YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 40:3-11

यशया 40:3-11 MARVBSI

घोषणा करणार्‍याची वाणी ऐकू येते की, “अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. प्रत्येक खोरे उंच होवो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होवो; उंचसखल असेल ते सपाट होवो व खडकाळीचे मैदान होवो; म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रकट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र मिळून ते पाहील, कारण हे बोलणे परमेश्वराच्या तोंडचे आहे.” “घोषणा कर!” अशी वाणी ऐकू आली. तेव्हा कोणीएक म्हणाला, “काय घोषणा करू?” सर्व मानवजाती गवत आहे, तिची सर्व शोभा वनातल्या फुलासारखी आहे. गवत सुकते, फूल कोमेजते, कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो; लोक खरोखर गवतच आहेत. गवत सुकते, फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते. सीयोनेस सुवार्ता सांगणारे,1 उंच डोंगरावर चढ; यरुशलेमेस सुवार्ता सांगणारे,1 आपला स्वर जोराने उंच कर; कर उंच, भिऊ नकोस; यहूदाच्या नगरांना म्हण, “तुमचा देव पाहा.” पाहा, प्रभू परमेश्वर पराक्रम्यासारखा येत आहे; त्याचा भुज त्याचे प्रभुत्व चालवील; पाहा, वेतन त्याच्याजवळ आहे, व प्रतिफळ त्याच्या हाती आहे. मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणार्‍यांना सांभाळून नेईल.