यिर्मया 23
23
उरलेल्यांचे पुनरागमन
1“जे मेंढपाळ माझ्या कुरणातल्या मेंढरांचा नाश करतात व त्यांना विखरतात ते हायहाय करतील!” असे परमेश्वर म्हणतो.
2ह्यामुळे माझ्या लोकांना चारणार्या मेंढपाळांविषयी इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझा कळप विखुरला आहे, त्यांना हाकून लावले आहे, त्यांचा समाचार घेतला नाही; पाहा, मी तुमच्या कर्मांचा अनिष्ट परिणाम तुमच्यावर आणून तुमचा समाचार घेईन, असे परमेश्वर म्हणतो.
3मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लावला त्या त्या देशातून त्याचा अवशेष जमा करीन व त्यांना त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील.
4मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, ते त्यांना चारतील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.
5परमेश्वर म्हणतो, पाहा, मी दाविदाकरता एक नीतिमान अंकुर उगववीन; तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात न्यायनीतीचा अवलंब करील, असे दिवस येत आहेत.
6त्याच्या दिवसांत यहूदा सुरक्षित होईल, इस्राएल निर्भय वसेल, व जे नाव त्याला देतील ते हे :‘परमेश्वर आमची नीतिमत्ता.’
7परमेश्वर म्हणतो, ह्यास्तव पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत ‘ज्या परमेश्वराने इस्राएलवंशजांना मिसर देशातून आणले त्याच्या जीविताची शपथ’ असे म्हणणार नाहीत;
8तर ‘उत्तर देशांतून व ज्या ज्या देशांत इस्राएल घराण्याच्या संतानाला हाकून लावले होते त्यांतून ज्याने त्यांना आणले त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ,’ असे म्हणतील व ते स्वतःच्या देशात राहतील.”
खोट्या संदेष्ट्यांचा निषेध
9संदेष्ट्यांविषयी : माझे हृदय माझ्या ठायी भग्न झाले आहे; माझी सर्व हाडे थरथर कापत आहेत; परमेश्वर व त्याची पवित्र वचने ह्यांमुळे मी मद्यप्यासारखा, द्राक्षारसाने मस्त झालेल्या मनुष्यासारखा झालो आहे.
10कारण जारकर्म्यांनी देश व्यापला आहे; शापामुळे भूमी शोक करीत आहे; रानातील कुरणे वाळली आहेत; लोकांची गती वाईट आहे, त्यांचा पराक्रम म्हटला तर अधर्म;
11“कारण संदेष्टा व याजक हे दोघेही भ्रष्ट आहेत; माझ्या मंदिरातदेखील मला त्यांचे दुष्कर्म दिसून आले आहे, असे परमेश्वर म्हणतो.
12ह्यामुळे अंधारातल्या निसरड्या जागांप्रमाणे त्यांचा मार्ग त्यांना होईल, ते ढकलले जाऊन त्यांत पडतील; कारण मी त्यांच्यावर अरिष्ट, त्यांची खबर घेण्याचा वर्षकाळ आणीन, असे परमेश्वर म्हणतो.
13शोमरोनातील संदेष्ट्यांच्या ठायी मी मूर्खपणा पाहिला आहे; त्यांनी बआलदैवतांच्या नावाने भाषणे करून माझे लोक इस्राएल ह्यांना बहकवले आहे.
14यरुशलेमेतल्या संदेष्ट्याच्या ठायीही मी एक घोर प्रकार पाहिला आहे; ते जारकर्म करतात व लबाडीने चालतात; ते दुष्कर्म्यांचे हात असे दृढ करतात की त्यांच्यातला कोणी आपल्या दुष्कर्मांपासून वळत नाही; ते सर्व मला सदोमासारखे झाले आहेत, व त्याचे रहिवासी गमोरासारखे झाले आहेत.”
15ह्याकरता सेनाधीश परमेश्वर संदेष्ट्याविषयी म्हणतो, “पाहा, मी त्यांना खायला कडूदवणा व प्यायला विष देईन, कारण यरुशलेमेच्या संदेष्ट्यांपासून अधर्म निघून देशभर पसरला आहे.”
16सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्हांला संदेश देणार्या संदेष्ट्यांची वचने ऐकू नका, ते तुम्हांला फसवतात; ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टान्त सांगतात, परमेश्वराच्या मुखातला सांगत नाहीत.
17मला तुच्छ मानणार्यांना ते म्हणत राहतात की, ‘परमेश्वर बोलला आहे : तुम्हांला शांती प्राप्त होईल;’ आपल्या अंत:करणाच्या हट्टाप्रमाणे चालणार्या सर्वांस ते म्हणतात की, ‘तुमच्यावर काही अरिष्ट येणार नाही.’
18कारण त्यांच्यापैकी परमेश्वराचा शब्द ओळखणारा व ऐकणारा असा त्यांच्या मंत्रिमंडळात कोण होता? माझ्या वचनाकडे लक्ष देऊन ते कोणी ऐकले?
