YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 13

13
खराब कमरबंदावरून धडा
1परमेश्वराने मला सांगितले, “तू जाऊन आपणासाठी तागाचा कमरबंद विकत घे, तो कंबरेस गुंडाळ पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.”
2तेव्हा परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे मी कमरबंद विकत घेऊन कंबरेस गुंडाळला.
3मग परमेश्वराचे वचन दुसर्‍यांदा मला प्राप्त झाले की,
4“तू विकत घेतलेला तुझ्या कंबरेस असलेला कमरबंद घे, ऊठ, फरात नदीकडे जा व तो तेथे खडकाच्या कपारीत लपवून ठेव.”
5मी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जाऊन तो फरात नदीजवळ लपवून ठेवला.
6बरेच दिवस लोटल्यावर परमेश्वर मला म्हणाला, “ऊठ, फरात नदीकडे जा व जो कमरबंद तेथे लपवून ठेवण्यास तुला मी सांगितले होते तो घेऊन ये.”
7तेव्हा मी फरात नदीकडे गेलो व कमरबंद जेथे लपवून ठेवला होता तेथून तो खणून काढला आणि पाहतो तर तो कमरबंद खराब, कुचकामाचा झाला होता.
8तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले :
9“परमेश्वर असे म्हणतो, असाच मी यहूदाचा दिमाख, यरुशलेमेचा मोठा दिमाख नष्ट करीन.
10ते दुष्ट लोक माझी वचने ऐकत नाहीत, ते आपल्या अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालतात आणि अन्य देवांची सेवा करण्यास व त्यांना भजण्यास त्यांच्यामागे जातात म्हणून त्यांची गती ह्या निरुपयोगी झालेल्या कमरबंदाप्रमाणे होईल.
11इस्राएलाचे सर्व घराणे व यहूदाचे सर्व घराणे ह्यांनी माझी प्रजा व्हावे, आणि माझे नाम, स्तुती व भूषण ह्यांना कारण व्हावे म्हणून, कमरबंद जसा मनुष्याच्या कंबरेस लगटलेला असतो तसे त्यांनी मला लगटून राहावे असे मी केले, तरी त्यांनी मानले नाही, असे परमेश्वर म्हणतो.
भरलेल्या सुरयांवरून धडा
12ह्यास्तव त्यांना हे वचन सांग : ‘परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, प्रत्येक सुरई द्राक्षारसाने भरलेली आहे;”’ ते तुला म्हणतील, ‘प्रत्येक सुरई द्राक्षारसाने भरलेली आहे हे आम्हांला ठाऊक नाही काय?’
13तेव्हा त्यांना तू सांग, ‘पाहा, परमेश्वर म्हणतो, मी ह्या देशाचे सर्व रहिवासी म्हणजे दाविदाच्या गादीवर बसणारे राजे, याजक, संदेष्टे व सर्व यरुशलेमनिवासी ह्यांना मद्याने मस्त करीन.
14त्यांना मी एकमेकांवर आदळीन, बाप व मुले ही मी एकमेकांवर आदळीन; मी त्यांची गय करणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही, त्यांचा नाश केल्यावाचून राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.”’
पश्‍चात्ताप न केल्यास यहूदाला बंदिवास
15तुम्ही ऐका, कान द्या, गर्विष्ठ होऊ नका, कारण परमेश्वर हे बोलला आहे.
16परमेश्वर तुमचा देव अंधकार पाडील, अंधकारमय डोंगरांवर तुमचे पाय ठेचा खातील, तुम्ही उजेडाची अपेक्षा करीत असता उजेड पालटून तो मृत्युच्छाया व काळोख करील, त्यापूर्वी त्याला थोर माना.
17पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकान्ती शोकाकुल होईल; परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो म्हणून मी रडेन, माझ्या डोळ्यांतून टपटप आसवे गळतील.
18राजाला व राजमातेला सांग, “आसनावरून खाली बसा; कारण तुमच्या वैभवाचा मुकुट तुमच्या शिरावरून खाली पडत आहे.”
19दक्षिणेतील नगरे बंद पडली आहेत ती उघडायला कोणी नाही; यहूदाला सर्वस्वी बंदिवान करून नेले आहे, तो पूर्णपणे बंदिवान झाला आहे.
20“उत्तरेकडून जे येत आहेत त्यांच्याकडे नजर वर करून पाहा! तुला दिलेला कळप, तुझा रम्य कळप कोठे आहे?
21ज्यांचा स्नेह संपादन करण्याचा प्रयत्न तू केला त्यांना त्याने तुझ्या शिरावर ठेवले तर तू काय म्हणशील? प्रसववेदना लागलेल्या स्त्रीप्रमाणे तुला क्लेश होणार नाहीत काय?
22‘हे माझ्यावर का आले?’ असे आपल्या मनात म्हणशील तर तुझ्या मनस्वी दुष्कर्मामुळे तुझ्या अंगावरील वस्त्राचा पदर सारला आहे व तुझ्या टाचा जबरीने उघड्या केल्या आहेत.
23कूशी माणसाला आपली कातडी, चित्त्याला आपले ठिपके पालटता येतील काय? असे घडेल तरच दुष्टतेला सवकलेल्या तुम्हांला चांगले आचरण करता येईल.
24ह्यास्तव रानातल्या वार्‍यापुढे भूस उडते तसे मी त्यांना उडवीन.
25परमेश्वर म्हणतो, हा तुझा वाटा, माझ्याकडून तुला मापून दिलेला वतनभाग आहे; कारण तू मला विसरलीस व खोट्यावर भरवसा ठेवलास.
26म्हणून मी तुझे नेसण तुझ्या तोंडावर उडवीन म्हणजे तुझी लज्जा दिसेल.
27तुझे व्यभिचार, तुझे खिदळणे, तुझ्या जारकर्माचे चाळे, ही तुझी घोर कर्मे मी त्या मैदानातल्या टेकड्यांवर पाहिली आहेत. हे यरुशलेमे, तू हायहाय करणार! तू आपणाला शुद्ध करणार नाहीस काय? असे कोठवर चालणार?”

सध्या निवडलेले:

यिर्मया 13: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन