यिर्मया 18
18
कुंभारकामावरून धडा
1परमेश्वरापासून जे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे :
2“ऊठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन.”
3मी कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा तो चाकावर काम करीत होता.
4कुंभार मातीचे पात्र घडत होता; ते त्याच्या हातात असतानाच बिघडून गेले, मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडले.
5तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले :
6“हे इस्राएलाच्या घराण्या, ह्या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, कुंभाराच्या हातात माती असते तसे तुम्ही माझ्या हातात आहात.
7एखादे राष्ट्र अथवा राज्य समूळ उपटून नष्ट करीन असे मी एकदा बोललो;
8तरीपण ज्या राष्ट्राविरुद्ध हे मी बोललो, ते आपली दुष्टता सोडील तर त्यावर जे अरिष्ट आणण्याचा माझा विचार होता त्याविषयी मला अनुताप होईल.
9एखाद्या राष्ट्राची अथवा राज्याची लागवड करून ते मी स्थापीन असे मी एकदा बोललो,
10तरीपण माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्याने माझे वचन पाळले नाही, तर त्याचे मी हित करीन म्हणून बोललो त्याविषयी मला अनुताप होईल.
11तर आता यहूदाचे लोक व यरुशलेमनिवासी ह्यांना जाऊन सांग : ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुमच्यावर अनर्थ योजत आहे, तुमच्याविरुद्ध मनसुबा योजत आहे; तुम्ही सगळे आपापल्या कुमार्गापासून वळा, आपल्या चालीरीती सुधारा.’
12तरी ते म्हणतात, ‘काय उपयोग? आम्ही आपल्या मनसुब्यांप्रमाणे चालणार; आम्ही सर्व आपापल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे करणार.’
13ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, राष्ट्रांमध्ये चौकशी करून पाहा, अशा गोष्टी कोणी कधी ऐकल्या आहेत काय? इस्राएलाच्या कुमारीने अति घोर कर्म केले आहे.
14लबानोन पर्वताच्या शिखरावरील बर्फ कधी नाहीसे होते काय? दुरून खाली वाहत येणारे थंड पाणी आटते काय?
15तरीपण माझे लोक मला विसरले आहेत, ते व्यर्थतेपुढे धूप जाळतात; त्यांनी त्यांच्या मार्गांत, त्यांच्या प्राचीन मार्गांत त्यांना ठोकर खायला लावले; भर घालून तयार न केलेल्या आडवाटांनी त्यांना जाण्यास लावले.
16अशा प्रकारे ते आपला देश दहशत व निरंतरचा उपहास ह्यांना पात्र करतात; त्याच्याजवळून येणारा-जाणारा प्रत्येक जण विस्मित होऊन आपले डोके हलवील.
17पूर्वेकडील वार्याप्रमाणे मी त्यांना शत्रूपुढे विखरीन; त्यांच्या संकटसमयी मी त्यांच्याकडे पाठ करीन, तोंड करणार नाही.”
लोकांची कारस्थाने व यिर्मयाची प्रार्थना
18तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण यिर्मयाविरुद्ध मनसुबा करू. कारण याजकाचे नियमशास्त्रज्ञान, मंत्र्यांची मसलत, संदेष्ट्यांचे वचन ही नाहीशी होणार नाहीत. चला आपण त्याच्यावर आरोप ठेवू, त्याच्या कोणत्याही भाषणाची पर्वा करणार नाही.”
19हे परमेश्वरा, माझ्याकडे लक्ष दे, माझ्याबरोबर झगडणार्यांची वाणी ऐक.
20बर्याची फेड वाइटाने व्हावी काय? कारण त्यांनी माझ्या जिवासाठी खाडा खणला आहे. त्यांच्यावरल्या तुझ्या रागाचे निवारण व्हावे म्हणून त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास मी तुझ्यासमोर उभा राहिलो ह्याचे स्मरण कर.
21ह्यामुळे त्यांचे पुत्र दुष्काळात सापडू दे; त्यांना तलवारीच्या तडाक्यात सापडू दे; त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होवोत, मृत्यू त्यांचे पुरुष ठार करो; त्यांचे तरुण लढाईत तलवारीने पडोत.
22तू त्यांच्यावर एकाएकी सैन्य आणशील तेव्हा त्यांच्या घरांतून आक्रोश कानी पडो; कारण त्यांनी मला पकडण्यासाठी खाडा खणला आहे, माझ्या पायांसाठी पाश मांडले आहेत.
23हे परमेश्वरा, मला मारण्याचे त्यांचे सर्व मनसुबे तू जाणतोसच; त्यांच्या दुष्कर्माची क्षमा करू नकोस, आपल्या दृष्टीपुढून त्यांचे पातक पुसून टाकू नकोस; म्हणजे ते तुझ्यापुढे ठोकर खाऊन पडतील; तुझ्या क्रोधसमयी त्यांची अशी वाट लाव.
सध्या निवडलेले:
यिर्मया 18: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.