YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 31

31
ईयोब स्वत:च्या प्रामाणिकपणाचे समर्थन करतो
1“मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?
2वरून देवाकडून काय वाट्यास येणार? ऊर्ध्वलोकाहून कोणते वतन सर्वसमर्थ भोगायला लावणार?
3दुष्टाला विपत्ती व दुष्कर्म्याला अनर्थ प्राप्त होत नाही काय?
4माझे सर्व मार्ग तो पाहत नाही काय? माझी सर्व पावले तो गणत नाही काय?
5मी असत्याची सोबत केली असली, माझ्या पायांनी कपटाकडे धाव घेतली असली,
6तर त्याने मला न्यायाच्या ताजव्यात तोलावे; देवाला माझी सात्त्विकता कळून येऊ द्या.
7माझे पाऊल आडमार्गावर पडले असले, माझ्या मनाने माझ्या डोळ्यांमागून धाव घेतली असली, माझ्या हातांना काही डाग लागला असला,
8तर मी पेरले ते दुसरा खावो; लोक माझ्या शेतातले पीक उपटून टाकोत;
9माझे मन कोणा स्त्रीला पाहून मोहित झाले असले, मी आपल्या शेजार्‍याच्या दाराशी टपून बसलो असलो,
10तर माझी स्त्री दुसर्‍याचे दळणकांडण करो; परके तिला ओणवी करोत.
11कारण हे दुष्कर्म आहे; हा न्यायाधीशांनी शिक्षा करण्याजोगा गुन्हा आहे.
12कारण हा कामाग्नी भस्म करून नाशाप्रत नेतो; त्याच्या पायी माझी सर्व मालमत्ता समूळ नष्ट झाली असती.
13माझा दास व दासी माझ्याशी वाद करीत असता, मी त्यांचा हक्क तुच्छ लेखला असता,
14तर देव माझा न्याय करायला उठल्यास मी काय केले असते? त्याने झाडा घेतला असता तर मी काय जाब दिला असता?
15ज्याने मला गर्भाशयात निर्माण केले त्याने त्यालाही नाही का केले? आम्हा दोघांनाही गर्भाशयात एकानेच नाही का घडवले?
16मी कंगालांचा आशाभंग केला असला, विधवेचे डोळे शिणवले असले,
17मी आपला भाकरतुकडा एकट्यानेच खाल्ला असला, त्यातला काही पोरक्याला दिला नसला,
18(माझ्या बाळपणापासून बापाकडे जसा मुलगा तसा तो माझ्याजवळ लहानाचा मोठा झाला आहे, लहानपणापासून मी विधवेचा सांभाळ करीत आलो आहे.)
19अथवा कोणी वस्त्रावाचून मरत आहे, कोणा दरिद्र्यास पांघरूण नाही हे पाहून,
20त्यांना मी आपल्या मेंढरांच्या लोकरीची वस्त्रे दिली नसली, त्यांच्या अवयवांना ऊब येईलसे करून त्यांचा आशीर्वाद घेतला नसला,
21वेशीवर कोणी आपल्या पक्षाचा आहे हे पाहून मी पोरक्यावर आपला हात उचलला असला;
22तर माझी खवाटे पाठीतून निखळून पडोत, माझे हात खांद्यांच्या सांध्यातून मोडून पडोत.
23देवापासून येणार्‍या विपत्तीचा मला धाक असे; त्याच्या प्रभावापुढे माझे काही चालत नसे.
24जर मी सुवर्णावर भरवसा ठेवला असता, तुझ्यावर माझी भिस्त आहे असे सुवर्णास म्हटले असते,
25जर माझे धन बहुत आहे, माझ्या हातांनी फार कमाई केली आहे, ह्याचा मी आनंद केला असता,
26जर सूर्याला प्रकाशताना पाहून, चंद्राला थाटाने भ्रमण करताना पाहून,
27माझे मन गुप्तपणे मोहित झाले असते, आणि आपल्या हाताचे चुंबन घेऊन मी त्यांना नमन केले असते,
28तर हाही न्यायाधीशांपुढे नेण्याजोगा गुन्हा झाला असता; अशाने ऊर्ध्वलोकाच्या देवाशी मी दगा केला असे झाले असते.
29माझ्या द्वेष्ट्याचा नाश झालेला पाहून मला आनंद वाटला असता, त्याच्यावर अरिष्ट आले हे पाहून मला उल्हास वाटला असता,
30(त्याचा प्राणनाश व्हावा असा शाप मागून मी आपल्या जिव्हेस पाप करू दिले नाही,)
31‘ह्याच्या घरी मांसान्नाने तृप्ती झाली नाही असा एक तरी आढळेल,’ असे माझ्या डेर्‍यातल्या लोकांनी म्हटले नसेल,
32(कोणा परक्याला माझ्या दाराबाहेर बिर्‍हाड करून राहण्याची पाळी आली नाही; वाटसरूला माझे दार खुले असे.)
33-34जनसमूहाला भिऊन, कुलीन घराणी मला नावे ठेवतील ह्याचा धाक वाटून मी गपचूप राहिलो व घराबाहेर पडलो नाही, माणसांसारखे1 मी आपल्या अपराधावर झाकण घातले असते, माझे पाप मनातल्या मनात लपवले असते तर,
35माझे कोणी ऐकणारा असता तर किती बरे होते! (हेच माझे दस्तखत; सर्वसमर्थाने मला जाब द्यावा;) माझ्या प्रतिवाद्याचा लेखी आरोप दाखल झाला असता तर बरे झाले असते.
36तो मी आपल्या खांद्यावर वागवला असता; शिरोभूषणाप्रमाणे तो डोक्याला वेष्टला असता.
37मी पावलापावलाचा हिशोब त्याला दिला असता; त्याच्याजवळ मी सरदारासारखा गेलो असतो.
38माझ्या शेताने माझ्याविरुद्ध गार्‍हाणे केले असेल, त्याच्या सर्व तासांनी मिळून आक्रोश केला असेल,
39मोबदला दिल्यावाचून त्यातले पीक मी खाल्ले असेल, त्याच्या मालकाच्या प्राणोत्क्रमणास कारण झालो असेन,
40तर त्यात गव्हाच्या ऐवजी काटेधोतरे, जवाच्या ऐवजी कुसळे उगवोत.” येथे ईयोबाचे भाषण समाप्त झाले.

सध्या निवडलेले:

ईयोब 31: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन