यशया 6
6
यशयाला झालेले दर्शन आणि पाचारण
1उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूला उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले; त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते.
2त्याच्या भोवताली सराफीम उभे होते; त्या प्रत्येकाला सहा-सहा पंख होते; दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे.
3ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे.”1
4घोषणा करणार्यांच्या ह्या वाणीने उंबरठे हालले व मंदिर धुराने भरले.
5तेव्हा मी म्हणालो, “हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले!”
6मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला.
7तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, “पाहा, ह्याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे.”
8तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” तेव्हा मी म्हणालो, “हा मी आहे! मला पाठव.”
9तो म्हणाला, “जा, ह्या लोकांना सांग की : ‘ऐकत राहा पण समजू नका, पाहत राहा, पण जाणू नका.’
10ह्या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून माझ्याकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर.”
11मी म्हणालो, “हे प्रभू, असे कोठवर?” तो म्हणाला, “नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल,
12परमेश्वर लोकांना दूर घालवून देईल व देशात ओसाड स्थळे बहुत होतील तोवर.
13त्यात लोकांचा दहावा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हायचा; तरी एला व अल्लोन ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुंधा राहतो त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील.”2
सध्या निवडलेले:
यशया 6: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.