YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 38

38
देव ईयोबाला त्याचे अज्ञान पटवून देतो
1तेव्हा परमेश्वराने वावटळीतून ईयोबाला उत्तर दिले; तो म्हणाला,
2“अज्ञानाचे शब्द बोलून दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा हा कोण?
3आता मर्दाप्रमाणे आपली कंबर बांध; मी तुला हे विचारतो; मला सांग.
4मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग.
5तिचे मोजमाप कोणी ठरवले बरे? तिला मापनसूत्र कोणी लावले? हे तुला ठाऊक आहे काय?
6तिच्या स्तंभाचा पाया कशावर घातला? तिची कोनशिला कोणी बसवली?
7त्या समयी प्रभातनक्षत्रांनी मिळून गायन केले. व सर्व देवकुमारांनी जयजयकार केला.
8समुद्र उफाळून गर्भाशयातून पडावा असा बाहेर पडला, तेव्हा त्याला कवाडे लावून तो कोणी अडवला?
9त्या समयी मी त्याला मेघवस्त्राचे पांघरूण घातले, दाट अभ्रांचे त्याला बाळंते केले;
10मी त्याची मर्यादा फोडून काढली आणि त्याला अडसर व दरवाजे लावले;
11आणि मी म्हणालो, ‘तू येथवरच ये; ह्यापलीकडे तू येता कामा नये; येथे तुझ्या उन्मत्त लहरी थांबल्या पाहिजेत.’
12तू जन्मात कधी प्रातःसमयाचे नियमन केले आहेस काय? प्रभातेला आपले स्थान दाखवून दिले आहेस काय?
13ह्यासाठी की त्याने पृथ्वीच्या दिगंतास धरून तिच्यावरील दुष्टांना झटकून टाकावे;
14तेव्हा मुद्रेच्या ठशाने जसा मातीला आकार येतो, तसा प्रभातेने पृथ्वीचा आकार व्यक्त होतो; सर्व वस्तू जशा काय त्याच्या पेहरावाप्रमाणे ठळक दिसतात.
15दुष्टांकडून त्यांचा प्रकाश काढून घेतला जाईल; त्यांचा उगारलेला हात मोडतो.
16समुद्राच्या झर्‍यापर्यंत तुझा कधी रिघाव झाला आहे काय? सागराच्या खोल प्रदेशी तू कधी भ्रमण केले आहेस काय?
17मृत्यूची द्वारे तुला प्रकट झाली आहेत काय? तू अधोलोकाची द्वारे पाहिली आहेत काय?
18पृथ्वीच्या विस्ताराचे तुला आकलन झाले आहे काय? तुला हे सर्व ठाऊक असेल तर सांग.
19प्रकाश वसतो तिकडची वाट कोणती? अंधकाराचे स्थान कोठे आहे?
20त्याला त्याच्या प्रदेशात सीमेपर्यंत नेऊन तुला पोचवता येईल काय? त्याच्या गृहाच्या वाटा तू ओळखतोस काय?
21हे सर्व तुला ठाऊक असेलच; कारण त्या वेळी तू जन्मला असावास; तू बहुत दिवसांचा म्हणायचा.
22तू हिमाच्या भांडारात जाऊन शिरला आहेस काय? तू गारांची भांडारे पाहिली आहेत काय?
23ती मी संकटसमयासाठी, लढाई व युद्ध ह्यांच्या प्रसंगासाठी राखून ठेवली आहेत.
24प्रकाशाची वाटणी कशी झाली आहे? पूर्वेचा वारा पृथ्वीवर कसा पसरतो?
25पर्जन्याचा लोट खाली यावा म्हणून पाट कोण फोडतो? गर्जणार्‍या विद्युल्लतेला मार्ग कोणी करून दिला?
26अशासाठी की निर्जन प्रदेशात, मनुष्यहीन अरण्यात पाऊस पडावा,
27उजाड व वैराण प्रदेश तृप्त करावा, कोवळी हिरवळ उगवेशी करावी.
28पर्जन्याला कोणी पिता आहे काय? दहिवरबिंदूंना कोण जन्म देतो?
29हिम कोणाच्या गर्भाशयातून निघते? आकाशातील हिमकणांना कोण जन्म देतो?
30जल थिजून पाषाणाप्रमाणे घट्ट होते; जलाशयाचा पृष्ठभाग गोठून जातो.
31कृत्तिकांचा गुच्छ तुला गुंफता येईल काय? मृगशीर्षाचे बंध तुला सोडता येतील काय?
32राशिचक्र योग्य समयी तुला उदयास आणता येईल काय? सप्तऋषींना त्यांच्या समूहासह तुला मार्ग दाखवता येईल काय?
33आकाशमंडळाचे नियम तुला माहीत आहेत काय? पृथ्वीवर त्याची सत्ता तुला नेमून देता येईल काय?
34तुझ्यावर विपुल जलवर्षाव व्हावा म्हणून मेघांना तुला पुकारून सांगता येईल काय?
35विद्युल्लता तुझ्या आज्ञेत आहेत काय? आणि त्या येऊन, ‘काय आज्ञा,’ असे तुला म्हणतात काय?
36घनमेघांत अक्कल कोणी घातली? अभ्रांना समज कोणी दिली?
37कोणाला आपल्या बुद्धिसामर्थ्याने मेघांची हजेरी घेता येते? आकाशाचे बुधले कोण ओततो?
38तेव्हा धूळ भिजून गोळा बनतो. व ढेकळे विरघळून एकमेकांना चिकटून जातात.
39तुला सिंहिणीची शिकार करता येते काय? तरुण सिंहाची क्षुधा तुला तृप्त करता येते काय?
40ते गुहांत दबा धरून बसतात, जाळीत दडून टपून बसतात.
41कावळ्याची पिले देवाला हाका मारतात; ती अन्नान्न करीत चोहोकडे भटकतात.

सध्या निवडलेले:

ईयोब 38: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन