यशया 40
40
सीयोनेसंबंधी परमेश्वराचे सांत्वनपर उद्गार
1सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, असे तुमचा देव म्हणतो.
2यरुशलेमेच्या मनाला धीर येईल असे बोला, तिला पुकारून सांगा, तुझे युद्ध संपले आहे. तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे; परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे.
3घोषणा करणार्याची वाणी ऐकू येते की, “अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा.
4प्रत्येक खोरे उंच होवो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होवो; उंचसखल असेल ते सपाट होवो व खडकाळीचे मैदान होवो;
5म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रकट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र मिळून ते पाहील, कारण हे बोलणे परमेश्वराच्या तोंडचे आहे.”
6“घोषणा कर!” अशी वाणी ऐकू आली. तेव्हा कोणीएक म्हणाला, “काय घोषणा करू?” सर्व मानवजाती गवत आहे, तिची सर्व शोभा वनातल्या फुलासारखी आहे.
7गवत सुकते, फूल कोमेजते, कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो; लोक खरोखर गवतच आहेत.
8गवत सुकते, फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.
9सीयोनेस सुवार्ता सांगणारे,1 उंच डोंगरावर चढ; यरुशलेमेस सुवार्ता सांगणारे,1 आपला स्वर जोराने उंच कर; कर उंच, भिऊ नकोस; यहूदाच्या नगरांना म्हण, “तुमचा देव पाहा.”
10पाहा, प्रभू परमेश्वर पराक्रम्यासारखा येत आहे; त्याचा भुज त्याचे प्रभुत्व चालवील; पाहा, वेतन त्याच्याजवळ आहे, व प्रतिफळ त्याच्या हाती आहे.
11मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणार्यांना सांभाळून नेईल.
इस्राएलाचा अद्वितीय देव
12जलांचे माप आपल्या चुळक्याने कोणी केले आहे? आकाशाचे माप आपल्या वितीने कोणी घेतले आहे? पृथ्वीची धूळ मापाने कोणी मापली आहे? डोंगर काट्याने व टेकड्या तराजूने कोणी तोलल्या आहेत?
13परमेश्वराच्या आत्म्याचे नियमन कोणी केले आहे? त्याचा मंत्री होऊन त्याला कोणी शिकवले आहे?
14त्याने कोणाला मसलत विचारली? सन्मार्गाविषयी समज देऊन त्याला कोणी शिक्षण दिले? त्याला कोणी ज्ञान शिकवले? सुज्ञतेचा मार्ग त्याला कोणी दाखवला?
15पाहा, त्याच्या हिशोबी राष्ट्रे पोहर्यांतल्या जलबिंदूसमान, तराजूतल्या रजासमान आहेत; पाहा, द्वीपेही तो धुळीच्या कणांसारखी उचलतो.
16लबानोन जळणास पुरायचा नाही व त्यावरील वनपशू होमास पुरे पडायचे नाहीत;
17सर्व राष्ट्रे त्याच्यापुढे काहीच नाहीत; त्याच्या हिशोबी ती अभाव व शून्यता ह्यांहूनही कमी आहेत.
18तुम्ही देवाला कोणती उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल?
19कारागीर मूर्ती ओतून तयार करतो, सोनार तिला सोन्याच्या पत्र्याने मढवतो, तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या घडतो.
20जो दारिद्र्यामुळे अर्पण आणण्यास समर्थ नाही तो न कुजणारे लाकूड निवडून घेतो; न ढळणारी अशी मूर्ती बनवण्यासाठी तो चतुर कारागीर शोधून काढतो.
21तुम्हांला कळत नाही काय? तुम्हांला ऐकू येत नाही काय? प्रारंभापासून तुम्हांला हे कळवले नाही काय? पृथ्वीचा पाया घातल्यापासून हे तुम्हांला समजले नाही काय?
22हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरूढ झाला आहे; तिच्यावरील रहिवासी टोळांसमान आहेत; तो आकाश मलमलीप्रमाणे पसरतो, राहण्यासाठी तंबू ताणतात तसे ते तो ताणतो.
23तो अधिपतींना कस्पटासमान लेखतो, पृथ्वीच्या न्यायाधीशांना शून्यवत करतो.
24त्यांना लावले न लावले, पेरले न पेरले, त्यांचे मूळ भूमीत रुजले न रुजले, तोच तो त्यांच्यावर फुंकर मात्र घालतो म्हणजे ते सुकून जातात, वादळ त्यांना भुसाप्रमाणे उडवून नेते.
25मी कोणाशी तुल्य आहे म्हणून त्यांची उपमा मला तुम्ही द्याल असे पवित्र प्रभू म्हणतो.
26आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांना बाहेर आणतो; तो त्या सर्वांना नावांनी हाक मारतो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही.
27हे याकोबा, असे का म्हणतोस, हे इस्राएला, असे का बोलतोस की, “माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टिआड झाला आहे?”
28तुला कळले नाही काय? तू ऐकले नाहीस काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्नकर्ता, थकतभागत नाही; त्याची बुद्धी अगम्य आहे.
29तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो.
30तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात;
31तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.
सध्या निवडलेले:
यशया 40: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.