यिर्मया 17
17
यहूदाच्या हृदयपटावर कोरलेले पातक
1“यहूदाचे पातक लोखंडी खचरणीने, हिरकणीच्या टोकाने लिहिले आहे; त्यांच्या हृदयपटावर, त्यांच्या वेद्यांच्या शृंगांवर खोदले आहे;
2कारण त्याची संतती उंच टेकड्यांवरील हिरव्या झाडांच्या वेद्या व अशेरामूर्ती ह्यांचे स्मरण ठेवते.
3हे माझ्या वनातल्या पर्वता, तुझे वित्त, तुझे सर्व निधी व तुझ्या सर्व सीमांच्या आतील तुझी उच्च स्थाने तुझ्या पापामुळे मी लुटीस जाऊ देईन.
4मी तुला जे वतन दिले ते तुझ्या हातचे जाईल; तुला ठाऊक नाही अशा देशात तू आपल्या शत्रूंची सेवा करशील असे मी करीन; कारण माझा क्रोधाग्नी तुम्ही भडकवला आहे. तो सर्वकाळ जळत राहील.”
5परमेश्वर असे म्हणतो, “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंत:करण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे.
6तो वैराणातल्या झुडपासारखा होईल; व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही; अरण्यातील रुक्ष स्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश ह्यांत तो वस्ती करील.
7जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे तो धन्य!
8तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदीकिनारी पसरील; उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहतील; अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळे देण्याचे सोडणार नाही.”
9हृदय सर्वांत कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?
10“प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो.”
11तित्तर पक्षी आपण न घातलेली अंडी उबवतो तसे अन्यायाने धन मिळवणार्याचे आहे; ते त्याला त्याच्या आयुष्याच्या ऐन भरात सोडून जाईल; व तो अंती मूर्ख ठरेल.
12आमच्या पवित्रस्थानाचे स्थळ, सनातन काळापासून उच्च व वैभवी सिंहासन आहे.
13हे परमेश्वरा, इस्राएलाच्या आशाकंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजीत होतील; माझ्यापासून फितणार्यांची नावे धुळीवर लिहिली जातील, कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे.
14हे परमेश्वरा, मला बरे कर म्हणजे मी बरा होईन; मला तार म्हणजे मी तरेन; कारण तू माझा स्तवनविषय आहेस.
15पाहा, ते मला म्हणतात, “परमेश्वराचे वचन कोठे आहे? ते पुढे येऊ द्या!”
16मी तुला अनुसरणारा तुझा मेंढपाळ होण्यापासून माघार घेतली नाही आणि मी संकटाच्या दिवसाची अपेक्षाही केली नाही हे तुला ठाऊक आहे; जे माझ्या तोंडून निघाले ते तुझ्या दृष्टीसमोर होते.
17तू मला भीतिप्रद होऊ नकोस, विपत्काळी तू माझा आश्रय आहेस.
18माझा छळ करणारे फजीत होवोत, मी फजीत न व्हावे; ते घाबरे होवोत, मी घाबरे न व्हावे; त्यांच्यावर विपत्काळ आण; दुप्पट नाशाने त्यांचा नायनाट कर!
शब्बाथ पवित्र राखायला हवा
19परमेश्वर मला म्हणाला, “ज्या वेशीने यहूदाचे राजे येतातजातात त्या सार्वजनिक वेशीत व यरुशलेमेच्या सर्व वेशींत जाऊन उभा राहा;
20आणि लोकांना सांग, ‘अहो यहूदाच्या राजांनो, हे सर्व यहूदा, ह्या वेशींनी येणारे सर्व यरुशलेमनिवासी जनहो, परमेश्वराचे वचन ऐका.
21परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपणांविषयी सावध असा, शब्बाथ दिवशी काही ओझे वाहू नका, यरुशलेमेच्या वेशीतून ते आणू-नेऊ नका.
22शब्बाथ दिवशी आपल्या घरातून काही ओझे बाहेर नेऊ नका; काही कामधंदा करू नका, आणि तुमच्या पूर्वजांना मी आज्ञापिल्याप्रमाणे शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळा.
23पण त्यांनी ऐकले नाही, त्यांनी आपला कान दिला नाही; ऐकू नये व शिक्षण घेऊ नये म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.
24तथापि परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझे मनापासून ऐकून शब्बाथ दिवशी ह्या नगराच्या वेशींतून काही ओझे आणणार-नेणार नाही आणि शब्बाथ दिवशी काही कामधंदा न करता तो पवित्रपणे पाळाल,
25तर असे होईल की दाविदाच्या सिंहासनावर बसणारे राजे व सरदार रथारूढ व अश्वारूढ होऊन आणि त्यांचे सरदार यहूदाचे लोक व यरुशलेमनिवासी ह्या नगराच्या वेशींतून येजा करतील व हे नगर सर्वकाळ वसेल.
26यहूदाच्या नगरांतून, यरुशलेमेच्या परिसरातून बन्यामीन प्रांतांतून, तळवटीतून, डोंगरवटीतून व दक्षिणेतून ते येऊन होमबली, यज्ञबली, अन्नार्पण व धूप अर्पण करतील. असे ते परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतील.
27पण तुम्ही शब्बाथ पवित्रपणे पाळावा, शब्बाथ दिवशी ओझे वाहू नये व यरुशलेमेच्या वेशींतून येजा करू नये, ही माझी आज्ञा तुम्ही ऐकणार नाही तर त्याच्या वेशींत मी अग्नी पेटवीन; तो यरुशलेमेचे वाडे जाळून खाक करील, तो विझणार नाही.”’
सध्या निवडलेले:
यिर्मया 17: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.