19पाहा, परमेश्वरापासून त्याचे क्रोधरूप तुफान सुटले आहे; गरगर फिरणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.
20परमेश्वर आपले कार्य करीपर्यंत, आपला मनोदय पूर्ण करीपर्यंत, त्याचा संताप मागे फिरणार नाही; पुढील काळात तुम्हांला हे चांगले समजेल.
21“मी ह्या संदेष्ट्यांना पाठवले नाही तरी ते धावत सुटले; मी त्यांच्याबरोबर बोललो नाही तरी त्यांनी संदेश दिला;
22पण ते माझ्या मंत्रिमंडळात असते तर त्यांनी माझी वचने माझ्या लोकांना विदित केली असती आणि त्यांना त्यांच्या दुष्ट मार्गांतून व त्यांच्या कर्मांच्या दुष्टतेपासून फिरवले असते.
23परमेश्वर म्हणतो, मी जवळचा मात्र देव आहे आणि दूरचा देव नव्हे काय?
24परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय? मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो.
25‘मी स्वप्न पाहिले आहे, स्वप्न पाहिले आहे,’ असे म्हणून माझ्या नावाने असत्य संदेश देतात, ते संदेष्टे काय बोलतात ते मी ऐकले आहे.
26माझ्या नावाने असत्य संदेश देणारे ते संदेष्टे आपल्या मनातले कपट संदेशरूपाने कथन करतात, हे कोठवर चालणार?
27त्यांचे पूर्वज बआलदैवतामुळे माझे नाम विसरले, तसे ते आपली स्वप्ने एकमेकांना सांगून माझ्या लोकांना माझे नाम विसरायला लावतील अशी त्यांची कल्पना आहे.
28कोणा संदेष्ट्याने स्वप्न पाहिले असेल तर ते तो कथन करो; माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगो. गव्हापुढे पेंढा तो काय? असे परमेश्वर म्हणतो.
29परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे-तुकडे करणार्या हातोड्यासारखे नव्हे काय?
30ह्यामुळे पाहा, जे संदेष्टे एकमेकांपासून माझी वचने चोरून घेतात त्यांच्याविरुद्ध मी आहे.
31पाहा, जे आपली जीभ चालवून म्हणतात की; ‘हे देवाचे वचन आहे,’ त्यांच्याविरुद्ध मी आहे असे परमेश्वर म्हणतो,
32परमेश्वर म्हणतो, पाहा, जे संदेष्टे खोटी स्वप्ने संदेश म्हणून सांगतात त्यांच्याविरुद्ध मी आहे; ते माझ्या लोकांना आपल्या लबाडीने व आपल्या अमर्याद भाषणाने बहकवतात; मी तर त्यांना पाठवले नाही व आज्ञापिलेही नाही; ते ह्या लोकांचे बिलकूल हित करीत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.
33जेव्हा हे लोक किंवा एखादा संदेष्टा किंवा याजक तुला विचारील की, ‘परमेश्वराचे भारी वचन काय आहे?’ तेव्हा त्यांना म्हण, ‘तुम्ही भारी आहात आणि मीच तुम्हांला टाकून देईन,’ असे परमेश्वर म्हणतो.
34कोणी संदेष्टा, याजक किंवा लोकांतला कोणी, ‘परमेश्वराचे भारी वचन’, हे शब्द उच्चारील तर मी त्या माणसाला व त्याच्या घराण्याला शिक्षा करीन.
35तर तुमच्यापैकी एकाने आपल्या शेजार्याला व आपल्या बांधवाला म्हणावे, ‘परमेश्वराने काय उत्तर दिले? परमेश्वर काय बोलला?’
36तुम्ही ह्यापुढे, ‘परमेश्वराचे भारी वचन,’ असे म्हणू नये, कारण प्रत्येकाचे वचन त्याला स्वतःला भारी आहे; तुम्ही तर जिवंत देवाची, सेनाधीश परमेश्वर आमचा देव ह्याची वचने विपरीत केली आहेत.
37तू संदेष्ट्याला विचार की, ‘परमेश्वराने तुला काय उत्तर दिले? परमेश्वर काय बोलला?’
38तरीपण ‘परमेश्वराचे भारी वचन’ असेच तुम्ही बोलत राहाल, तर परमेश्वर म्हणतो, ज्या अर्थी तुम्ही ‘परमेश्वराचे भारी वचन’ हे शब्द बोलत राहता व तुम्ही ‘परमेश्वराचे भारी वचन’, हे शब्द बोलू नका म्हणून मी तुम्हांला सांगून पाठवले,
39त्या अर्थी पाहा, मी तुम्हांला अगदी विसरेन, मी तुम्हांला आणि जे नगर तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिले त्याला माझ्या नजरेसमोरून झुगारून देईन;
40आणि तुम्हांला सर्वकाळचा कलंक लावीन; जिचा कधी विसर पडणार नाही अशी तुमची सतत अप्रतिष्ठा करीन.”
सध्या निवडलेले:
यिर्मया 23: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.