YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 30

30
आपल्या शोचनीय परिस्थितीबद्दल ईयोब दु:खित होतो
1“असे असूनही आता जे माझ्याहून अल्प वयाचे आहेत, ज्यांच्या वडिलांची लायकी माझ्या मेंढ्याबकर्‍या राखण्यास कुत्रे म्हणून ठेवण्याचीही मी समजत नसे, ते माझी टवाळी करतात;
2ज्यांचे वीर्य नष्ट झाले आहे, त्यांच्या बाहुबलाचा मला काय उपयोग?
3ते दुर्भिक्षाने व उपासमारीने दुबळे झाले आहेत; भयाण व वैराण प्रदेशात मिळेल ते चावून ते गुजारा करीत आहेत.
4ते झाडीच्या आसपासची लोण खुडून घेतात; रतम झाडाच्या मुळांवर ते निर्वाह करीत आहेत.
5लोकांमधून त्यांना घालवून देतात; जशी चोराच्या मागून तशी त्यांच्यामागून लोक ओरड करतात.
6उदासवाण्या खोर्‍यात, जमिनीच्या विवरात व कपारीत त्यांना राहावे लागते.
7झाडीमध्ये ते रेंरें करीत बसतात; खाजकुयलीच्या खाली ते पडून राहतात.
8ते मूढांचे किंबहुना अधमांचे वंशज आहेत; त्यांना देशातून हाकून दिले आहे.
9हे लोक माझ्या निंदेची गाणी गातात; माझे नाव ज्याच्या-त्याच्या तोंडी झाले आहे.
10ते मला अमंगळ मानतात, माझ्या वार्‍यालाही उभे राहत नाहीत, माझ्या तोंडावर थुंकायला चुकत नाहीत;
11कारण देवाने माझ्या आयुष्याची दोरी ढिली करून मला दु:ख दिले आहे; म्हणून ते माझ्यासमोर आपल्या तोंडाचा लगाम झुगारून देतात.
12बाजारबुणगे माझ्यावर उजवीकडून गर्दी करतात, माझे पाय ढकलून देतात, ते माझ्या नाशाचे मोर्चे रचतात.
13ते माझ्या मार्गाची नासाडी करतात, ज्यांना कोणी साहाय्य नाही, तेदेखील माझ्या नाशास साहाय्य होतात.
14खिंडारातून शिरकाव करणार्‍याप्रमाणे ते चालून येतात. कोसळून पडलेल्या ढिगारांतून ते माझ्यावर लोटतात.
15माझ्यावर घोर प्रसंग ओढवले आहेत; माझी प्रतिष्ठा ते वायूप्रमाणे उडवून देत आहेत; माझे सौख्य अभ्राप्रमाणे विरले आहे.
16माझ्या जिवाचे आता पाणीपाणी झाले आहे; दु:खाच्या दिवसांनी मला पछाडले आहे.
17रात्रीच्या समयी माझी हाडे पिचून गळतात; मला कुरतडणार्‍या वेदना थांबत नाहीत.
18व्याधीच्या मोठ्या वेगामुळे माझा झगा विस्कळीत झाला आहे; सदर्‍याच्या गळ्याप्रमाणे तो अंगाला जखडून बसतो.
19त्याने मला चिखलात लोटून दिले आहे; धूळ व राख ह्यांच्यासारखा मी झालो आहे.
20मी तुझा धावा करतो, पण तू ऐकत नाहीस; मी उभा राहतो; पण तू माझ्यावर डोळे वटारतोस.
21तू माझ्याशी निष्ठुर बनला आहेस; तू आपल्या बाहुबलाने माझा छळ करीत आहेस.
22तू मला वायूवर आरूढ करून उडवत आहेस. आणि गर्जणार्‍या तुफानात मला हेलकावत आहेस.
23मला ठाऊक आहे की तू मला मृत्युवश करशील; सर्व जीवधारी ज्या स्थळी एकत्र होणार आहेत त्याप्रत मला पोचवशील.
24तरी कोणी कोसळत असता आपला हात पुढे करीत नाही काय? आपला नाश होऊ लागला असता तो धावा करीत नाही काय?
25कठीण दिवस कंठणार्‍याला पाहून मी हळहळलो नाही काय? लाचारांसाठी मी कष्टी झालो नाही काय?
26मी सौख्याची अपेक्षा करीत होतो तेव्हा विपत्ती आली; मी प्रकाशाची अपेक्षा करीत होतो तेव्हा अंधकार आला.
27माझे अंतर्याम एकसारखे पोळत1 आहे; दुःखाचे दिवस मला प्राप्त झाले आहेत.
28मी काळा होऊन फिरत आहे, तरी सूर्याच्या किरणांनी नव्हे; मी जनसमाजात उभा राहून करुणा भाकत आहे.
29मी कोल्ह्यांचा बंधू, शहामृगांचा सोबती झालो आहे.
30माझी त्वचा काळी होऊन गळून पडत आहे; माझी हाडे तापाने जळजळत आहेत.
31माझ्या वीणेतून शोकसूर, माझ्या पाव्यातून विलापरव निघत आहेत.”

सध्या निवडलेले:

ईयोब 30: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन