यिर्मया 24
24
चांगल्या आणि वाईट अंजिरांवरून धडा
1यहोयाकीम ह्याचा पुत्र यकोन्या जो यहूदाचा राजा त्याला व यहूदाचे सरदार, कारागीर व लोहार ह्यांना नबुखद्रेस्सराने धरून यरुशलेमेतून बाबेलास नेल्यानंतर परमेश्वराने मला हे दाखवले; पाहा, परमेश्वराने मंदिरासमोर अंजिराच्या दोन टोपल्या ठेवल्या होत्या.
2एका टोपलीत पहिल्या बाराच्या अंजिरांसारखे फार चांगले अंजीर होते; दुसर्या टोपलीत फार वाईट अंजीर होते, इतके की ते खाण्याजोगे नव्हते.
3परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “अंजीर; चांगले ते फार चांगले आहेत आणि वाईट ते फार वाईट आहेत, इतके की ते खाण्याजोगे नाहीत.”
4मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
5“इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ह्या ठिकाणाहून यहूदाचे बंदिवान केलेले जे लोक मी खास्द्यांच्या देशात पाठवले आहेत त्यांना ह्या चांगल्या अंजिरांप्रमाणे मी समजेन.
6मी त्यांच्यावर कृपादृष्टी करीन; आणि त्यांना ह्या देशात परत आणीन; त्यांना उभारीन, पाडून टाकणार नाही; त्यांची लागवड करीन, त्यांना उपटून टाकणार नाही.
7मी परमेश्वर आहे असे मला ओळखणारे हृदय मी त्यांना देईन; ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन; कारण ते मनापासून माझ्याकडे वळतील.
8परमेश्वर खरोखर म्हणतो, खाण्याजोगे नाहीत असे जे वाईट अंजीर आहेत त्यांप्रमाणे यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार, आणि ह्या देशात राहिलेले व मिसर देशात वस्ती करून राहिलेले यरुशलेमेचे अवशिष्ट लोक ह्यांचे मी करीन.
9पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून देईन तेथे ते अपशब्द व लोकप्रवाद, निंदा व शाप ह्यांचे विषय होतील.
10आणि मी त्यांच्यामध्ये तलवार, दुष्काळ व मरी पाठवीन, अशी की जो देश मी त्यांना व त्यांच्या पूर्वजांना दिला त्यातून त्यांचा नायनाट होईल.”
सध्या निवडलेले:
यिर्मया 24: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.