YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 14

14
अवर्षणाविषयी संदेश
1अवर्षणाविषयी यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :
2“यहूदा शोक करीत आहे, त्याच्या वेशी उदासवाण्या झाल्या आहेत; ते भूमीवर शोक करीत पडले आहेत; यरुशलेमेची आरोळी वर गेली आहे.
3त्यांच्यातले श्रेष्ठ जन आपल्या कनिष्ठांना पाण्यासाठी पाठवतात; ते विहिरीवर जातात पण त्यांना पाणी मिळत नाही, ते रिकाम्या घागरी घेऊन येतात; ते लज्जित व फजीत होऊन आपली डोकी झाकून घेतात.
4पृथ्वीवर पाऊस न पडल्याने जमीन व्याकूळ झाली आहे; म्हणून शेतकरी फजीत होऊन आपली डोकी झाकून घेत आहेत.
5रानातली हरिणीही व्यालेल्या पाडसास टाकून जात आहे, कारण गवत नाहीसे झाले आहे.
6रानगाढवे उजाड टेकड्यांवर उभी राहून कोल्ह्यांप्रमाणे धापा टाकीत आहेत, झाडपाला काहीएक नसल्यामुळे त्यांचे डोळे खोल गेले आहेत.
7हे परमेश्वरा, आमचे अपराध जरी आमच्याविरुद्ध साक्ष देतात तरी तू आपल्या नामास्तव कार्य कर; आमचे कितीदा पतन झाले आहे! तुझ्याविरुद्ध आम्ही पाप केले आहे.
8हे इस्राएलाच्या आशाकंदा, संकटसमयीच्या त्यांच्या त्रात्या, देशातल्या उपर्‍यासारखा, रात्रीच्या उतारूसारखा तू का झालास?
9स्तब्ध झालेल्या मनुष्यासारखा, वीर असून उद्धार करण्यास असमर्थ अशा पुरुषासारखा का झालास? तरी हे परमेश्वरा, तू आमच्यामध्ये आहेस, तुझे नाम आम्हांला दिलेले आहे; आमचा त्याग करू नकोस.”
10परमेश्वर ह्या लोकांना असे म्हणतो, त्यांना अशा प्रकारे भटकणे आवडले, त्यांनी आपले पाय आवरले नाहीत; म्हणून परमेश्वर त्यांचा स्वीकार करीत नाही; तो आता त्यांचे दुष्कर्म स्मरून त्यांच्या पापांची झडती घेईल.
11परमेश्वर मला म्हणाला, “ह्या लोकांसाठी, त्यांच्या बर्‍यासाठी, प्रार्थना करू नकोस.
12ते उपोषण करतील तेव्हा मी त्यांची आरोळी ऐकणार नाही; ते होमार्पण व अन्नार्पण मला आणतील ती मी स्वीकारणार नाही; मी तलवारीने, दुष्काळाने व मरीने त्यांचा संहार करीन.”
13मग मी म्हणालो, “हे प्रभू परमेश्वरा, पाहा, संदेष्टे त्यांना म्हणत आहेत, ‘तुम्ही तलवार पाहणार नाही, तुम्हांला दुष्काळ गाठणार नाही; तर ह्या स्थळी मी तुम्हांला खरी शांती देईन.”’
14परमेश्वर मला म्हणाला, “संदेष्टे माझ्या नामाने असत्य संदेश देतात; मी त्यांना पाठवले नाही, मी त्यांच्याबरोबर बोललो नाही; ते खोटा दृष्टान्त, शकुन, निरर्थक गोष्टी व आपल्या मनातील कपटयोजना संदेशरूपाने तुम्हांला सांगतात.
15ह्यास्तव ज्या संदेष्ट्यांना मी पाठवले नाही व जे माझ्या नामाने संदेश देतात व म्हणतात, ह्या देशावर तलवार व दुष्काळ येणार नाही, त्यांच्यासंबंधाने परमेश्वर म्हणतो, हे संदेष्टे तलवारीने व दुष्काळाने नष्ट होतील;
16आणि ज्या लोकांना ते संदेश देतात तेही दुष्काळाने व तलवारीने मरतील व त्यांना यरुशलेमेच्या रस्त्यांनी पकडून देतील; त्यांना, त्यांच्या स्त्रियांना, त्यांच्या पुत्रांना व त्यांच्या कन्यांना कोणी पुरणार नाही; मी त्यांची दुष्टता त्यांच्यावर लोटीन.
17तू त्यांना हे वचन सांग, ‘माझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रुधारा वाहोत, त्या न थांबोत; कारण माझ्या लोकांची कुंवार कन्या भयंकर जखम लागून अति छिन्नभिन्न झाली आहे.
18मी वनात जातो तर पाहा, तेथे तलवारीने वधलेले आहेत! शहरात येतो तर दुष्काळाने पिडलेले मला आढळतात; कारण संदेष्टे व याजक हे अज्ञात देशात भटकत आहेत.”’
19तू यहूदाचा अगदी त्याग केला आहेस काय? तुझ्या जिवाला सीयोनेचा वीट आला आहे काय? आम्ही बरे होऊ नये इतके तू आम्हांला का मारले आहे? आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण हित काही होत नाही; आम्ही बरे होण्याची वाट पाहतो तर पाहा दहशत.
20हे परमेश्वरा, आमची दुष्टता, आमच्या पूर्वजांचे दुष्कर्म, आम्ही जाणतो; आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.
21तू आपल्या नामास्तव आमचा वीट मानू नकोस; तुझ्या वैभवाच्या गादीची अप्रतिष्ठा करू नकोस; आमच्याशी केलेला करार स्मर, तो मोडू नकोस.
22विदेश्यांच्या निरुपयोगी दैवतांत कोणी पर्जन्य देणारी आहेत काय? आकाशाला वृष्टी करता येईल काय? हे परमेश्वरा, आमच्या देवा, हे करणारा तूच ना? आम्ही तुझी आशा धरतो, कारण तू ह्या सर्वांना उत्पन्न केले आहेस.

सध्या निवडलेले:

यिर्मया 14: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन