YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 5

5
द्राक्षमळ्याचा दृष्टान्त
1मी आपल्या वल्लभाप्रीत्यर्थ गाणे गाईन; आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक शृंगावर होता;
2तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले व तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षीच्या वेलाची लागवड केली, आणि त्यात एक बुरूज बांधला व द्राक्षकुंड खोदले; मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली, पण त्याने रानद्राक्षे दिली.
3तर आता यरुशलेमकरांनो व यहूदातील लोकांनो, माझा व माझ्या द्राक्षीच्या मळ्याचा न्याय करा बरे!
4माझ्या द्राक्षीच्या मळ्यात मी केले नाही असे अधिक काय करायचे राहिले? तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रानद्राक्षे का दिली?
5आता मी आपल्या द्राक्षीच्या मळ्याचे काय करणार ते तुम्हांला सांगतो : मी त्याचे कुंपण काढून टाकीन म्हणजे तो खाऊन टाकतील; त्याचे आवार मोडीन म्हणजे तो तुडवला जाईल.
6मी तो उद्ध्वस्त करीन; त्याला कोणी खच्ची करणार नाही व कुदळणार नाही; त्यात काटेसराटे उगवतील; त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघांना करीन.
7कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलाचे घराणे; त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक; त्याने न्याय्यत्वाची अपेक्षा केली तर अपहार, नीतिमत्तेची अपेक्षा केली तर आक्रोश आढळून आला.
दुष्टावर येणार्‍या आपत्ती
8जे घराशी घर व शेताशी शेत जोडून घेतात, जागा मुळीच उरू देत नाहीत, त्यांना धिक्कार असो; तुमचीच काय ती देशात वस्ती आहे असे झाले आहे.
9सेनाधीश परमेश्वराने माझ्या कानात सांगितले : “बहुत मोठी व सुंदर घरे खरोखर ओसाड व लोकरहित होतील.
10दहा बिघे द्राक्षमळा दहा शेर रस देईल; एक मण बी एक पायली धान्य देईल.”
11जे पहाटेस उठून मद्याच्या पाठीस लागतात, जे अपरात्रीपर्यंत द्राक्षारस पिऊन धुंद होतात त्यांना धिक्कार असो.
12वीणा, सारंगी, डफ, बासरी व द्राक्षारस हीच त्यांची मेजवानी; पण ते परमेश्वराच्या कृतीकडे लक्ष देत नाहीत, ते त्याच्या हातचे कार्य पाहत नाहीत.
13ह्यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहेत; त्यांतले प्रतिष्ठित उपाशी मरत आहेत, आणि लोकसमुदाय तृषाक्रांत झाला आहे.
14ह्यामुळे अधोलोकाने आपली क्षुधा वाढवली आहे, आपले तोंड अमर्याद पसरले आहे; त्यात त्यांचे वैभव, त्यांचे जमाव, त्यांचा थाटमाट, तेथले मौज मारणारे पडतील.
15हलके लोक दबले आहेत, बडे लोक नीचावस्था पावले आहेत, गर्विष्ठांची मान खाली झाली आहे.
16सेनाधीश परमेश्वर तर न्यायाने उन्नत असा प्रकट होईल; पवित्र देव नीतिमत्तेने पवित्र असा प्रकट होईल.
17येथे कोकरे आपले कुरण समजून चरतील, धष्टपुष्टांच्या ओसाड झालेल्या जागा परके खाऊन टाकतील.
18जे दुष्टतेच्या दोर्‍यांनी दुष्कर्माला, जसे काय गाडीच्या दोराने पापिष्ठपणाला ओढून आणतात, त्यांना धिक्कार असो;
19ते म्हणतात, “त्याने त्वरा करावी, आपले कार्य शीघ्र करावे म्हणजे आम्हांला ते पाहायला मिळेल; इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा संकल्प लवकर पूर्ण होवो, म्हणजे आम्हांला त्याचा अनुभव घडेल.”
20जे वाइटाला बरे व बर्‍याला वाईट म्हणतात, जे प्रकाशाला अंधकार व अंधकाराला प्रकाश समजतात, गोड ते कडू व कडू ते गोड मानतात त्यांना धिक्कार असो.
21जे आपल्या दृष्टीने ज्ञानी व आपल्या मते समंजस त्यांना धिक्कार असो.
22ज्यांचे शौर्य द्राक्षारस पिण्यात आणि ज्यांची बहादुरी मद्य मिसळण्यात
23आणि जे लाच घेऊन दुष्कर्म करणार्‍यास निर्दोषी ठरवतात व नीतिमानाच्या निर्दोषीपणाची हानी करतात, त्यांना धिक्कार असो.
24ह्यास्तव अग्नीची ज्वाला धसकट खाऊन टाकते व वाळलेल्या गवताचे अग्नीत भस्म होऊन जाते तसे त्यांचे मूळ कुजलेल्या पदार्थासारखे होईल; त्यांचा फुलवरा धुळीसारखा उडून जाईल; कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराचे नियमशास्त्र तुच्छ लेखले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे वचन अव्हेरले आहे.
25ह्यासाठी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे; त्याने आपला हात त्यांच्यावर उगारून त्यांना मारले आहे, आणि डोंगर थरारले; त्यांची प्रेते रस्त्यातल्या घाणीसारखी आहेत. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.
26तो दूरच्या राष्ट्रांसाठी निशाण उभारतो व शीळ घालून दिगंतापासून त्यांना बोलावतो; पाहा, ते त्वरा करून धावत येत आहेत.
27त्यांतील कोणी थकलेला, कोणी ठोकर खाल्लेला नाही; कोणी डुलकी किंवा झोप घेणारा नाही, कोणाचा कमरबंद सैल झालेला नाही, कोणाच्या वहाणांचे बंद तुटलेले नाहीत;
28त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत, त्यांची धनुष्ये सज्ज केली आहेत; त्यांच्या घोड्यांचे खूर गारेसारखे, त्यांची चाके वावटळीसारखी आहेत.
29ते सिंहासारखी गर्जना करीत आहेत; ते तरुण सिंहाप्रमाणे गुरगुरत आहेत व गुरगुरून शिकार पकडत आहेत; ते ती घेऊन जात आहेत, कोणी सोडवत नाहीत.
30त्या दिवशी समुद्रगर्जनेप्रमाणे ते त्यांच्यावर गर्जना करतील; भूमीकडे पाहावे तर अंधकार व संकट; तेथील अभ्रांमुळे प्रकाश जाऊन काळोख होईल.

सध्या निवडलेले:

यशया 5: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन