शास्ते 16
16
गज्जा येथे शमशोन
1मग शमशोन गज्जा येथे गेला, तेथे त्याने एक वेश्या पाहिली, आणि तो तिच्याकडे गेला.
2शमशोन तेथे आल्याची बातमी गज्जा-करांना लागताच त्यांनी घराला घेरा घातला आणि नगरवेशीत ते रात्रभर त्याच्या पाळतीवर बसले. ‘सकाळी उजाडल्यावर त्याला ठार मारू’ असा विचार करून ते रात्रभर गुपचूप राहिले.
3इकडे शमशोन मध्यरात्रीपर्यंत झोपून राहिला; नंतर उठून त्याने नगराच्या वेशीचे दरवाजे आणि दोन्ही दारबाह्या ही अडसरांसकट उखडून खांद्यांवर घेतली आणि हेब्रोनाच्या पूर्वेकडील डोंगराच्या शिखरावर नेली. शमशोन आणि दलीला 4नंतर सोरेक खोर्यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले.
5तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार त्या स्त्रीकडे जाऊन तिला म्हणाले, “त्याच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि आम्हांला त्याच्यावर वर्चस्व कसे मिळवता येईल, हे तू त्याच्याकडून लाडीगोडीने काढून घे. म्हणजे आम्हांला त्याच्या मुसक्या बांधून त्याला जेरीस आणता येईल. आम्ही प्रत्येक जण तुला चांदीची अकराशे नाणी देऊ.”
6दलीला शमशोनाला म्हणाली, “तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि कशाने तुम्हांला बांधले असता तुम्ही जेर व्हाल हे कृपया मला सांगा.”
7शमशोनाने तिला उत्तर दिले, “धनुष्याच्या सात नव्या वाद्यांनी मला बांधले तर मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन.”
8मग धनुष्याच्या सात नव्या वाद्या घेऊन पलिष्ट्यांचे सरदार तिच्याकडे आले आणि तिने त्याला त्या वाद्यांनी जखडून टाकले.
9त्या वेळी आतल्या खोलीत काही लोक तिने लपवून ठेवले होते. ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत.” तेव्हा आगीची धग लागताच तागाचे सूत तटकन तुटावे तशा त्याने त्या वाद्या तोडून टाकल्या. अशा प्रकारे त्याच्या शक्तीचे मर्म कळले नाही.
10दलीला शमशोनाला म्हणाली, “तुम्ही लबाडी करून मला फसवले आहे; तुम्हांला कशाने बांधावे हे आता तरी मला सांगा!”
11तो तिला म्हणाला, “कधी न वापरलेल्या नव्या दोरांनी मला आवळून बांधले, तर मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन.”
12मग दलीलाने नवे दोर आणून त्याला बांधले व म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत.” त्या वेळी काही लोक आतल्या खोलीत दबा धरून बसले होते. तेव्हा धागा तोडावा तसे त्याने आपल्या दंडावरचे ते दोर तटातट तोडून टाकले.
13दलीला शमशोनाला म्हणाली, “आतापर्यंत तुम्ही मला खोटे सांगून माझी फसवणूक केली आहे. कशाने तुम्हांला बांधता येईल ते मला सांगा.” तो तिला म्हणाला, “माझ्या केसांच्या सात बटा मागाच्या ताण्यात गुंफल्या तर ते होईल.”
14मग तिने त्याचे केस मागाच्या फणीवर ताणून बांधले व ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत!” तेव्हा त्याने झोपेतून जागे होऊन ती मागाची फणी व ताणा उखडून टाकला.
15त्यानंतर दलीला त्याला म्हणाली, “तुम्ही तुमचे गुपित मला सांगत नाही, तर ’मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे कसे म्हणता? तुम्ही मला तीन वेळा फसवले आहे आणि तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे हे मला सांगितले नाही.”
16तिच्या ह्या रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला,
17म्हणून त्याने आपले मनोगत तिला सांगितले. तो तिला म्हणाला, “माझ्या डोक्याला कधी वस्तरा लागलेला नाही, कारण मी जन्मापासून देवासाठी नाजीर आहे; माझे मुंडण केल्यास माझी शक्ती जाईल व मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन.”
18त्याने आपले सारे मनोगत सांगितल्याचे पाहून दलीलाने पलिष्ट्यांच्या सरदारांना बोलावणे पाठवले व सांगितले की, “आणखी एकदाच या. कारण त्याने आपले सारे मनोगत मला सांगितले आहे.” तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार पैसे घेऊन तिच्याकडे आले.
19तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपवले; आणि एक मनुष्य बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटांचे मुंडण करवले. मग ती त्याला सतावू लागली आणि तो निर्बल झाला.
20ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत.” तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे, ह्याची त्याला कल्पना नव्हती.
21पलिष्ट्यांनी त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन काशाच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळायला लावले.
22पण त्याचे मुंडण झाल्यानंतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले.
शमशोनाचा मृत्यू
23नंतर पलिष्ट्यांचे सरदार आपल्या दागोन नामक देवाप्रीत्यर्थ महायज्ञ अर्पून उत्सव करण्यासाठी जमले; ते म्हणू लागले, “आपल्या देवाने आपला शत्रू शमशोन ह्याला आपल्या हाती दिले आहे.”
24त्याला पाहून लोक आपल्या देवाचे स्तवन करत म्हणाले, “आपल्या देवाने आपल्या देशाचा नाश करणार्या आणि आपल्यातल्या पुष्कळांचा संहार करणार्या शत्रूला आपल्या हाती दिले आहे.”
25ते आनंदाच्या भरात म्हणाले, “शमशोनाला समोर आणा म्हणजे तो आपली करमणूक करील.” तेव्हा त्यांनी शमशोनाला तुरुंगातून आणवले आणि तो त्यांची करमणूक करू लागला. त्यांनी त्याला खांबांमध्ये उभे केले.
26आपला हात धरणार्या मुलाला शमशोन म्हणाला, “ज्या खांबांवर हे मंदिर आधारलेले आहे ते मला चाचपू दे, म्हणजे मी त्यांवर टेकेन.”
27त्या इमारतीत स्त्रीपुरुषांची खूप गर्दी झाली होती. पलिष्ट्यांचे सर्व सरदार तेथे होते. सुमारे तीन हजार स्त्रीपुरुष गच्चीवरून शमशोनाची गंमत पाहत होते.
28तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला : “हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त ह्या वेळेस मला बळ दे, म्हणजे आपल्या डोळ्यांबद्दल मी पलिष्ट्यांचा एका झटक्यात बदला घेईन.”
29ज्या मधल्या दोन खांबांवर ती इमारत आधारलेली होती त्यांतला एक उजव्या हाताने व दुसरा डाव्या हाताने धरून त्यांवर शमशोन टेकला.
30“पलिष्ट्यांबरोबर मलाही मरण येवो,” असे म्हणत आपले सर्व बळ एकवटून त्याने ते खांब रेटले. तेव्हा ती इमारत त्या सरदारांवर व तेथे जमलेल्या सर्व लोकांवर कोसळली. अशा प्रकारे त्याने मरतेसमयी ठार मारलेले लोक त्याच्या सार्या हयातीत त्याने ठार मारलेल्या लोकांपेक्षा अधिक होते.
31मग त्याचे भाऊबंद व त्याच्या बापाचा सगळा परिवार आला व त्याला उचलून घेऊन गेला. सरा व एष्टावोल ह्यांच्या दरम्यान त्याचा बाप मानोहा ह्याच्या कबरस्थानात त्यांनी त्याला मूठमाती दिली. त्याने वीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला होता.
सध्या निवडलेले:
शास्ते 16: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.