YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 4:1-15

लूक 4:1-15 MARVBSI

येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला, आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले; तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसांत त्याने काही खाल्ले नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा सैतान त्याला म्हणाला, “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यास ‘भाकर हो’ असे सांग.” येशूने त्याला उत्तर दिले : “‘मनुष्य केवळ भाकरीने नाही, तर देवाच्या प्रत्येक वचनाने’ जगेल असे लिहिले आहे.” मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली; आणि त्याला म्हटले, “ह्यांच्यावरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपवून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल.” येशूने त्याला उत्तर दिले, “‘[अरे सैताना, माझ्या मागे हो, कारण,] परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर,’ असे शास्त्रात लिहिले आहे.” नंतर त्याने त्याला यरुशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी टाक, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल.’ आणि ‘तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.”’ येशूने त्याला उत्तर दिले की, “‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस’ असे सांगितले आहे.” मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देई आणि सर्व जण त्याचा महिमा वर्णन करीत.

लूक 4 वाचा

ऐका लूक 4