यरुशलेमेच्या गल्ल्यांतून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खातरी करून घ्या; तिच्या चौकांत शोध करा की कोणी न्यायाने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय? सापडल्यास मी त्याला क्षमा करीन.
“परमेश्वराच्या जीविताची शपथ,” असे ते म्हणतात, तरी ती शपथ खोटी आहे.
हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय? तू त्यांना ताडन करतोस तरी ते दु:खित होत नाहीत; तू त्यांना क्षीण करतोस तरी ते ताळ्यावर येत नाहीत, ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करतात, ते वळत नाहीत.
तेव्हा मी म्हटले, “हे तुच्छ आहेत, हे मूर्ख आहेत; परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाचे नियम त्यांना ठाऊक नाहीत.
ह्याकरता मी महाजनांकडे जाऊन त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाचे नियम ठाऊक आहेत.” पण त्यांनी तर जोखड साफ मोडले आहे व बंधने तोडून टाकली आहेत.
ह्यास्तव रानातला सिंह त्यांना फाडील, वनातला लांडगा त्यांना फस्त करील, चित्ता त्यांच्या नगरांजवळ दबा धरून तेथून बाहेर पडणार्या प्रत्येकाचे फाडून तुकडे करील; कारण त्यांचे अपराध व त्यांची मागे घसरणी ही बहुत आहेत.
“मी तुला क्षमा कशी करू? तुझ्या पुत्रांनी मला सोडले आहे व जे देव नाहीत त्यांची त्यांनी शपथ वाहिली आहे; मी त्यांना पोटभर चारले तेव्हा त्यांनी जारकर्म केले व वेश्यांच्या घरात गर्दी केली.
खाऊन मस्त झालेल्या घोड्यांप्रमाणे ते चोहोकडे फिरतात; त्यांतला प्रत्येक आपल्या शेजार्याच्या बायकोला पाहून खिंकाळतो.
परमेश्वर म्हणतो, ह्याबद्दल मी नाही का समाचार घेणार? माझा आत्मा ह्या असल्या राष्ट्रांचे पारिपत्य नाही का करणार?
तिच्या द्राक्षवेलांच्या रांगांत शिरा व नासधूस करा; तरी पूर्ण नासधूस करू नका. तिच्या फांद्या तोडून टाका. त्या परमेश्वराच्या नाहीत.
कारण इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ही माझ्याशी बेइमानपणे वागली आहेत असे परमेश्वर म्हणतो.
ते परमेश्वराला अवमानून म्हणतात, ‘तो नाहीच; आमच्यावर अरिष्ट म्हणून येणार नाही, आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही.
संदेष्टे वायुरूप होतील, त्यांच्याकडे संदेश नाही; त्यांची अशी गती होईल.”’
ह्यामुळे परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “तुम्ही असे बोलता म्हणून पाहा, मी आपले शब्द तुझ्या मुखात अग्नी असे आणि हे लोक सरपण असे करीन आणि तो त्यांना खाऊन टाकील.
परमेश्वर म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुमच्यावर दुरून एक राष्ट्र आणतो; ते बळकट व प्राचीन राष्ट्र आहे; तुला त्यांची भाषा माहीत नाही, तुला त्यांचे बोलणे समजणार नाही.
त्यांचा भाता उघडी कबर आहे; ते सर्व पराक्रमी वीर आहेत.
ते तुझे पीक, तुझ्या मुलाबाळांचे अन्न खाऊन टाकतील; ते तुझी शेरडेमेंढरे, तुझी गुरेढोरे, खाऊन टाकतील; तुझ्या द्राक्षलता व अंजिरांची झाडे फस्त करतील; ज्या तटबंदीच्या नगरांवर तुझी भिस्त आहे त्यांना ते तलवारीने उद्ध्वस्त करतील.”
“तरी त्या दिवसांतही मी तुमचा पुरा अंत करणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.
जर तुम्ही म्हणाल की, ‘परमेश्वर आमचा देव त्याने आमचे असे का केले?’ तर तू त्यांना सांग की, ‘तुम्ही मला सोडून आपल्या देशात अन्य दैवतांची सेवा केली तशी जो देश तुमचा नाही त्यात तुम्ही परक्यांची सेवा कराल.”’