिता?” येशूने त्यांना उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलवायला आलो आहे.”
लूक 5:12-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
एकदा येशू एका गावी असता तेथे कुष्ठरोगाने भरलेला एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालथे पडून विनंती केली, “प्रभो, आपली इच्छा असली, तर मला बरे करायला आपण समर्थ आहात.” तेव्हा येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” तत्काळ त्याचे कुष्ठ नाहीसे झाले. त्याने त्याला निक्षून सांगितले, “कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि मोशेने नेमून दिल्याप्रमाणे बलिदान अर्पण कर.” तथापि त्याच्याविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले. विशाल लोकसमुदाय त्याचे प्रबोधन ऐकायला व आपले रोग बरे करून घ्यायला जमत असत. मात्र तो एकांत स्थळी जाऊन प्रार्थना करीत असे. एके दिवशी तो बोध करीत असताना गालीलमधील प्रत्येक गावाहून आणि यहुदिया व यरुशलेम येथून आलेले परुशी व धर्मशास्त्राध्यापक तेथे बसले होते. रोग बरे करण्याचे सामर्थ्य येशूकडे होते. काही माणसांनी एका पक्षाघाती मनुष्याला खाटेवर आणले व त्याला आत नेऊन त्याच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केला. परंतु गर्दीमुळे त्याला आत नेण्यास वाव मिळेना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला छपरावरून येशूच्यासमोर खाटेसकट खाली उतरवले. त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, “मित्रा, तुझ्या पापांची तुला क्षमा मिळाली आहे.” तेव्हा शास्त्री व परुशी असा विचार करू लागले, “दुर्भाषण करणारा हा कोण आहे? परमेश्वराशिवाय पापांची क्षमा करणारा हा कोण?” येशूने त्यांचे विचार ओळखून त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपल्या मनात असे विचार का करीत आहात? ‘तुझ्या पापांची तुला क्षमा मिळाली आहे’ किंवा ‘उठून चाल’, ह्यातले कोणते म्हणणे सोपे आहे? तथापि पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार मनुष्याच्या पुत्राला आहे, हे तुम्हांला समजावे म्हणून” - तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला, - “मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन घरी जा.” तो लगेच त्यांच्यासमक्ष उठून ज्या खाटेवर तो पडून होता ती उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णन करीत आपल्या घरी गेला. ते सर्व अगदी थक्क झाले. त्यांनी देवाचा गौरव केला आणि ते विस्मित होऊन म्हणाले, आज आम्ही विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत. त्यानंतर येशू बाहेर पडला, तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” तो उठला व सर्व काही सोडून त्याच्यामागे गेला. नंतर लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली. त्या वेळी जकातदार व दुसरे लोक ह्यांचा मोठा समुदाय तेथे जेवायला बसला होता. काही परुशी व त्यांचे शास्त्री हे येशूच्या शिष्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले, “जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता?” येशूने उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना नव्हे तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलवायला आलो आहे.”